Thursday 25 June 2015

मठ येथील पल्लीनाथ मंदिरात अधिक मासानिमित्त पुरुषोत्तम याग

रत्नागिरी – मठ (ता. लांजा) येथील लक्ष्मीपल्लीनाथाच्या नूतन मंदिरात अधिक आषाढ मासानिमित्ताने पुरुषोत्तम याग आयोजित करण्यात आला आहे. येत्या शनिवार-रविवारी (ता. 27 आणि 28 जून) हा याग होणार आहे.
चाळीस कुळांचे कुलदैवत असलेल्या लक्ष्मीपल्लीनाथाचे मंदिर मठ येथे अलीकडेच बांधण्यात आले आहे. देवस्थानाच्या कुलोपासकांनी एकत्र येऊन भव्य मंदिर साकारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार मंदिराची उभारणी सुरू असून म्हैसूरच्या काळ्या ग्रॅनाइटच्या कोरीव कामाने गाभाऱ्याचे, तर स्थानिक जांभ्या दगडाने घुमट आणि कळसाचे काम पूर्ण झाले आहे. या मंदिरात ध्यानमंत्राप्रमाणे पल्लीनाथ, गणेश आणि महालक्ष्मीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा नुकतीच पंचकुंडी प्रकाराने झाली आहे. त्यानंतर प्रथमच आलेल्या अधिक मासानिमित्ताने पुरुषोत्तम याग आयोजित करण्यात आला आहे. अधिक मास म्हणजे श्रीकृष्णाचा म्हणजेच पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. त्यानिमित्ताने श्रीकृष्णाची आराधना करण्यासाठी हा याग केला जाणार आहे.
शनिवारी (ता. 27) दुपारी 3 वाजता पुण्याहवाचनाने यागाचा प्रारंभ आणि रात्री अष्टोपचार सेवा केली जाईल. रविवारी हवन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम होतील. पल्लीनाथाच्या कुलोपासकांनी या यागाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

Saturday 20 June 2015

नानल गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचा कौशल्यविकासाचा संकल्प

 वर्षारंभ समारंभ :  अभ्यासाबरोबरच सुलेखन, जलतरण, वृक्षलागवडीची दीक्षा
रत्नागिरी – नियमित शालेय अभ्यासाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात करण्याचा संकल्प येथील अॅड. बाबासाहेब नानल गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आज (ता. 20) सोडला. वर्षभरात ही कौशल्ये आत्मसात करून व्यक्तिमत्त्व विकास साधण्याची दीक्षा त्यांनी घेतली.
श्रीमती प्राजक्ता मुसळे यांनी अग्निहोत्र सिद्ध केले.
 येथील रा. भा. शिर्के प्रशालेअंतर्गत पंचकोशाधारित अॅड. बाबासाहेब नानल गुरुकुल चालविले जाते. तेथे दरवर्षी समारंभपूर्वक वर्षारंभ केला जातो. त्यानुसार आज गुरुकुल शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष डॉ. शरद्चंद्र जोशी आणि गुरुकुल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. रघुवीर भिडे यांच्या उपस्थितीत वर्षारंभ समारंभ झाला. यावेळी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्वविकासासाठी काही संकल्प केले. ते यशस्वी करण्यासाठी वर्षभर धडपडण्याची
मार्गदर्शन करताना डॉ. रघुवीर भिडे
प्रतिज्ञा घेतली. पाचवीपासून विद्याव्रत स्वीकारून विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीला सुरवात केली. चांगले लेखन काढणे, उत्कृष्ट पोहता येणे, स्तोत्रपाठांतर, झाड लावून त्याची जोपासना करणे यासारखे संकल्प विद्यार्थ्यांनी केले.
 श्रीमती प्राजक्ता मुसळे यांनी सिद्ध केलेल्या अग्निहोत्रातील अग्नीला साक्षी ठेवून संकल्पाची दीक्षा विद्यार्थ्यांना दिली.

