Friday 17 November 2017

कोट येथे रविवारी राणी लक्ष्मीबाई जयंती

            लांजा :  झाशीची राणी लक्ष्मीबाईची जयंती कोट (ता. लांजा) येथे येत्या रविवारी (दि. १९ नोव्हेंबर) साजरी करण्यात येणार आहे. कोटे हे राणी लक्ष्मीबाईचे सासरचे मूळ गाव आहे.
      जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुपारी ३ वाजता कार्यक्रमाला प्रारंभ होईल. रत्नागिरीच्या कऱ्हाडे ब्राह्मण संघाने लक्ष्मीबाईच्या जयंतीच्या निमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. परिसरातील शाळांमधील विद्यार्थी त्यात सहभागी होणार आहेत. त्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र देऊन गुणगौरव करण्यात येईल. निमंत्रित मान्यवर यावेळी आपले विचारही व्यक्त करतील. राज्य शासनातर्फे राणीचे स्मारक उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत त्याबाबतच्या बैठका झाल्या आहेत. स्मारक उभारण्याच्या दृष्टीने झालेल्या प्रगतीविषयीची माहिती यावेळी देण्यात येईल. पुण्याच्या सौ. रोहिणी माने-परांजपे सादर करणार असलेल्या राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावर आधारित कीर्तनाने जयंती समारंभाचा समारोप होईल.
      कोट येथे बाळूकाका नेवाळकर यांच्या निवासस्थानी होणार असलेल्या या समारंभाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन राणी लक्ष्मीबाई जयंती समिती आणि कोट येथील ग्रामस्थांनी केले आहे.
............

(संपर्क – राजू नेवाळकर, (०२३५१) २३३५०४, ९२७०९६३५७४)