Friday, 29 January 2016

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सव्वादोन वर्षांत - गडकरी



रत्नागिरी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण येत्या सव्वादोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी खात्री केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नीतिन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. २९ जानेवारी २०१६) व्यक्त केली.
       
निवळी येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन करताना
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नीतिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि अन्य मान्यवर.
रत्नागिरीजवळ निवळी येथे या महामार्गाच्या कशेडी ते लांजा या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. चौपदरीकरणाच्या या प्रकल्पाला सुमारे दहा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी एक टक्का रक्कम खर्च करून हा महामार्ग हरित द्रुतगती महामार्ग म्हणून ओळखला जाण्यासाठी वनीकरण केले जाईल
, असेही श्री. गडकरी म्हणाले. सागरी महामार्गाला केंद्र सरकारने निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी याच समारंभात केली होती. तिची दखल घेऊन सागरी महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची घोषणाही श्री. गडकरी यांनी केली. या महामार्गासाठी भूसंपादन करताना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांपेक्षाही अधिक मोबदला द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी समारंभात केली होती. त्याचा उल्लेख करून श्री. गडकरी म्हणाले, "या महामार्गासाठी जमीन देणाऱ्यांना सर्वाधिक म्हणजे हेक्टरी ४० लाख ते एक कोटी रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे."
          रत्नागिरीकोल्हापूर आणि गुहागरकराड महामार्गांच्या चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित असून निवळी ते जयगड रस्ता रुंदीकरण करण्यात येईल, असेही श्री. गडकरी म्हणाले. जयगड येथे मेरीटाइम विद्यापीठ स्थापन करण्यासाठी ५० कोटी रुपये देण्याची घोषणादेखील त्यांनी केली.
          "विकास हा महामार्गातून होतो हे चांगले माहिती असलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई ते गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू करून कोकणासाठी विकासाचा महामार्ग खुला केला आहे", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न गेल्या १५-२० वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. मात्र आता चर्चेचे दिवस संपून कृतीचे दिवस सुरू झाले आहेत, हे नितीन गडकरी यांनी दाखवून दिले आणि मंत्री झाल्यावर या महामार्गावरील १५ पुलांना तातडीने मान्यता दिली. आज या मार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही सुरू होत असल्याने हा महामार्ग भविष्यात विकासाचा महामार्ग ठरणार आहे. या महामार्गासाठी ज्यांनी जमीन दिली, त्या शेतकऱ्यांना आश्वस्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की, १०२ पैकी ९९ गावांत भूसंपादन पूर्ण झाले असून संपूर्ण देशात महाराष्ट्र हे जमीन संपादनासाठी सर्वांत जास्त मोबदला देणारे राज्य आहे.
          नितीन गडकरी यांनी १८ हजार कोटी रुपयांची कामे मंजूर केली असून त्यापैकी साडेतीन हजार कोटी रुपयांच्या या कामास सुरुवातही झाली आहे. राष्ट्रीय महामार्गांची लांबी दुप्पट करण्याचे काम करतानाच नितीन गडकरी यांनी एक लाख कोटींची रस्त्यांची कामे एकट्या महाराष्ट्रात सुरू केली आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या टेबलवर असलेले "अमेरिका श्रीमंत आहे कारण येथील रस्ते चांगले आहेत" हे वाक्य गडकरी यांनी तंतोतंत अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
       अलीकडेच आम्ही बंदर विकासाचे नवे धोरण जाहीर केले, परंतु हे करताना केवळ बंदर विकासावरच लक्ष केंद्रित केले नसून पर्यटन व पर्यावरणपूरक विकासावर आमचा भर आहे. विशेषत: यामुळे कोकणासारख्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. ज्या देशात समुद्रकिनाऱ्यांचा उत्तम पद्धतीने आणि पर्यावरणपूरक विकास झाला आहे, तो भाग समृद्ध झालेला दिसतो. अशाच रीतीने कोकण किनारपट्टीचा विकास करणार आहोत, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यानी यावेळी केंद्रीय पेटोलियम मंत्र्यांचे आभार मानताना सांगितले की कोकणात ग्रीन रिफायनरी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने येथील एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यानिमित्ताने तेथे पाच हजार एकरावर जंगल आणि हरित पट्टा निर्माण करण्यात येणार असल्याने निसर्गाचे संवर्धन होणार आहे.
       पनवेल-महाड-पणजी असा ४७१ किलोमीटरचा हा महामार्ग रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयांतून जातो. आज  ज्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन झाले, ते ३ टप्पे असे - कशेडी खवटी ते परशुराम घाट (४३.८० कि.मी.), आरवली ते कांटे (४० कि.मी.) आणि कांटे ते वाकेड (५०.९० कि.मी.). या कामांसाठी सुमारे तीन हजार ५३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
       यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, वित्त राज्य मंत्री दीपक केसरकर, खासदार हुसेन दलवाई, विनायक राऊत, अमर साबळे, आमदार हुस्नबानू खलिफे, उदय सामंत, राजन साळवी, सदानंद चव्हाण, आशीष शेलार, निरंजन डावखरे, संजय कदम, वैभव नाईक, प्रशांत ठाकूर त्याचप्रमाणे राजेंद्र महाडीक, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment