Friday, 29 January 2016

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सव्वादोन वर्षांत - गडकरी



रत्नागिरी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण येत्या सव्वादोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी खात्री केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नीतिन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. २९ जानेवारी २०१६) व्यक्त केली.
       
निवळी येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन करताना
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नीतिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि अन्य मान्यवर.
रत्नागिरीजवळ निवळी येथे या महामार्गाच्या कशेडी ते लांजा या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. चौपदरीकरणाच्या या प्रकल्पाला सुमारे दहा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी एक टक्का रक्कम खर्च करून हा महामार्ग हरित द्रुतगती महामार्ग म्हणून ओळखला जाण्यासाठी वनीकरण केले जाईल
, असेही श्री. गडकरी म्हणाले. सागरी महामार्गाला केंद्र सरकारने निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी याच समारंभात केली होती. तिची दखल घेऊन सागरी महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची घोषणाही श्री. गडकरी यांनी केली. या महामार्गासाठी भूसंपादन करताना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांपेक्षाही अधिक मोबदला द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी समारंभात केली होती. त्याचा उल्लेख करून श्री. गडकरी म्हणाले, "या महामार्गासाठी जमीन देणाऱ्यांना सर्वाधिक म्हणजे हेक्टरी ४० लाख ते एक कोटी रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे."
          रत्नागिरीकोल्हापूर आणि गुहागरकराड महामार्गांच्या चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित असून निवळी ते जयगड रस्ता रुंदीकरण करण्यात येईल, असेही श्री. गडकरी म्हणाले. जयगड येथे मेरीटाइम विद्यापीठ स्थापन करण्यासाठी ५० कोटी रुपये देण्याची घोषणादेखील त्यांनी केली.
          "विकास हा महामार्गातून होतो हे चांगले माहिती असलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई ते गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू करून कोकणासाठी विकासाचा महामार्ग खुला केला आहे", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न गेल्या १५-२० वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. मात्र आता चर्चेचे दिवस संपून कृतीचे दिवस सुरू झाले आहेत, हे नितीन गडकरी यांनी दाखवून दिले आणि मंत्री झाल्यावर या महामार्गावरील १५ पुलांना तातडीने मान्यता दिली. आज या मार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही सुरू होत असल्याने हा महामार्ग भविष्यात विकासाचा महामार्ग ठरणार आहे. या महामार्गासाठी ज्यांनी जमीन दिली, त्या शेतकऱ्यांना आश्वस्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की, १०२ पैकी ९९ गावांत भूसंपादन पूर्ण झाले असून संपूर्ण देशात महाराष्ट्र हे जमीन संपादनासाठी सर्वांत जास्त मोबदला देणारे राज्य आहे.
          नितीन गडकरी यांनी १८ हजार कोटी रुपयांची कामे मंजूर केली असून त्यापैकी साडेतीन हजार कोटी रुपयांच्या या कामास सुरुवातही झाली आहे. राष्ट्रीय महामार्गांची लांबी दुप्पट करण्याचे काम करतानाच नितीन गडकरी यांनी एक लाख कोटींची रस्त्यांची कामे एकट्या महाराष्ट्रात सुरू केली आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या टेबलवर असलेले "अमेरिका श्रीमंत आहे कारण येथील रस्ते चांगले आहेत" हे वाक्य गडकरी यांनी तंतोतंत अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
       अलीकडेच आम्ही बंदर विकासाचे नवे धोरण जाहीर केले, परंतु हे करताना केवळ बंदर विकासावरच लक्ष केंद्रित केले नसून पर्यटन व पर्यावरणपूरक विकासावर आमचा भर आहे. विशेषत: यामुळे कोकणासारख्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. ज्या देशात समुद्रकिनाऱ्यांचा उत्तम पद्धतीने आणि पर्यावरणपूरक विकास झाला आहे, तो भाग समृद्ध झालेला दिसतो. अशाच रीतीने कोकण किनारपट्टीचा विकास करणार आहोत, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यानी यावेळी केंद्रीय पेटोलियम मंत्र्यांचे आभार मानताना सांगितले की कोकणात ग्रीन रिफायनरी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने येथील एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यानिमित्ताने तेथे पाच हजार एकरावर जंगल आणि हरित पट्टा निर्माण करण्यात येणार असल्याने निसर्गाचे संवर्धन होणार आहे.
       पनवेल-महाड-पणजी असा ४७१ किलोमीटरचा हा महामार्ग रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयांतून जातो. आज  ज्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन झाले, ते ३ टप्पे असे - कशेडी खवटी ते परशुराम घाट (४३.८० कि.मी.), आरवली ते कांटे (४० कि.मी.) आणि कांटे ते वाकेड (५०.९० कि.मी.). या कामांसाठी सुमारे तीन हजार ५३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
       यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, वित्त राज्य मंत्री दीपक केसरकर, खासदार हुसेन दलवाई, विनायक राऊत, अमर साबळे, आमदार हुस्नबानू खलिफे, उदय सामंत, राजन साळवी, सदानंद चव्हाण, आशीष शेलार, निरंजन डावखरे, संजय कदम, वैभव नाईक, प्रशांत ठाकूर त्याचप्रमाणे राजेंद्र महाडीक, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने आदी मान्यवर उपस्थित होते.

