साप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६


नमस्कार. उत्तरेला असलेल्या पालघरपासून दक्षिणेतल्या सिंधुदुर्गापर्यंतच्या कोकणातील पाचही जिल्ह्यांतले (त्यात अर्थातच मुंबईही आलीच) सर्व प्रकारचे विषय हाताळण्याच्या उद्देशानं साप्ताहिक कोकण मीडिया सुरू करण्यात आलं आहे. कोकणाच्या अनुषंगानं नियमित घडामोडी, पर्यटन, इतिहास, राजकारण, खाद्यसंस्कृती, लोकसंस्कृती, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक यापैकी कोणताही विषय ‘साप्ताहिक कोकण मीडिया’ला वर्ज्य नाही. 'दीपोत्सव विशेषांक २०१६' हाच त्याचा पहिला अंक असून, तो 'मागोवा : शतकाचा, शतकापूर्वीचा' या संकल्पनेवर आधारित आहे.ऐका कोकणातल्या बोली,
अस्सल स्वरूपात


या साप्ताहिकाच्या माध्यमातून एक वेगळा म्हणावा असा उपक्रम आम्ही हाती घेणार आहोत तो म्हणजे इथल्या स्थानिक बोलीभाषांच्या संवर्धनाला हातभार लावण्याचा. आगरी, खारवी, बाणकोटी, संगमेश्वरी, मालवणी अशा गोडवा असलेल्या अनेक बोलीभाषा कोकणात आहेत. त्यांचे अनेक उपप्रकारही आहेत. काळाच्या ओघात त्या बोलींचा वापर हळूहळू कमी होत चालला आहे. त्यामुळे या बोलींच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही या बोलींतील साहित्य आमच्या साप्ताहिकातून प्रसिद्ध करणार आहोत. हे साहित्य अर्थातच त्या त्या बोलींमधील जाणकार व्यक्तींचं किंवा ती भाषा अस्खलित बोलता येत असलेल्यांचंच असेल. एवढ्यावरच न थांबता आम्ही त्या बोलीतलं साहित्य ऑडिओ स्वरूपात आमच्या वेबसाइटवर उपलब्ध करणार आहोत. टीव्हीवरील मालिका किंवा अन्य माध्यमांतून या बोलीभाषा बहुतांशी वेळा मोडतोड होऊनच लोकांसमोर जातात. त्यामुळे ज्यांना त्या माहिती नाहीत, त्यांना त्या तशाच आहेत असं वाटतं आणि ज्यांना त्या माहिती आहेत, ती लोकं हळहळण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाहीत. त्यामुळे साहजिकच भाषेचं नुकसान होतं. हे लक्षात घेऊन कोकणातील अस्सल बोली लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. या उपक्रमाला आणि एकंदरच आमच्या साप्ताहिकाला, दिवाळी अंकाला तुम्हा वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी खात्री वाटते. आपल्या सूचना, प्रतिक्रिया यांचं स्वागतच आहे. त्यासाठी kokanmedia@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.‘साप्ताहिक कोकण मीडिया’च्या दीपोत्सव विशेषांकातील (२०१६) निवडक साहित्य इथे उपलब्ध करून देत आहोत. तसंच त्यांच्या ऑडिओंच्या लिंक्सही देत आहोत. हा अंक बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवरही उपलब्ध आहे.
......................

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या मालवणी बोलीतली कविता


सोबता आमची जोडी...


“हिरवो हिरवो तरवो आमचो दिसता कसो बग
करीन म्हंतय अवंदु तुका चांगलोसो नग....”

“नग नुको माका, आदी तुमका घेवा घोंगडा
उनातानात फिरत आसतात खयव गोर्वांवांगडा”

“लगीन झाल्यापास्ना तुका मेळला सांग गो काय?
पाऱ्या, तुजी कसली हौस पुरवक् मिया नाय”

“वगी ऱ्हवा बगया आता; भाकरी खावा आदी
कारबाऱ्यानु तुमची माजी आसात सोना-चांदी...”

“काय बगुन घातलं पाऱ्या, दरिद्र्याक ह्या माळ
बाराव म्हयने खावची लागता सुकाट आनि डाळ”

“असा बोलान करू नकात कमी तेची गोडी
शंकर आनि पार्बतीची सोबता आमची जोडी...”


- डॉ. महेश केळुस्कर, अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद(ही कविता डॉ. महेश केळुस्कर यांच्याच आवाजात ऐकण्यासाठी इथं क्लिक करा.)
..........................

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या मालवणी बोलीतली कविता

पळस फुललो रानात


पळस फुललो रानात 
पळस फुललो मनात

फांद्येफांद्येर सावरां फुलली
सगळ्या रानात उक्षी फुलली
नागचाफ्याची फुलां दडला
हिरव्या हिरव्या पानात
पळस फुललो रानात....१

आबोली फुलली, वोवळां फुलली
पिवळी पिवळी सुरंगी फुलली
हरतऱ्हेची फुलां फुलली
होळ्येच्या सणात 
पळस फुललो रानात...२

लाला ढवळो चाफो फुललो
केगदेचो हातो फुललो
कारयेची फुलां फुलली
आंबोलेच्या रानात
पळस फुललो रानात...३

फुलाफुलांर पाखरां नाचली
मध पिऊन किलबिलाटली
मधमाश्यांनी पोळां बांधला
घराच्या गे कोनात
पळस फुललो रानात...४

- दादा मडकईकर, सावंतवाडी

(ही कविता दादा मडकईकर यांच्याच आवाजात ऐकण्यासाठी इथं क्लिक करा.)

...............................................


किनारपट्टीवर बोलल्या जाणाऱ्या आगरी बोलीच्या खारवी या उपबोलीतली कविता

तुमीं सगलें!


तुमीं सगलें लेकक मजें ...!
माज्यां शरीराचो एक एक भाग
पंताम्हांभूतांन् बनलेलों!!

आनीं तेनींच माला ह्यों!
लिकान करयेचों आशिर्वाद देलेलों!!

तेवां, सगल्यां लेककांनू! सगल्यां कवींनू! कवयित्रींनू!
सगल्यां गजलकारांनू, वादन करनाऱ्यां वादकांनू!

तुंबला ह्यों माजो, साष्टांग नमस्कार!
कारन, तुमच्यांच जीवावर मीं उड्यें मारतां!!

तुमीं जर कां लीवलाव् नसतांव्!
तें मीं खुटला वाचला आंसतां!!
गायकांनू! तुमी गायला नसतांव्,
तर माज्यां मनांला खुटला भावला आसतां!!

गजलकारांनों! प्रेम कसा करयेंचा
ह्यां गीतांत सांगलाव् नसताव् तें
माला पीरेम करयां कसा मिल्लां आंसतां!
आनीं तां मीं कसा केला आसतां..!!

वादकांनू! ताला-सुराची सांगड घालून
सूर बनवलांव नसतांव तें माला खयचीं सुकाची झोप लागलीं असती!
तेवां, मी म्हंनतां तुमीं माजें, आय्स् बापूस...!
तुमीं माजें गुरूं! तुमच्यापासून मी निर्मान झालूं...!

कवीं आनी लेकक म्हंनून तुमचे ऋन कसें मीं इसरू!
तेवां लेखनीचों आदार घेवून तुमच्या जवल आलूं!!

आयुष्याच्या मावलत दिशेने!
क्षितिजाच्या सांजवेली..!!
दर्यासारंगाच्या गार वारेत, तुमच्या बाजूला बसून,
माज्या मायमराठीची सेवा करयां, तुमचेत सामील होयां...!!


- मोहन पाटील, पालशेत, गुहागर, जि. रत्नागिरी

(ही कविता मोहन पाटील यांच्याच आवाजात ऐकण्यासाठी इथं क्लिक करा.)
....................
कोकणात जन्मलेल्या महाकवीच्या नावाचा जागर

मराठीतील संतकाव्य आणि पंतकाव्याची परंपरा मोडून, आधुनिक मराठी काव्याची तुतारी स्वप्राणाने फुंकणारे आणि मराठी कवितेत सौंदर्यवादी दृष्टिकोन आणणारे कवी कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत या कोकणभूमीतच होऊन गेले. रत्नागिरीत गणपतीपुळ्याजवळच्या मालगुंड गावामध्ये सात ऑक्टोबर १८६६ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त आठ ऑक्टोबर २०१६ रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे त्यांच्या जन्मगावी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन यांनी त्या वेळी केलेल्या भाषणात केशवसुतांचा आणि पर्यायानं मराठी साहित्याच्या गेल्या दीडशे वर्षांतील वाटचालीचा आढावा घेतला. केशवसुतांच्या नावाचा, त्यांच्या कार्याचा जागर करणारं प्रा. महाजन यांचं हे भाषण ऐकण्यासाठी इथं क्लिक करा. ते भाषण साप्ताहिक कोकण मीडियाच्या दीपोत्सव विशेषांकात प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
....................


'शिक्षणाची आस्था घडवील कोकणाचा कायापालट'

कोकणातून अनेक जण जसे उद्योगधंद्यासाठी बाहेर गेले, तसेच साहजिकच बाहेरूनही अनेक जण कोकणात स्थलांतरित झाले आहेत. भले हे प्रमाण सध्या कमी असेल, पण विशेषतः उद्योगधंदे वाढीला लागल्यापासून आणि खास करून कोकण रेल्वेचं आगमन झाल्यापासून बाहेरगावचे नागरिक कोकणात येऊन राहण्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे. असे वेगळ्या भागातून आलेले नागरिकही कोकणात रुळून जातात, कोकणवासीय त्यांना आपलेसे करतात, असा अनुभव आहे. या नागरिकांना कोकणाविषयी, इथल्या माणसांविषयी नक्की काय वाटतं, या प्रश्नाचं प्रातिनिधिक उत्तर मिळतं रत्नागिरी आकाशवाणी केंद्रात कार्यरत असलेले कार्यक्रम अधिकारी सुहास विद्वांस यांच्या या मनोगतातून. मूळचे वर्ध्याचे असलेले सुहास विद्वांस १९९१पासून रत्नागिरीत आहेत. त्यांनी कोकणाविषयी व्यक्त केलेले विचार ऐकण्यासाठी इथं क्लिक करा. त्यांचं हे मनोगत साप्ताहिक कोकण मीडियाच्या दीपोत्सव विशेषांकात प्रसिद्ध करण्यात आलं आहे..............

अंकाची उपलब्धता 

ऑनलाइन : साप्ताहिक कोकण मीडियाचा दीपोत्सव विशेषांक बुकगंगा डॉट कॉम या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तिथून हा अंक तुम्ही घरपोच मागवू शकता किंवा ई-बुक स्वरूपातही विकत घेऊ शकता.

No comments:

Post a Comment