Saturday, 13 June 2015

बँकिंग सेवांबाबत बँक ऑफ इंडिया कोकणात अग्रस्थानी

झोनल मॅनेजर विनायक बुचे : कारवांची वाडी शाखेचा ग्राहक मेळावा
 कुवारबाव (ता. रत्नागिरी) – बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक मेळाव्यात बोलताना बँकेचे झोनल मॅनेजर विनायक बुचे. शेजारी (डावीकडून) उपसरपंच जीवन कोळवणकर, विवेक शेंडे, सरपंच सौ. मनाली नार्वेकर.
-------------------------------------------
रत्नागिरी – ``अद्ययावत बँकिंग सेवांच्या बाबतीत बँक ऑफ इंडिया कोकणात अग्रस्थानी आहे. बँकेने युवा, महिला, नोकरदार, व्यावसायिक आणि सेवानिवृत्तीधारक अशा समाजाच्या सर्वच घटकांमधील ग्राहकांचे हित नेहमीच जपले असून ग्राहकांनीही या सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा``, असे आवाहन बँकेचे रत्नागिरी विभागाचे झोनल मॅनेजर विनायक बुचे यांनी केले.
शाखा व्यवस्थापक विवेक शेंडे यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार
बँकेच्या कारवांची वाडी शाखेतर्फे कुवारबाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ग्रामपंचायत सभागृहात आज (ता. 13) ग्राहक मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. सरपंच सौ. मनाली नार्वेकर, उपसरपंच जीवन कोळवणकर, बँकेचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. शाखा व्यवस्थापक विवेक शेंडे यांनी प्रास्ताविक केले. मार्गदर्शनपर भाषणात श्री. बुचे पुढे म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या बाबतीत बँक ऑफ इंडिया आघाडीवर आहे. बँकेच्या रत्नागिरी विभागात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश असून त्यामध्ये बँकेच्या 90 शाखा आहेत. विभागात 137 एटीएम असून 35 शाखांमध्ये ईगॅलरी सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी 16 कार्यान्वित झाल्या आहेत. या सर्व सुविधा स्थानिकांबरोबरच कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना खूपच उपयुक्त ठरत आहेत. तरुणांना उद्योगव्यवसायाशी संबंधित मार्गदर्शनासाठी दोन मोफत प्रशिक्षण केंद्रे विभागात आहेत. त्याचा लाभ उद्योजकतावाढीसाठी नक्कीच होईल.
मेळाव्याचे प्रास्ताविक करताना श्री. शेंडे
बँकेच्या विपणन विभागाचे विनय जामदार, विक्रम पुरोहित, योगेंद्र निमकर आणि मनीष वर्मा यांनी बँकेच्या विविध ग्राहकसेवांची माहिती दिली. महिला बचत गटाचे अनुदान आणि कर्जाबाबतचे बदललेले नियम तसेच केंद्र शासनाच्या तीन सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती श्री. जामदार यांनी दिली. बचत गटांविषयीचे सुधारित नियम महिलांच्या सक्षमीकरणासाठी कसे उपयुक्त आहेत, हे त्यांनी पटवून दिले. बचत गटांना अऩुदान देण्याची पूर्वीची पद्धत बदलून आता गटांनी घेतलेल्या व्याजाची ठरावीक रक्कम अनुदान म्हणून गटांना देण्याचे नवे धोरण आहे. गटांचा नियमितपणा, बचत, अंतर्गत कर्जवितरण, परतफेड, अद्ययावत लेखे या पूर्वीच्या पाच सूत्रांच्या जोडीला सदस्यांच्या आरोग्याची काळजी, शिक्षणाविषयीची जागरूकता, सदस्यांचा सहभाग, शासकीय
विनय जामदार
योजनांमध्ये सहभाग आणि सदस्यांच्या शाश्वत उपजीविकेसाठी उपाययोजना या नव्या पाच सूत्रांच्या आधारे गटांचे मूल्यांकन केले जाते. स्थापनेनंतर तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी, वर्षाने आणि तीन वर्षांनी टप्प्याटप्प्याने याच दशसूत्रीच्या आधारे मूल्यांकन करून पन्नास हजार ते दहा लाखापर्यंतचे कर्ज कसे मिळू शकते, याचा ऊहापोह त्यांनी केला. पहिल्या तीन महिन्यांच्या मूल्यांकनानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून मिळणाऱया पंधरा हजाराच्या अनुदानाची माहितीही त्यांनी दिली. जीवन सुरक्षा, जीवनज्योती आणि अटल पेन्शन योजनांची त्यांनी ओळख करून दिली.
विक्रम पुरोहित
विक्रम पुरोहित यांनी विविध कर्ज योजनांची माहिती दिली. सर्वांत कमी म्हणजे 9.95 टक्के व्याजाची गृहकर्ज योजना, वाहन कर्ज, तारण कर्ज आणि व्यवसाय कर्जाच्या योजनांचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. जागा घेणे आणि घर बांधण्यासाठी कर्ज दिले जाते. नोकरदार, व्यवसायिक आणि सेवानिवृत्तिधारकांनाही कर्ज मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. शैक्षणिक कर्जाच्या सुलभ अटी, महिला आणि व्यावसायिकांसाछी उपलब्ध असलेल्या कर्जांची वैशिष्ट्ये त्यांनी सांगितले.
सुकन्या समृद्धी आणि सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी योजनांची माहिती श्री. निमकर यांनी
योगेंद्र निमकर
दिली. सुकन्या योजना दहा ते चौदा वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी असून ती मुलीच्या एकविसाव्या वर्षी परिपक्व होते. सुकन्या आणि पीपीएफ या दोन्ही योजनांमध्ये एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते, असे त्यांनी सांगितले.
ई-गॅलरी, महिला, युवक, पगारदार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विमा संरक्षण लाभांची माहिती श्री. वर्मा यांनी दिली. इन्स्टंट मनी ट्रान्स्फर योजनेतून बँकेत खाते किंवा एटीएम नसलेल्या ग्राहकाला पैसे कसे पाठवता येतात, याविषयीचा माहितीपट त्यांनी दाखविला. ग्राहकांच्या विविध शंकांचे निरसन यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी केले.

समारंभाचे स्वागत ग्रामविकास अधिकारी श्री कांबळे यांनी केले. मेळाव्याला कुवारबाव
मनीष वर्मा
परिसरातील महिला, नोकरदार, व्यवसायिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
......................
शंभर ग्रामस्थांना विमा संरक्षण
      कुवारबाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील शंभर नागरिकांना ग्रामपंचायतीतर्फे पंतप्रधान जीवन सुरक्षा योजनेअंतर्गत विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यांचे अर्ज आणि विमा रक्कम बँक ऑफ इंडियाच्या कारवांची वाडी शाखेत भरली जाईल, अशी माहिती यावेळी ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आली.
सरपंच सौ. मनाली नार्वेकर यांनी झोनल मॅनेजर विनायक बुचे यांचा सत्कार केला.

मेळाव्याला उपस्थित नागरिक.



No comments:

Post a Comment