Tuesday, 12 January 2016

कीर्तनसंध्या रत्नागिरी- २०१६ पुष्प पाचवे आणि अखेरचे

बारभाईंनी अखंड भारतात वाढवला मराठशाही, पेशवाईचा दरारा



     
        रत्नागिरी - वयाच्या अवघ्या चाळिसाव्या दिवशी सवाई माधवराव पेशवे झाले. त्यांच्या पालनपोषणासह वीस वर्षे बारा मंत्र्यांनी मराठशाही जगण्यासाठी व वाढण्यासाठी बहुमोल योगदान दिले. ५२ लढाया जिंकल्या आणि मराठशाहीचा दरारा एवढा वाढवला की फारशी मोठी युद्धे करावी लागली नाहीत. इंग्रजांनाही रोखून धरले होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.
             रत्नागिरीच्या कीर्तनसंध्या परिवाराने आयोजित केलेल्या पाच दिवसांच्या कीर्तन महोत्सवाची सांगता रविवारी (ता. १०) रात्री स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात झाली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांना प्रसाद करंबेळकर, हर्षल काटदरे, राजा केळकर आणि महेश सरदेसाई यांनी साथसंगत केली.
आफळेबुवांनी यावेळी पेशवाईतील सुवर्णक्षण सांगितले. माधवरावांच्या मृत्यूनंतर धाकटे बंधू नारायणराव पेशवे झाले. नाना फडणवीसांनी राघोबाच्या घरावर पहारे बसवले. एका वर्षात राघोबांनी दहा वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला. नारायणरावाला धरावे असे पत्र लिहिले. त्यात आनंदीबाईने
धचा मा केला अशी दंतकथा सांगितली जाते. याला इतिहासात पुरावा नाही व धचा मा करण्याकरिता पत्रात तेवढी जागा नव्हती व मा करणे शक्यच नव्हते. पेशव्यांच्या गणेशोत्सवात अनंत चतुर्दशीला नारायणास कैद करावे, असे सुमेर सिंग गारद्याला सांगण्यात आले. त्या बदल्यात स्वराज्याचा ३ लाखांचा हिस्सा तोडण्याचे ठरले. ७०० गारदी शनिवारवाड्यात घुसले. पानिपतातील विजयानंतर आमचे पगार वाढला नाही, अशी दंडेलशाही करत गारद्यांनी नारायणाचा पाठलाग केला. काका मला वाचवा असे ओरडत नारायण राघोबाच्या खोलीत घुसले. पण गारद्यांनी राघोबाला तलवारीचे भय दाखवून नारायणाला हिसकावले व शनिवारवाड्यातच नारायणचा वध केला, असे बुवा म्हणाले. या घटनेने पुणे हादरले आणि पेशव्यांच्या रामशास्त्री, नाना फडणवीस, महादजी शिंदे अशा बारा मंत्र्यांनी राज्यकारभार चालविण्याचे ठरविले. त्याला बारभाईंचे कारस्थान असेही म्हणतात. मुळा नदीच्या काठी शिवपिंडी करून पूजन केले. प्रजेचे अहित करणाऱ्यांच्या हातात सत्ता द्यायची नाही, प्रसंगी मरू पण मराठशाहीची सत्ता वाढवू अशी शपथ घेण्यात आली. नारायणाच्या मृत्यूनंतर अवघ्या चौदा दिवसांतच राघोबाने पेशवाईची वस्त्रे घातली. न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांनी राघोबाला नारायण वधाचे कारस्थान तुमचेच आहे, त्यामुळे देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागेल, असे ठणकावले. राघोबाने ते नाकारल्याचे आफळेबुवांनी सांगितले.
