Friday 30 November 2018

वेदमूर्ती जनूकाका फडके यांची जन्मशताब्दी कुर्धे-मेर्वी येथे सुरू


     
 रत्नागिरी : कुर्धे-मेर्वी गावचे माजी सरपंच वेदमूर्ती जनार्दन नारायण ऊर्फ जनूकाका फडके 
यांच्या जन्मशताब्दीच्या दोन दिवसांच्या कार्यक्रमाला आज (ता. ३० नोव्हेंबर) प्रारंभ झाला. त्यांच्या शिष्यांनी विविध धार्मिक विधींनी शताब्दी साजरी करायचे ठरविले आहे.
     
पवमान पंचसूक्त
कै. वेदमूर्ती जनार्दन नारायण फडके गुरुजी यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९१८ रोजी झाला. काही काळ मेर्वी-कुर्धे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सरपंच म्हणून त्यांनी काम केले. या काळात गावातील सार्वजनिक विहिरीसह विविध सामाजिक कामे त्यांनी केली. गावातील पहिले गोबर गॅस संयंत्र स्वतःच्या घरी सुरू करून त्यांनी गावाला ऊर्जेच्या नव्या स्रोताची दिशा दिली. कुर्धे गावातील शतकोत्सवी वेदपाठशाळेत त्यांनी सुमारे २५ वर्षे ८० विद्यार्थ्यांना वेदांचे शिक्षण दिले. त्यांनी कीर्तन-प्रवचनेही केली.
     अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची तिथीनुसार जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी त्यांच्या वेदपाठशाळेत शिकलेल्या ५० विद्यार्थ्यांनी कुर्धे येथे दोन दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आज पहिल्या दिवशी उदकशांत, पुण्याहवाचन, व्यासपूजा, पवमान, रुद्र, सौर, ब्रह्मणस्पती आणि रुद्रसूक्ताचा जप, वेदमूर्ती प्रभाकर पाध्ये यांचे प्रवचन, मंत्रजागर, आरती-मंत्रपुष्प, आगवे येथील मुळ्ये मंडळींचे भजन इत्यादी कार्यक्रम पार पडले. कै. फडके यांचे कुटुंबीय, स्नेही, विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आठवणींचे 'जनाशताब्दीहे पुस्तक आज प्रकाशित झाले. ज्येष्ठ लेखिका सौ. आशाताई गुर्जर, पत्रकार प्रमोद कोनकर, कै. फडके यांचे सुपुत्र प्रकाश फडके यांच्या हस्ते प्रकाशन झाले. रत्नागिरीच्या कोकण मीडियातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
     
रुद्रावर्तने
उद्या सकाळी देवतापूजन, हवन, यतेआराधना आणि तीर्थराजपूजन होणार असून कार्यक्रमाची सांगता होईल.
........

'जनाशताब्दी’ संग्रह बुकगंगावर
..................

जनाशताब्दी हा संग्रह bookganga.com या संकेतस्थळावर ई-बुक स्वरूपात मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे पुस्तक पुढील लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून वाचता येईल. (बुकगंगाचा ई-बुक रीडरही डाउनलोड करावा लागेल.)
कुर्धे (ता. रत्नागिरी) : माजी सरपंच वेदमूर्ती जनूकाका फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेल्या 'जनाशताब्दी संग्रहाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ लेखिका सौ. आशाताई गुर्जर, वेदमूर्ती मुंडले, प्रमोद कोनकर, प्रकाश फडके


