Sunday 25 December 2016

केबीबीएफमुळे रत्नागिरी कोकणची आर्थिक राजधानी होईल - राहुल पंडित

रत्नागिरी – आपल्या व्यवसायातील अनुभव केबीबीएफच्या सदस्यांना सांगताना नगराध्यक्ष राहुल पंडित.
रत्नागिरी – कऱ्हाडे ब्राह्मण बिझनेस फोरममुळे (केबीबीएफ) रत्नागिरीची ओळख कोकणची आर्थिक राजधानी अशी होईल, असा विश्वास रत्नागिरीचे नूतन नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी येथे व्यक्त केला.
      केबीबीएफची सातवी मासिक बैठक कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात नुकतीच पार पडली. बैठकीत केबीबीएफचे सदस्य आणि नूतन नगराध्यक्ष राहुल पंडित यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
      श्री. पंडित म्हणाले, ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन जास्तीत जास्त जणांनी व्यवसायाकडे वळण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता सर्वांनी स्वतःचा कौशल्यविकास करून आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करून आपल्या व्यवसायाचे आणि उत्पादनांचे ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न करावा. अशाच प्रयत्नांतून केबीबीएफमुळे रत्नागिरीची ओळख कोकणाची आर्थिक राजधानी अशी होऊ शकेल. नगराध्यक्ष म्हणून व्यवसायाभिमुख सुविधा उपलब्ध करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.  आपल्या योगिता टायपिंग आणि कॉम्प्युटरच्या व्यवसायातील अनुभवही त्यांनी सदस्यांना सांगितले. 
     
केबीबीएफचे सदस्य योगेश मुळ्ये,    सुहास ठाकूरदेसाई, संदेश शहाणे, पुरुषोत्तम पाध्ये, श्री. जायदे, श्रीमती भागवतयांनी यावेळी मनोगत व्यक्त केले आणि नगराध्यक्षांनी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
      नगराध्यक्षांच्या हस्ते केबीबीएफच्या अँड्रॉइड ॲपचे उद्घाटन तसेच नव्या वर्षाच्या डायरीचे प्रकाशन करण्यात आले. केबीबीएफचे सदस्य आणि रत्नागिरीतील सॉफ्टवेअर डेव्हलपर आर्यक सोल्युशन्स प्रा. लि. चे प्रशांत आचार्य आणि ऋषिकेश सरपोतदार यांनी हे अँड्रॉइड ॲप विकसित केले आहे. त्यात रत्नागिरीतील सदस्यांची आणि त्यांच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली आहे. हे ॲप सर्वांना मोफत उपलब्ध आहे.आर्यक सोल्युशन्सचे संचालक प्रशांत आचार्य यांनी आपल्या व्यवसायाची यशोगाथा यावेळी सांगितली.
...