            श्री. आफळे पुढे म्हणाले, बारभाईंनी सातारच्या छत्रपती शाहूंना सांगून राघोबाला कर्नाटक मोहिमेवर पाठवले आणि तेवढ्या काळात त्याची पेशवाईही रद्द करवून घेतली. राघोबा पोर्तुगीजांकडे मदतीसाठी गेला. नंतर इंग्रजांकडे गेला. इंग्रजांनी पुण्यावर हल्ला चढवण्याच्या उद्देशाने पत्र लिहिले. फ्रेंचांचा पाडाव करायला जात आहोत म्हणून आम्हाला स्वराज्यातून प्रवेश द्यावा, असे त्यांनी सांगितले. ही चाल नाना फडणविसांना कळताच ती नाकारली. पण इंग्रज निघाले होते. ते वडगावपर्यंत पोहोचले. तेव्हा इंग्रजांचे ते पत्र दाखवून फ्रेंचांची मदत घेतली. तोफगोळे उडवण्याकरिता फ्रेंचांनी तंत्रज्ञ दिले आणि भिऊराव पानसेंच्या तोफखान्याने इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. राघोबाला आमच्या हवाली करा, ४० लाख रुपये भरपाई असे तहात ठरले. अशा मुत्सद्देगिरीमुळे नानांचा डंका इंग्लंडमध्ये वाजला.
     नारायणाची पत्नी पुरंदर किल्ल्यावर प्रसूत झाली व चाळीस दिवसांच्या त्या बाळाला सवाई माधवराव नाव ठेवून पेशवेपद दिले. बारभाईंनी वीस वर्षे सवाई माधवरावांची देखभाल करताना मराठशाही जगवली. मराठशाहीचा दरारा वाढल्यानेच फारशी मोठी युद्धे झाली नाही. पण सुमारे पन्नास युद्धे झाली. इंग्रजांनी मान वर काढली नाही. तिकडे सातारच्या गादीला वारस नसल्याने बारभाईंनी त्र्यंबक भोसलेंच्या पुत्राला गादीवर बसवले. मध्य प्रदेशातील सागर संस्थानाजवळील किल्ला इंग्रजांनी जिंकल्यावर एक पाय नसूनही महादजी शिंद्यांनी पराक्रम दाखवून इंग्रजांना पराभूत केले. सवाई माधवरावाला मंत्र्यांमध्ये फूट पाडण्यासाठी फितविण्याचे प्रयत्न व्हायचे. पण एकदा त्याने महादजी व नाना हे स्वराज्याचे दोन्ही आहेत, त्यांना कसे तोडू असे सांगून बुद्धिचातुर्य दाखवले, असे बुवांनी सांगितले.
             बुवा म्हणाले, पानिपतच्या पराभवानंतर सदाशिवरावभाऊ सापडले नाहीत. त्यांचे नाव घेऊन काही तोतये आले होते. त्यापैकी एकाने तर आपणच सदाशिवभाऊ असल्याचे अनेक पुरावे दिले. सदाशिवभाऊंच्या पत्नी पार्वतीकाकू तेव्हा जिवंत होत्या. कर्मठ पेशवाईमध्येही त्यांनी सौभाग्यलेणी उतरवली नव्हती. तिच्या पतिव्रतेला कसं फसवणार, असे विचारताच मग त्या तोतयाने कबुली दिली. जय देव जय देव जयजय शिवराया ही आरती, फ्रेंचांचा पाडाव करण्या, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया अशा पदांनी कीर्तनात रंग भरला.
               पूर्वरंगात बुवांनी शरण हनुमंता, तुम्हा रामदूता यावर निरूपण केले. हनुमंताची महती वर्णन केली. संत नामदेवांनी विठ्ठलाचे कार्य घुमान (पंजाब) येथे नेले. त्यामुळे. भा. साहित्य संमेलन तेथे घडू शकले, असे सांगितले. लहान मुलांनी हनुमंताचा आदर्श ठेवायला हवा. संभाव्य युद्धाला तोंड देण्यासाठी शंभर सूर्यनमस्काराची पद्धत घराघरात सुरू झाली पाहिजे. शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले.

