Saturday 28 November 2015

रत्नागिरीकरांनी उद्योगांना सहकार्य करायला हवे



उद्योजक दीपक गद्रे : वसुंधरा सन्मान पुरस्कार वितरण


 रत्नागिरी : ``घरच्या लोकांनी केलेल्या सन्मानाचे विशेष अप्रूप वाटते. आमच्या प्रकल्पात सांडपाणी नसून प्रक्रियेतून उरलेल्या घटकांतील पाणी असते. लोकांना मासे खायला आवडतात; पण माशांच्या प्रक्रिया उद्योगातील दुर्गंधी नको असते. त्यामुळे असे व्यवसायच येऊ नयेत, अशी नकारात्मक मानसिकता येथे अनुभवायला मिळाली. रोजगारनिर्मितीसाठी रत्नागिरीकरांनी उद्योगांना सहकार्य करायला हवे``, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गद्रे मरीन्सचे संस्थापक दीपक गद्रे यांनी व्यक्त केले. वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज वसुंधरा सन्मान पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
रत्नागिरी : वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील
वसुंधरा सन्मान पुरस्कार गद्रे मरीन्सचे संस्थापक दीपक गद्रे
आणि सहकाऱ्यांना प्रदान करण्यात आला.
श्री. गद्रे म्हणाले, ``आम्हाला आमच्या उद्योगातून दुर्गंधीचा त्रास होऊ नये, म्हणून अनेक प्रकारचे अद्ययावत तंत्रज्ञान आणले. मासळीला मागणी भरपूर आहे. परिणामी मासेमारी वाढत असून माशांच्या पैदासीला संधी मिळत नाही. व्यापारी गरजा लक्षात घेऊन काम करायचे असेल, तर अद्ययावत तंत्रज्ञान लागते. सुरवातीला मत्स्यप्रक्रियेतून बाहेर पडलेल्या पाण्यावर तंत्रज्ञानाचा वापर केला तो अपयशी ठरला; मात्र त्यात हार न मानता जोमाने काम सुरू केले. कंपनीला क्लीन डेव्हलपमेंटचे पारितोषिक मिळाले असून, भारतातील आमची अशी एकमेव मत्स्यप्रक्रिया कंपनी आहे. सर्वांनी दिवस-रात्र मेहनत घेतल्याने यश मिळाले.``
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात सांगता कार्यक्रमास रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, डॉ. ए. एस. कुलकर्णी, पेम संस्थेचे सतीश कामत आणि आंबा बागायतदार विजय देसाई उपस्थित होते.
डॉ. सुखटणकर यांनी महोत्सवाचा आढावा घेतला. अनिल दांडेकर यांनी मानपत्राचे वाचन केले. मंदार प्रभुदेसाई यांनी एलसीडी प्रोजेक्टरद्वारे गद्रे मरीन्स व प्रकल्पातील अद्ययावत यंत्रणा व शून्य कचरा व्यवस्थापनाची सविस्तर माहिती दिली.

No comments:

Post a Comment