संकल्प ठरविण्याकरिता विद्यार्थ्यांनी गुरुकुलचे प्रमुख अध्यापक राजेश आयरे यांच्या नेतृत्वाखालील 
मार्गदर्शन करताना डॉ. शरद्चंद्र जोशी
अध्यापकवर्गाची मदत घेतली. ``विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात संकल्पाचे भरपूर योगदान आहे. संकल्प आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवण्याचे काम करतात``, असे यावेळी डॉ. जोशी यांनी सांगितले. अध्यक्ष डॉ. भिडे म्हणाले, ``संकल्प आपल्या मनाला घडवीत असतात. मनाला चांगल्या विचारांचे संस्कार करतात. मन चंचल असते. मनाला एकाग्र करणे व मनावर ताबा मिळविणे यासाठी संकल्पाचा योग्य उपयोग होतो.``

                कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गौरी आंबर्डेकर यांनी केले, तर संध्या सुर्वे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुकुल शिक्षकवृंदाचे सहकार्य लाभले.
.........................

गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आपला संकल्प जाहीर केला.


Thursday 18 June 2015

केंद्र सरकारतर्फे योग जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीची निवड

महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा समावेश – आंतरराष्ट्रीय योग दिनी भव्य कार्यक्रम                रत्नागिरी - केंद्र सरकारन राज्यातील सहा जिल्ह्यांची योग जिल्हा म्हणून निवड केली असून त्यारत्नागिरीचा समावेश आहे. येत्या 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन व्य प्रमाणात साजरा करण्याच रत्नागिरी जिल्हा पतंजली योग समितीने ठरविले आहे. सर्वांच्या प्रयत्नांतून संपूर्ण जिल्हा योगमय करण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा,  अशी समितीची अपेक्षा आह. प्रत्यक ग्रामपंयाचतीत पतंजली योग समितीतर्फे 5 ते 7 दिवसांचे मोफत योग शिबिर आयोजित केले जाणार असून योगदिनी जवळच्या शाळा किंवा विविध संस्थांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी होणऱ्या योग कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पतंजली योग समितीच्या राज्या कार्यकारिणी सदस्य सौ. राताई जोग यांनी केले आहे.

                हरिद्वार येथील स्वामी रामदेवबाबा यांच्या पतंजली योगपीठांतर्गत पतंजली समिती रत्नागिरीत 2007 पासून योग प्रशिक्षणाचे कार्य करत आहे. पुण्याच्या योगशिक्षिका व रत्नागिरीच्या माहेरवाशीण सौ. वृषाली हळबे यांनी 7 ते 13 म 2007 या कालावधीत दररोज सकाळी 6 ते 8 या वेळेत शिर्के प्रशालेत शिबिर घेतले. त्यातून योगशिक्षकांना आवाहन करून 15 शिक्षकांचे पहिले निवासी प्रशिक्षण शिबिर पावस येथील स्वामी स्वरूपानंद भक्तनिवासात झाले. त्यानंतर जिल्हा योग समिती स्थापन झाली. अध्यक्षपदी सौ. रमा जोग, तर महामंत्री प्रमोद प्रभुदेसाई आणि कोषाध्यक्ष म्हणन शरद्चंद्र रानडे यांची निवड झाली. 23 ते 25 जून 2007 दरम्यान हरिद्वार येथे केंद्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात रत्नागिरीचे प्रतिनिधित्व सौ. जोग यांनी केले. त्यानंतर जुलैमध्ये रत्नागिरीच्या समितीने पहिले योगशिबिर घेतले. पहिली योगकक्षा 1 जून 2008 रोजी अध्यात्म मंदिरात सुरू झाली. आजतागायत त्यात खंड पडलेला नाही. त्यानंतर सातत्याने विविध ठिकाणी मोफत प्रशिक्षण शिबिरे झाली. निरनिराळ्या रोगांवर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि रोगमुक्त राहण्यासाठी जिल्ह्यात पाचशेहून अधिक शिबिरे आयोजित करण्यात आली. प्रत्येक तालुक्यात योगशक्षक कार्यरत आहेत. जिल्ह्यात पंचवीस हजार प्राथमिक सदस्य, अडीच हजार कार्यकर्ता सदस्य,  500 विशिष्ट सदस्य, 5 सन्मानित सदस्य आणि 10 आजीवन सदस्य आहेत. ग्रामीण पातळीवर योग पोहचवण्यासाठी पतंजली योग समिती (अध्यक्ष अॅड. विद्यानंद जोग), भारत स्वाभिमाट्र´स्ट (अध्यक्ष अनंत आगाशे), जिल्हा युवा (युवा प्रभारी प्रभाकर तोडणकर), किसान पंचायत (माधव केळकर),  जिल्हा पतंजली योग समिती (अध्यक्ष अनघा जोशी) अशा 5 संघटना कार्यरत आहेत. दरवर्षी जडीबुटी दिन,  5 जानेवारीला भारत स्वाभिमानचा वाढदिवस, गुढी पाडव्याला राष्ट्रीय महिला दिन, रामनवमीला रामदेवबाबा संन्यास दीक्षा घेतल्याचा वर्धापनदिन,  गुरुपौर्णिमा उत्सव, 23 मार्चला क्रांतिकारकांचा शहीद दिन इत्यादी उत्सव साजरे केले जातात.