स्वा. सावरकर व बाबारावांची राष्ट्रभक्ती

                      अंदमानातून सुटताना दादूलाल या कैद्याने स्वा. सावरकरांच्या गळ्यात ङ्कुलांची माळ घातली. त्यावेळी मोठे बंधू बाबाराव हेसुद्धा सुटले. ते महाराष्ट्रात परत आले तेव्हा काहींनी बाबारावांना सांगितले, तुम्ही त्रास सोसला व माळ धाकट्या भावाच्या गळ्यात. तुम्ही वेगळे व्हा, असा सल्ला दिला. त्यावर बाबारावांनी सांगितलेले उत्तर महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यदेवीचे मंदिर उभारताना मी पायरी झालो आणि विनायकाला गाभाऱ्यात फुलांची जागा मिळाली. अनेक भक्त पायरीला नमस्कार करून आत जातात म्हणून कोणाचेच महत्त्व कमी होत नाही. असे बाबाराव म्हणाले. ही गोष्ट सर्वांनी ध्यानात घ्यायला हवी. रत्नागिरीत स्वा. सावरकरांनी मोठे योगदान दिल्याचेही श्री. आफळे यांनी सांगितले.

                     कीर्तनसंध्या परिवाराची सामाजिक बांधिलकी

      
रत्नागिरी - कीर्तन महोत्सवात पालिकेच्या स्वच्छतादूतांकरिता
नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्याकडे हातमोजे देताना आफळेबुवा.
शेजारी बाळ माने, अशोक मयेकर आदी.

कीर्तनसंध्याने गेल्या वर्षी रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांचा हृद्य सत्कार केला होता. त्याचा पुढचा भाग म्हणून सांगतेच्या दिवशी कीर्तनसंध्याने या १०० दूतांना हातमोजे देण्यात आले. जोगेंद्र जाधव, प्रीतम कांबळे, योगेश मकवाना यांना प्रातिनिधिक स्वरूपात नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, माजी आमदार बाळ माने व माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांच्या हस्ते त्याचे वाटप केले. आफळेबुवांच्या हस्ते उर्वरित हातमोजे नगराध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आले. आफळेबुवांनीही या उपक्रमाचे कौतुक करून समाजातील अन्य संस्थानीही असे काम करावे, असे सांगितले. पुण्यामध्ये महानगरपालिकेने माझ्याकडून स्वच्छतेविषयी कीर्तन करून घेतले. त्याची सीडी दररोज घंटागाडीमध्ये वाजवली जाते. कचरा उचलणाऱ्यांना आपण कचरावाले असे न म्हणता स्वच्छता करणारे दूत म्हटले पाहिजे. मंदिरामध्ये दररोजच्या निर्माल्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्पही करता येईल. यासाठी रत्नागिरीतील तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आफळेबुवांनी केले.

