रत्नागिरी : अनाथ आणि निराधारांसाठी कार्य करणाऱ्या मुंबईतील अंकुर प्रतिष्ठानतर्फे येत्या
२ ते ५ जून या कालावधीत रत्नागिरीत निवासी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मुंबईतील
अनाथाश्रमातील मुली या शिबिराच्या निमित्ताने रत्नागिरी जि्ल्ह्याचा परिचय करून
घेणार आहेत.
अंकुर प्रतिष्ठान ही अनाथालयातील वंचित मुलांकरिता काम करणारी सामाजिक संघटना आहे. विविध अभिनव
उपक्रमांद्वारे अनाथ मुलांच्या संपूर्ण विकासासाठी संस्था कार्यरत आहे. अनाथ
मुलांमधील सुप्त कौशल्याचा शोध घेऊन अशा मुलांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि
त्यांना मदत करण्यासाठी संस्था काम करते. अनाथाश्रमासारख्या काहीशा बंदिस्त
वातावरणात राहिलेल्या या मुलांचा बाहेरील जगाशी परिचय
करून देण्याचाही संस्थेचा प्रयत्न असतो.
याच प्रयत्नांचा भाग म्हणून मुंबईतील अनाथाश्रमातील
मुलींसह २५ जणांचा गट चार दिवसांच्या मुक्कामासाठी येत्या २ जून रोजी रत्नागिरीत
दाखल होत आहे. त्यांच्या चार दिवसांच्या निवासाची व्यवस्था रत्नागिरी एज्युकेशन
सोसायटीने मुलींच्या वसतिगृहात केली आहे.
पहिल्या दिवशी दुपारी हा गट देवधर डेअरीला भेट देईल.
सायंकाळी त्यांच्यासाठी सर्पमित्र विनोद वायंगणकर
सापांविषयीची माहिती देणार आहेत. दुसऱ्या दिवशी (ता. ३) मुलींना जयगडमार्गे फेरीबोटीतून हेदवीतील गणेश मंदिर, बामणघळ, वेळणेश्वर मंदिर, आरेवारे समुद्रकिनाऱ्याची सफर घडविली जाणार आहे. तिसऱ्या दिवशी प्रा.
सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्यासमवेत गणेशगुळे, कोळंबे, देवराई, रेल्वेचा पानवळ पूल परिसरात निसर्गपरिक्रमा घडविली जाईल. सायंकाळी कार्ले येथे
नौकेची सफर या मुली करतील. रात्री प्रा. विवेक भिडे यांच्या आकाशदर्शनाचा
कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुलींना ग्रामीण जीवनाचे दर्शन घडावे, यासाठी अखेरच्या दिवशी एका
गावाची सफर घडविली जाणार आहे.
या कार्यक्रमांमध्ये सोयीनुसार
रत्नागिरीवासीयांनाही होता येऊ शकेल. त्याकरिता या शिबिराचे संयोजक प्रा. अवधूत आपटे (८४१२०१८११२) यांच्याशी संपर्क साधावा,
असे आवाहन करण्यात आले आहे.
..........
अधिक माहितीसाठी –