योप्रसाराचा एक भाग म्हणून येत्या 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रत्नागिरीत माळनाका येथील विवेक हॉटेलच्या सभागृहात योगाच्या प्रात्यक्षिकांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 6 वाजल्यापासून कार्यक्रम होणार असून मुख्य कार्यक्रम सकाळी 7 ते 7.30 दरम्यान होईल.चिकित्सालयात मोफत वैद्यकीय सेवा
    रत्नागिरी आणि चिपळूण येथे चिकित्सालय कार्यरत आहेत. तेथे नि:शुल्क वैद्यकीय सेवा दिली जाते. स्वदेशी विक्री केंद्रे सर्व तालुक्यातून सुरू झाली आहेत. हरिद्वारच्या शुद्ध वस्तू व औषधे तेथे उपलब्ध आहेत. जिल्हा, प्रांत, केंद्र अशी त्रिस्तरीय संघटना आणि तहसील, ग्रामपातळीपर्यंत विस्ताराचे काम सुरू आहे. पाच तालुक्यांमध्ये आचार्यकुल सुरू केली जाणार आहेत.

Saturday 13 June 2015

बँकिंग सेवांबाबत बँक ऑफ इंडिया कोकणात अग्रस्थानी

झोनल मॅनेजर विनायक बुचे : कारवांची वाडी शाखेचा ग्राहक मेळावा
 कुवारबाव (ता. रत्नागिरी) – बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक मेळाव्यात बोलताना बँकेचे झोनल मॅनेजर विनायक बुचे. शेजारी (डावीकडून) उपसरपंच जीवन कोळवणकर, विवेक शेंडे, सरपंच सौ. मनाली नार्वेकर.
-------------------------------------------
रत्नागिरी – ``अद्ययावत बँकिंग सेवांच्या बाबतीत बँक ऑफ इंडिया कोकणात अग्रस्थानी आहे. बँकेने युवा, महिला, नोकरदार, व्यावसायिक आणि सेवानिवृत्तीधारक अशा समाजाच्या सर्वच घटकांमधील ग्राहकांचे हित नेहमीच जपले असून ग्राहकांनीही या सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा``, असे आवाहन बँकेचे रत्नागिरी विभागाचे झोनल मॅनेजर विनायक बुचे यांनी केले.
शाखा व्यवस्थापक विवेक शेंडे यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार
बँकेच्या कारवांची वाडी शाखेतर्फे कुवारबाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ग्रामपंचायत सभागृहात आज (ता. 13) ग्राहक मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. सरपंच सौ. मनाली नार्वेकर, उपसरपंच जीवन कोळवणकर, बँकेचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. शाखा व्यवस्थापक विवेक शेंडे यांनी प्रास्ताविक केले. मार्गदर्शनपर भाषणात श्री. बुचे पुढे म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या बाबतीत बँक ऑफ इंडिया आघाडीवर आहे. बँकेच्या रत्नागिरी विभागात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश असून त्यामध्ये बँकेच्या 90 शाखा आहेत. विभागात 137 एटीएम असून 35 शाखांमध्ये ईगॅलरी सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी 16 कार्यान्वित झाल्या आहेत. या सर्व सुविधा स्थानिकांबरोबरच कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना खूपच उपयुक्त ठरत आहेत. तरुणांना उद्योगव्यवसायाशी संबंधित मार्गदर्शनासाठी दोन मोफत प्रशिक्षण केंद्रे विभागात आहेत. त्याचा लाभ उद्योजकतावाढीसाठी नक्कीच होईल.
मेळाव्याचे प्रास्ताविक करताना श्री. शेंडे