आफळेबुवांसोबत कीर्तनसंध्या परिवार
            प्रतिमहा कीर्तनसेवा, व्हिडिओ दाखवणे, एखादे राष्ट्रभक्तीवरील उद्बोधक भाषण ऐकवणे असे कार्यक्रम कीर्तनसंध्यातर्फे आयोजित करण्यात येणार आहेत, असे यावेळी जाहीर करण्यात आले. एसटीने महोत्सवातकरिता आलेल्या श्रोत्यांसाठी शहर वाहतुकीच्या जादा गाड्यांची सोय केली होती. नगरपालिकेने मोबाइल प्रसाधनगृह देऊन मोलाचे सहकार्य केले.
            कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी अवधूत जोशी, नितीन नाफड, रत्नाकर जोशी, मकरंद करंदीकर, गुरुप्रसाद जोशी, उमेश आंबर्डेकर, गौरांग आगाशे, योगेश हळबे, अभिजित भट, योगेश गानू, कौस्तुभ आठल्ये, धनंजय मुळ्ये, महेंद्र दांडेकर, उदयराज सावंत, ओम साई मंडप डेकोरेटर्स, गुरुकृपा मंगल कार्यालय, श्री. पावसकर, माधव कुलकर्णी, विनीत फडके आणि पराग हेळेकर यांनी मेहनत घेतली.

­­­­­­­­

कीर्तन महोत्सवासाठी झालेली गर्दी.

(माऊली फोटोज, रत्नागिरी)

..............................

Sunday, 10 January 2016

कीर्तनसंध्या महोत्सव – पुष्प चौथे



माधवराव पेशव्यांची मुत्सद्देगिरी मराठशाहीच्या हिताची – चारुदत्त आफळे

रत्नागिरी : माधवराव पेशवे मुत्सद्दी होते. अल्पायुष्यात त्यांनी त्यांच्या या स्वभावाची चुणूक दाखवली. इंग्रजाने सत्ता प्रस्थापित करण्याच्या हेतूने व्यापारी कंपनीचा माल ठेवण्यासाठी वसई, साष्टीमध्ये किल्ले बांधण्याची परवानगी मागितली. पण माधवरावांनी इंग्लंडमध्ये आम्हालाही दोन किल्ले बांधण्यास जागा द्यावी, ती मिळाली की आम्हीसुद्धा परवानगी देऊ, असे सांगून इंग्रजाची बोळवण केली. माधवराव असेपर्यंत आपल्याला येथे हातपाय पसरता येणार नाहीत, याची इंग्रजांना कल्पना आली, असे सांगत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी पेशवाईची महती सांगितली.
रत्नागिरीच्या स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे कीर्तनसंध्या परिवार आयोजित कीर्तन महोत्सवाच्या चौथ्या दिवशी ते बोलत होते. पानिपताच्या दुसऱ्या लढाईतील विजय आणि माधवराव पेशव्यांचे गुणवर्णन त्यांनी केले.
उत्तररंगामध्ये ते म्हणाले, पानिपतातील पहिल्या माघारीचा पराभव नानासाहेब पेशव्यांच्या जिव्हारी लागला. त्यानंतर त्यांचे अवघ्या ५० दिवसांनी निधन झाले. त्यांच्या जागी १६ वर्षांच्या माधवराव पेशव्यांची निवड झाली. काका राघोबा (रघुनाथराव) याचा कारस्थानी, अंतःस्थ स्वभावामुळे त्यांच्याऐवजी माधवरावांना qशदे, तुकोजी होळकर, रामशास्त्री प्रभुणे, नाना फडणवीस यांची भक्कम साथ मिळाली. मात्र राज्यकारभाराऐवजी अध्यात्माकडे वळलेल्या कोवळ्या वयातील माधवरावांची रामशास्त्रींनी कानउघाडणी केली. निस्पृहतेसाठी प्रसिद्ध असलेल्या रामशास्त्रींनी कलावंतीण, घरकाम करणाऱ्या बायका, नोकर विकण्याची प्रथा सर्वप्रथम बंद केली.
श्री. आफळे यांनी सांगितले, वीस वर्षांचा माधवराव कर्नाटक मोहिमेवर गेल्यानंतर राघोबाने पैठण लुटले. त्यादरम्यान पुणे लुटणाऱ्या निजामाला मदत करणारा माधवरावांचा मामा त्र्यंबक रास्ते याला ५० लाखांचा दंड रामशास्त्रींनी ठोठावला. त्यावेळी आईने दंड करू नको नाही तर मी घर सोडून जाईन व पुन्हा कधीही भेटणार नाही अशी माधवरावांना शपथ घातली. पण माधवराव न्यायाच्या बाजूने उभे राहिले. त्यांची आई गोपिकाबार्इंनी शनिवारवाडा सोडला व त्या नाशिकला गेल्या. त्यानंतर या दोघांची कधीही भेट झाली नाही.
माधवरावांबाबतचा एक किस्सा सांगितना आफळे म्हणाले, पेशव्यांच्या परवानगीने इंग्रजांनी बंदरात उभ्या केलेल्या बोटींवरील माल विसाजी लेले यांनी लुटला मात्र स्वराज्याच्या तिजोरीत न भरता तो स्वतःसाठी ठेवला. त्या प्रकरणात न्यायदानावेळी न्यायासमोर पेशव्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही, असे रामशास्त्रींनी बजावले. त्याचा गैरअर्थ घेऊन राघोबाने रामशास्त्रींना माधवरावांसमोर उभे केले. पण माझे विधान बदलणार नाही, असे सांगितल्यानंतर माधवरावांनीही रामशास्त्रींना मोत्यांची माळ व खंजीर दिला व माझ्याबाबतीतही असाच न्याय करा, असे सांगितले.
पानिपतावरील पहिल्या लढाईत झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आठ वर्षांनी ५५ हजारांची मराठी फौज पानिपतावर गेली. क्षय झाल्यामुळे माधवरावांना मात्र मोहिमेवर जाता आले नाही पण त्यांनी उत्तरक्रिया म्हणजे उत्तर दिशेला पानिपतावर मारल्या गेलेल्या मराठ्यांचे श्राद्ध न करता विजय मिळवून उत्तरक्रिया करा, असा आदेश दिला. या लढाईत मराठे विजयी झाले. यावर स्वा. सावरकरांनी उत्तरक्रिया हे नाटक लिहिले आहे. लढाईनंतर थेऊरच्या गणेशासमोर माधवरावांनी प्राण सोडला. तत्पूर्वी राघोबादादांनी पेशवाईचा हिस्सा मागितला व माधवरावांनी पेशवाई हे स्वराज्य आहे, वाटणीची गोष्ट नव्हे असे सांगितले. पण हिंदवी स्वराज्यात राघोबाचा अडथळा येऊ नये म्हणून थोडी तरतूद करून दिली. तरीही नंतर राघोबादादांनी पेशवेपदावर बसलेला माधवरावांचा भाऊ नारायणाचा बळी घेतला, असे श्री. आफळे यांनी सांगितले. अन्यायासी राजा न करी जरी दंड संत तुकारामांचा अभंग, तेजोनिधी लोहगोल हे नाट्यपद सुरेख झाले.

