Sunday 10 January 2016

इतिहासाचा चुकीचा अर्थ नको, समग्र अभ्यास करावा – चारुदत्त आफळे
रत्नागिरी : पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळाकडे उपलब्ध असलेल्या मोडी लिपीतील अनेक कागदपत्रांचे भाषांतर, संशोधन सुरू आहे. इंग्रजांनी कोट्यवधी कागदपत्रे जाळली तरी आज चार कोटी कागदपत्रे उपलब्ध आहेत. रासायनिक प्रक्रियेद्वारे हा प्रत्येक कागद खरा आहे किंवा कोणत्या सालातील आहे, हे समजते. त्यातून हिंहदवी स्वराज्याचा खरा इतिहास कळणार आहे. काही वेळा एखाद्या कागदावरून अर्थ न लावता समग्र वाचल्यानंतरच अर्थ घ्यावा. कारण अर्धवट माहितीतून गैरसमज पसरतात आणि एखाद्या व्यक्तीचे कार्य पुढे येत नाही. याकरिता शाळांमध्ये शिक्षकांनी इतिहास शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांना खरा इतिहास सांगावा, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.
रत्नागिरीच्या गुरुकृपा मंगल कार्यालयात शनिवारी (ता. ९ जानेवारी २०१६) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी कीर्तनसंध्या परिवाराचे अवधूत जोशी, नितीन नाफड, उमेश आंबर्डेकर उपस्थित होते.
रत्नागिरीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून ऐतिहासिक विषयांवरील कीर्तने आयोजित करून जनजागरण करणारा कीर्तनसंध्या परिवार हा महाराष्ट्रातील एकमेव गट म्हणावा लागेल. कारण उत्सवापुरती मर्यादित असलेली कीर्तने सभागृहातून यंदा क्रीडा संकुलापर्यंत आली. यावरून रत्नागिरीकरांचे कीर्तनावरील प्रेम दिसून येते. याकरिता रत्नागिरीतील सर्वच वृत्तपत्रांनी भरपूर प्रसिद्धी दिल्याबद्दल श्री. आफळे यांनी विशेष आभार मानले. या बातम्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही पोहोचल्या असून तिथले श्रोते माझ्याकडे विचारणा करतात, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, हिंदवी स्वराज्याच्या दप्तरातील सव्वा कोटी कागदपत्रांचे भाषांतर झाले आहे. त्यातून खरा इतिहास उलगडतो आहे. मात्र उर्वरित पत्रांचे भाषांतर व संशोधनासाठी युवकांनी पुढे यावे. इतिहासात चांगले करिअर करता येईल. मोडी लिपीतील अनेक कागदपत्रांचे संशोधन सुरू आहे. इंग्रजांनी किल्ले qजकल्यानंतर कोट्यवधीची कागदपत्रे जाळून टाकली होती. त्यातूनही अनेकांनी ही कागदपत्रे जपून ठेवली. आता रासायनिक प्रयोगशाळेमध्ये प्रत्येक कागद खरा आहे किंवा कोणत्या सालातील आहे, हे कळत असल्याने कागदांविषयी सत्य माहिती मिळते. शाळेमध्येही इतिहास शिबिरे घेऊन खरा इतिहास सांगण्याचे काम शिक्षकांनी करावे. एखाद्या कागदावरून अर्थ न लावता समग्र वाचल्यानंतरच अर्थ घ्यावा. कारण अर्धवट माहितीतून गैरसमज पसरतात.
ते म्हणाले, कीर्तन म्हणजे मंदिरामध्ये जन्मोत्सव कार्यक्रमावेळी केले जाते. पण त्यावेळी जन्मोत्सवाचाच विषय असतो. हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील दडलेले क्षण बाहेर काढण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. मात्र कीर्तनसंध्याने येथे जाणीवपूर्वक केलेला हा महोत्सव भावी पिढीसाठी उपयुक्त ठरणारा आहे.

No comments:

Post a Comment