बँकेच्या विपणन विभागाचे विनय जामदार, विक्रम पुरोहित, योगेंद्र निमकर आणि मनीष वर्मा यांनी बँकेच्या विविध ग्राहकसेवांची माहिती दिली. महिला बचत गटाचे अनुदान आणि कर्जाबाबतचे बदललेले नियम तसेच केंद्र शासनाच्या तीन सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती श्री. जामदार यांनी दिली. बचत गटांविषयीचे सुधारित नियम महिलांच्या सक्षमीकरणासाठी कसे उपयुक्त आहेत, हे त्यांनी पटवून दिले. बचत गटांना अऩुदान देण्याची पूर्वीची पद्धत बदलून आता गटांनी घेतलेल्या व्याजाची ठरावीक रक्कम अनुदान म्हणून गटांना देण्याचे नवे धोरण आहे. गटांचा नियमितपणा, बचत, अंतर्गत कर्जवितरण, परतफेड, अद्ययावत लेखे या पूर्वीच्या पाच सूत्रांच्या जोडीला सदस्यांच्या आरोग्याची काळजी, शिक्षणाविषयीची जागरूकता, सदस्यांचा सहभाग, शासकीय
विनय जामदार
योजनांमध्ये सहभाग आणि सदस्यांच्या शाश्वत उपजीविकेसाठी उपाययोजना या नव्या पाच सूत्रांच्या आधारे गटांचे मूल्यांकन केले जाते. स्थापनेनंतर तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी, वर्षाने आणि तीन वर्षांनी टप्प्याटप्प्याने याच दशसूत्रीच्या आधारे मूल्यांकन करून पन्नास हजार ते दहा लाखापर्यंतचे कर्ज कसे मिळू शकते, याचा ऊहापोह त्यांनी केला. पहिल्या तीन महिन्यांच्या मूल्यांकनानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून मिळणाऱया पंधरा हजाराच्या अनुदानाची माहितीही त्यांनी दिली. जीवन सुरक्षा, जीवनज्योती आणि अटल पेन्शन योजनांची त्यांनी ओळख करून दिली.
विक्रम पुरोहित
विक्रम पुरोहित यांनी विविध कर्ज योजनांची माहिती दिली. सर्वांत कमी म्हणजे 9.95 टक्के व्याजाची गृहकर्ज योजना, वाहन कर्ज, तारण कर्ज आणि व्यवसाय कर्जाच्या योजनांचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. जागा घेणे आणि घर बांधण्यासाठी कर्ज दिले जाते. नोकरदार, व्यवसायिक आणि सेवानिवृत्तिधारकांनाही कर्ज मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. शैक्षणिक कर्जाच्या सुलभ अटी, महिला आणि व्यावसायिकांसाछी उपलब्ध असलेल्या कर्जांची वैशिष्ट्ये त्यांनी सांगितले.
सुकन्या समृद्धी आणि सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी योजनांची माहिती श्री. निमकर यांनी
योगेंद्र निमकर
दिली. सुकन्या योजना दहा ते चौदा वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी असून ती मुलीच्या एकविसाव्या वर्षी परिपक्व होते. सुकन्या आणि पीपीएफ या दोन्ही योजनांमध्ये एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते, असे त्यांनी सांगितले.
ई-गॅलरी, महिला, युवक, पगारदार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विमा संरक्षण लाभांची माहिती श्री. वर्मा यांनी दिली. इन्स्टंट मनी ट्रान्स्फर योजनेतून बँकेत खाते किंवा एटीएम नसलेल्या ग्राहकाला पैसे कसे पाठवता येतात, याविषयीचा माहितीपट त्यांनी दाखविला. ग्राहकांच्या विविध शंकांचे निरसन यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी केले.