पाने वाहण्यापेक्षा बेलाची झाडे लावा
श्री. आफळे यांनी शरण हनुमंता या अभंगाने पूर्वरंग सुरू केला. हनुमंतांची नवविधा भक्ती वर्णन केली. आपण अमराठी प्रांतात गेलो की तिथली भाषा लगेच शिकतो पण अन्य भाषिक मातृभाषेला विसरत नाहीत. त्यामुळे आपण संस्कृत व मराठीची जोपासना केली पाहिजे. परिस्थितीनुसार पद्धती बदलायला हव्यात. पूर्वी अकरा लाख बेलपत्रे वाहत असत. आता झाडे तोडली गेली. पर्यावरणाची हानी झाली. म्हणून आता बेलाची पाने वाहण्याऐवजी अकरा बेलाची झाडे लावायला हवीत, हेच खरे पूजन होय, असा समाजोपयोगी संदेश श्री. आफळेबुवांनी दिला.
धोतर, सदरा हा हिंदूचा पारंपरिक वेष आहे. इंग्रजांनी भारतात पँट, शर्टचा प्रचार केला. आपण ते विसरलो. किमान आपल्या धार्मिक सणावेळी qकवा उत्सवामध्ये पारंपरिक वेष परिधान करा व संस्कृती जपण्यास हातभार लावा, असे आवाहनही त्यांनी केले.