Saturday, 2 January 2021

मार्लेश्वराचा विवाहविधी होणार वऱ्हाड्यांशिवाय

देवरूख : करोनाच्या फेऱ्यामुळे माणसांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांवर आणि सणसमारंभांवर बंदी आलीच, पण यावर्षी देवाचा विवाहसुद्धा या फेऱ्यातून सुटला नाही.

संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर म्हणजे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. आकाशाला भिडणाऱ्या डोंगररांगा, त्यातून कोसळणारा उंचच उंच धबधबा, घनदाट वनराई आणि त्याच वनराईत विसावलेली मार्लेश्वराची गुहा असा निसर्गाचा आविष्कार पाहायला नेहमीच पर्यटकांची गर्दी लोटते. दरवर्षी मकरसंक्रांतीला होणारा मार्लेश्वर आणि गिरीजादेवीचा विवाह म्हणजेच कल्याणविधी पाहायला आणि त्यामध्ये सहभागी व्हायला राज्यभरातील वऱ्हाडी दरवर्षी आवर्जून येतात. मानपानापासून ते मंगलाष्टकांपर्यंत माणसांचे लग्न होते, तसेच सारे विधी या समारंभात होतात. मोठी यात्रा भरते.

यावर्षी मात्र देवाच्या विवाह सोहळ्याला यायला वऱ्हाड्यांना बंदी घालण्यात आली आहे. येत्या १४ जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी सारे धार्मिक विधी होणार असले, तरी करोनामुळे यात्रोत्सव मात्र रद्द करण्यात आला आहे. एसटीच्या जादा गाड्या सुटणार नाहीत. खासगी वाहनांवर आणि स्थानिक दुकानांवरही येत्या १३ ते १५ जानेवारी या काळात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी प्रथमच मार्लेश्वराचा विवाह सोहळा वऱ्हाड्यांशिवाय पार पडणार आहे.