समारंभाचे स्वागत ग्रामविकास अधिकारी श्री कांबळे यांनी केले. मेळाव्याला कुवारबाव
मनीष वर्मा
परिसरातील महिला, नोकरदार, व्यवसायिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
......................
शंभर ग्रामस्थांना विमा संरक्षण
      कुवारबाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील शंभर नागरिकांना ग्रामपंचायतीतर्फे पंतप्रधान जीवन सुरक्षा योजनेअंतर्गत विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यांचे अर्ज आणि विमा रक्कम बँक ऑफ इंडियाच्या कारवांची वाडी शाखेत भरली जाईल, अशी माहिती यावेळी ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आली.
सरपंच सौ. मनाली नार्वेकर यांनी झोनल मॅनेजर विनायक बुचे यांचा सत्कार केला.

मेळाव्याला उपस्थित नागरिक.Friday 5 June 2015

राज्यातील शेतकऱ्यांना एकरी पंचवीस हजाराचे पीककर्ज द्यावे

रत्नागिरी तालुका `आप`ची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

रत्नागिरी – दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आणि नापिकीने त्रस्त झालेल्या कोकणासह राज्यभरातील शेतकऱ्यांना एकरी किमान पंचवीस हजार रुपयांचे पीककर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रत्नागिरी तालुका आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात राज्यभरातील शेतकऱ्यांच्या स्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आणि सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. कापूस आणि सोयाबीनचे बाजारभाव मुळातच तोकड्या असलेल्या हमीभावापेक्षाही कमी होते. गाईच्या दुधाचा दर लिटरला सोळा रुपयांपर्यंत घसरला आहे. आपच्या विदर्भ आणि मराठवाड्यातील संवाद यात्रेत दूध उत्पादकांनी आत्महत्या केल्याचे वास्तव समोर आले आहे. स्वामीनाथन समितीच्या शिफारशींनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि पन्नास टक्के नफा मिळवून दिला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. ते प्रत्यक्षात आलेले नाही. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली साडेचार हजार रुपयांची तुटपुंजी मदतही अजून मिळालेली नाही. आता पावसाळा सुरू होणार असून शेतकरी नव्या अपेक्षेने पेरणीस उत्सुक असला, तरी कोसळत्या बाजारभावाने तो हतबल झाला आहे. तसेच पेरणीचा खर्चही त्याच्या आवाक्याबाहेर झाला आहे. अशा स्थितीत सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. याआधीचे शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करून त्यांना तातडीने एकरी पंचवीस हजाराचे नवे पीककर्ज उपलब्ध करून देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

आपचे रत्नागिरी तालुका संयोजक जुबेर काझी, उपसंयोजक रवींद्र कोकरे, सचिव अमोल माने, छात्र युवा संघर्ष समितीचे कोकण संयोजक नीलेश आखाडे यांनी हे निवेदन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना सादर केले.


Tuesday 2 June 2015

रत्नागिरी तालुका `आप`च्या संयोजकपदी जुबेर काझी

रत्नागिरी – आम आदमी पार्टीच्या रत्नागिरी तालुका समितीची फेररचना करण्यात आली असून तालुका संयोजकपदी जुबेर काझी यांची निवड करण्यात आली. कोकण विभाग सचिव दानिश बक्षी आणि छात्र युवा संघर्ष समितीचे कोकण संयोजक नीलेश आखाडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड झाली.

बैठकीत लोकसभा निवडणुकीपासून प्रचलित असलेल्या सर्व समित्या रद्द करण्यात आल्या. संघटनात्मक बदलांनंतर आगामी स्थानिक निवडणुका आपने स्वतंत्रपणे लढवाव्यात, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संघटनेचे काम जोमाने सुरू असल्याची माहिती यावेळी श्री. आखाडे यांनी दिली. शहरातील विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. यावेळी रवींद्र कोकरे (उपसंयोजक), अमोल माने (सचिव) यांचीही तालुका कार्यकारिणीवर निवड करण्यात आली. उर्वरित समिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित तालुका संयोजक श्री. काझी यांनी सांगितले. रत्नागिरी शहरासाठी काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.