Thursday 29 November 2018

स्कुबा डायव्हिंग पॉइंटमुळे रत्नागिरीच्या पांढऱ्या समुद्रकिनाऱ्याचा पर्यटन विकासपांढऱ्या समुद्रकिनाऱ्यावरून सूर्यास्ताचे दर्शन
..........................................................................
      रत्नागिरी  : रत्नागिरीतील हर्षा स्कुबा डायव्हिंगचा डायव्हिंग पॉइंट आता मिऱ्याऐवजी रत्नागिरीच्या पांढरा समुद्र भागात स्थलांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे डायव्हिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांना समुद्राच्या शांत किनाऱ्यावरील जीवन आणि वैविध्याचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच त्या भागातील पर्यटनाच्या विकासालाही चालना मिळणार आहे.
      सुमारे तीस वर्षांपूर्वी पांढरा समुद्र हे रत्नागिरीचे गजबजणारे पर्यटनस्थळ होते. मात्र त्या भागात सुकत घातली जाणारी मासळी आणि धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामामुळे पांढरा समुद्र हे ठिकाण रत्नागिरीच्या पर्यटनाच्या नकाशावरून पुसले गेले. मात्र आता पुन्हा येथे पर्यटन विकासाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मासळी सुकविण्याचे केंद्र मिरजोळे येथे स्थलांतरित करण्यात आला आहे. शिवाय हर्षा स्कुबा डायव्हिंग या संस्थेने मिऱ्या गावातून आपला डायव्हिंग पॉइंट पांढऱ्या समुद्रकिनाऱ्यावर हलविला आहे.
      पांढरा समुद्र भागातील समुद्र खूप शांत आहे. या भागातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या पांढऱ्या वाळूमुळे या किनाऱ्याला पांढरा समुद्र असे म्हटले जाते. सागरी आक्रमणामुनळे या किनाऱ्याची धूप होऊ नये, तेथे टेट्रॉपॉडचा धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्यात आला आहे. त्यामुळे थेट समुद्राच्या लाटा या किनाऱ्यावर येत नाहीत. परिणामी हा किनारा सुरक्षित झाला आहे. या भागात पार्किंगची सुविधा असून स्थानिकांनी पर्यटकांसाठी विविध स्टॉल थाटले आहेत. लवकरच त्या भागात प्रशस्त रस्ताही होणार आहे. या किनाऱ्यावरील मुरूगवाडा, पंधरा माड येथील लोक विकासासाठी एकत्र आले आहेत. स्थानिकांनी एकत्र येऊन येथे स्टॉल मांडले आहेत. स्वच्छता केली आहे. स्कूबा डायव्हिंग पॉइंटमुळे या किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यांना या परिसरातील विविध प्रकारचे मासे व प्रवाळ पाहण्याची संधी मिळते. किनाऱ्यावर हजारो प्रकारचे शंख, शिंपले आढळतात. सात फूट लांबीच्या पंखाचा पसारा लाभलेल्या समुद्री गरुडाचे दर्शन या परिसरात होते. ब्राह्मणी घार, छोटे पक्षी तसेच व्हिंब्रेल, रेड शांक, ग्रीन शांक, प्लोवर, वेस्टर्न रिफ हेरॉन यासारखे अनेक स्थलांतरित पक्षीही येथे पाहायला मिळतात. रत्नदुर्ग किल्ल्याच्या भौगोलिक रचनेमुळे उत्तरेला पांढर्यास समुद्रावरील वाळूचा किनारा आहे. नारळी पौर्णिमेच्या मागे-पुढे पंधरा दिवस हा किनारा एका वेगळ्याच रूपात सजतो. रंगीबेरंगी शंख-शिंपल्यांनीही किनारा सजतो. पाऊल ठेवायलाही जागा नसते. हे शंख-शिंपले न्याहाळणे म्हणजे आनंददायी क्षण असतो. समुद्राच्या पूर्वेला काही अंतरावर मोठे कांदळवन असून त्यात जैवविविधता पद्धतीने अनुभवता येते. या खाजणात ऑक्टोपसचे दर्शनही होते, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक सुधीर रिसबूड यांनी दिली.
     पांढऱ्या समुद्रकिनारी वाळू पायाला फार चिकटत नाही. रत्नदुर्ग किल्ला, दुर्मिळ औषधी वनस्पतींनी युक्त मिऱ्या डोंगर, शंखशिंपले, कांदळवनातील जैवविविधता, मत्स्यालय अशी पर्यटकांना आवडणारी अनेक स्थळे या किनाऱ्यावर असल्याने पांढरा समुद्रकिनारा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
.............रत्नागिरीतील हर्षा स्कुबा डायव्हिंगच्या पांढऱ्या समुद्रावरील डायव्हिंग पॉइंटवरून समुद्राच्या तळाशी गेल्यानंतर घडणारे समुद्राखालील सृष्टीचे दर्शन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


.................
...............


हर्षा स्कुबा डायव्हिंगसाठी संपर्क - ७७१९९०५५३३९८२२२९०८५९
..........................
Tuesday 6 November 2018

‘कोकणातील जलवैभव आणि कलेचा वारसा जपायला हवा’


कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाचे उक्षीच्या कातळशिल्पाजवळ प्रकाशन

उक्षी (रत्नागिरी) : ‘कोकणात सापडलेल्या कातळ-खोदचित्रांमध्ये पाणघोडा, हत्ती अशा अनेक प्राण्यांच्या प्रतिमा आहेत, ज्यातील बहुतांश प्राणी पाण्याशी निगडित आहेत. ही शिल्पे दहा हजार वर्षांपूर्वीची म्हणजेच अश्मयुगीन काळातील असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. याचाच अर्थ असा, की कोकणातील जलसमृद्धीलाही एवढा इतिहास आहे,’ असे प्रतिपादन कातळ-खोद-चित्रांचे शोधकर्ते सुधीर तथा भाई रिसबूड यांनी केले. रत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. कोकणातील जलवैभव, तसेच विविध कलांचा वारसा जपण्याची गरज या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केली.

साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) प्रमोद कोनकर, हरिश्चंद्र बंडबे, सरपंच मिलिंद खानविलकर, भाई रिसबूड, डॉ. रमेश साळुंखे आणि कांचन आठल्ये.
साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाचे यंदा तिसरे वर्ष असून, यंदाच्या अंकात जलवैभव विशेष विभाग आहे. तसेच कोकणातील कातळ-खोद-चित्रांच्या ठेव्याची दीर्घ गूढरम्य शोधकथाही शोधकर्त्यांनी अंकात लिहिली आहे. याचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथील कातळ-खोद-चित्राजवळ वसुबारसेच्या दिवशी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.


माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. रमेश साळुंखे, कातळ-खोद-चित्रांचे शोधकर्ते भाई रिसबूड, कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर, ‘हर्षा हॉलिडेज’चे प्रतिनिधी कांचन आठल्ये, उक्षीचे सरपंच मिलिंद खानविलकर, उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे, ग्रामविकास अधिकारी पद्मजा खटावकर, गावप्रमुख गणपत घाणेकर, मंगेश नागवेकर, अरविंद बंडबे, चंद्रकांत घाणेकर, संतोष देसाई आणि ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

उक्षी गावात लोकसहभागातून संरक्षित करण्यात आलेले हत्तीचे कातळ-खोद-चित्र
‘या गावात सापडलेले हत्तीचे कातळशिल्प लोकसहभागातून संरक्षित करण्यात आले आहे. हा आदर्श जास्त लोकांपर्यंत पोहोचावा या हेतूने अंकाचे प्रकाशन उक्षी गावात करण्यात आले,’ असे संपादक प्रमोद कोनकर यांनी सांगितले. तसेच कोकणातील चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने साप्ताहिक कोकण मीडिया कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


भाई रिसबूड यांनी या वेळी त्यांच्या शोधकार्याबद्दल थोडक्यात सांगून, ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दलही आवर्जून सांगितले. तसेच, ‘लोकसहभागातून कातळशिल्प संरक्षित केल्यामुळे गावात पर्यटक येऊ लागले. त्यामुळे चहावाल्याचा व्यवसाय वाढला. त्याचप्रमाणे पर्यटक अधिक प्रमाणात आले, तर सर्वांचाच फायदा होईल. म्हणूनच गावाची अस्मिता जपण्याची गरज आहे. गावातील तरुणच गाइड म्हणून तयार झाले, तर गावाचाच फायदा होईल,’ असे त्यांनी नमूद केले.

‘हर्षा हॉलिडेज’चे कांचन आठल्ये यांनीही हाच मुद्दा उचलून धरला आणि पर्यटकांना अशा गोष्टीच पाहण्यात रस असल्याचे आणि गावातील तरुणांनी माहिती दिल्यास ते अधिक उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.

माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. रमेश साळुंखे यांनी कातळशिल्प लोकसहभागातून संरक्षित केल्याबद्दल गावकऱ्यांचे कौतुक केले. ‘आता जग छोटे झाले आहे. त्यामुळे अमेरिकेतीलही क्षणात कळते; पण लिखित स्वरूपातील माध्यमे महत्त्वाची आहेत. तो अक्षर ठेवा आहे. कोकण मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होत असलेल्या विषयांचे हेच महत्त्व आहे. मिलिंद खानविलकरांसारखे उत्साही सरपंच गावाला लाभले आणि त्यांना लोकांचे सहकार्य मिळाले, त्यामुळे गावाचे नाव अजरामर झाले आहे. भाई रिसबूड यांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या कार्यामुळे उक्षी गाव जगाच्या नकाशावर आले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गावातील तरुण मुलांनी गाइड होण्यासाठी प्रयत्न करावेत. अश्मयुगातील जुनी माणसे आज नसली, तरी कलेच्या रूपाने आजही ती जिवंत आहेत. अश्मयुगातील ही कला गावापुरती सीमित न राहता सर्वत्र जावी आणि पिढ्यानपिढ्या जपावी. त्यातूनच उपजीविकेचे साधनही उपलब्ध होईल. हा ठेवा जपला, तर पर्यटकांमध्येही गणपतीपुळे, पावसबरोबरच ही कला, इतिहास, संस्कृती बघण्याची आवड निर्माण होईल,’ असे डॉ. साळुंखे म्हणाले.

सरपंच मिलिंद खानविलकर यांनी आपले अनुभव सांगितले. ‘भाई रिसबुडांनी या कातळशिल्पाचे महत्त्व सांगितल्यावर आम्ही तो ठेवा जपण्यासाठी गावकऱ्यांपुढे प्रस्ताव ठेवला. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही तो ठेवा संरक्षित करू शकलो. कोणताही सरकारी निधी आम्ही घेतलेला नाही. कातळशिल्पाच्या माध्यमातून गावाची प्रसिद्धी झाली. अनेक माणसे येथे येत असतात. पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, आयुक्त जगदीश पाटील यांनीही अलीकडेच येथे भेट दिली. हा ठेवा आम्ही जतन केला, तसा आजूबाजूच्या परिसरातील लोकांनीही करावा,’ असे खानविलकर म्हणाले.

उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांनी आभारप्रदर्शन केले.

(साप्ताहिक कोकण मीडियाचा दिवाळी अंक फक्त १२५ रुपये असून, ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून अंक घरपोच मागविण्यासाठी https://www.bookganga.com/R/7X0YW येथे क्लिक करा. ‘बुकगंगा’वर अंक ई-बुक स्वरूपातही उपलब्ध आहे. ई-बुकची किंमत फक्त १०० रुपये. अंकासाठी आणि वार्षिक वर्गणीसाठी संपर्क : 9422382621)

(अंकाच्या प्रकाशनसोहळ्याची आणि उक्षीच्या कातळशिल्पाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)