Saturday, 9 January 2016

कीर्तनसंध्या महोत्सव पुष्प तिसरेपानिपतावर सतत मराठशाहीचा विजयच, पण

रत्नागिरी : पानिपतची पहिली लढाई वर्षभर चालली. प्रत्येक लढाईत सदाशिवरावभाऊ, विश्वासराव पेशवे व सहकाऱ्यांनी अहमदशहा अब्दालीवर विजय मिळवला. मात्र दिल्लीकडे कूच करताना अंतिम अडीच तासांत सेनेला पराभव पत्करावा लागला. यात ७० हजार सेना, यात्रेकरू गेले. पण वर्षभरात अब्दालीची दीड लाखांची सेना मराठशाहीने गारद केली. एका बाजूला पराभव झाला तरी दुसरीकडे हिंदवी स्वराज्याचा विजयही झाला होता, हे विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.
रत्नागिरीच्या स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात कीर्तनसंध्या आयोजित कीर्तन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ते बोलत होते. या वेळी प्रसाद करंबेळकर (तबला), हर्षल काटदरे (ऑर्गन), राजा केळकर (पखवाज, ढोलकी) आणि महेश सरदेसाई (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली.
पानिपतच्या पहिल्या लढाईचा सविस्तर रणसंग्राम बुवांनी उलगडला. ते म्हणाले, पानिपतामध्ये मराठशाहीचा पराभव झाला असला तरीही अखेरच्या दिवशी मकरसंक्रांतीला सकाळी ६ ते दुपारी २ या वेळेत मराठी सैन्याने अब्दालीवर विजयच मिळवला होता. अब्दालीने पराभव होणार या भीतीने सैन्याला पंजाबकडून इराणकडे जाण्यास सांगितले होते. इकडे सदाशिवरावभाऊंनी गारद्यांच्या सूचनेनुसार विशिष्ट व्यूहरचना करून सेनेची अंडाकृती रचना करून दक्षिणेकडे कूच केले. पण हत्तीवर बसलेल्या विश्वासराव पेशव्याला गोळी लागल्याने मराठी सैन्यात गोंधळ उडाला. शिस्त न पाळणे आणि गारद्यांनी सुचविलेल्या रणनीतीवरील अविश्वासामुळे मराठी सरदारांनी सहकार्य न केल्याने अडीच तासात सत्तर हजार सेना संपली. मात्र एक वर्षाच्या काळात अब्दालीचे दीड लाख फौज मराठी सैन्याने संपवली होती. त्यामुळे एका बाजूला पराभव झाला तरी हिंदवी स्वराज्याचा विजयही विसरून चालणार नाही.
तत्पूर्वीच्या लढाईत रघुनाथराव तथा राघोभरारी पेशव्याने पराक्रम करून अटकेपर्यंत भगवा फडकावला. अब्दालीच्या सैन्याला मागे रेटले. नजीबखान, कुतुबशहाने दत्ताजी शिंशदेला क्रूरपणे मारले. पण त्याचा वचपा मराठी फौजेने पानिपतावरील लढाईपूर्वी कुंजपुरा किल्ला घेऊन कुतुबशहाला संपवले. हा किल्ला घेतला तरी फौज दोन महिने तीर्थयात्रा करत राहिली. त्यावेळी सदाशिवराव पेशवे दिल्ली गाठू या असे सांगत होते. पण वेळेचा उपयोग केला नाही.
पूर्वरंगामध्ये देव बसे जिचे चित्ती या अभंगावर त्यांनी निरूपण केले. ते म्हणाले, अलीकडे महिलांचे संस्कारांकडे दुर्लक्ष होत असून महिला उपासनेपासून दूर गेल्या आहेत. त्यांच्या वेशाबाबतही समुपदेशनाची गरज निर्माण झाली आहे. सुट्टीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने सामूहिक उपासनेसह एकत्र राहणे, जेवणे आवश्यक आहे. अलीकडे समुपदेशन नसल्याने कोणताही वेश परिधान केला जातो. यामुळे मुलींवरही अन्या होतो. नको तितक्या मोकळ्या वागण्याने प्रश्न निर्माण होतात. मुलींचा वेष मनावर परिणाम करत असल्याने तो चांगलाच असावा. मुलगा व मुलीला सर्वच बाबतीत समान न्याय न देता मुलीला काचेप्रमाणे संरक्षण देण्याची गरज आहे. स्त्रिया, पुरुष व युवक, युवतींचे संघटन हवे. उपासनेची शक्ती व शक्तीची उपासना गरजेची आहे. कुटुंबामध्येही ती व्हावी.


कीर्तन महोत्सवाची रविवारी सांगता
पाच दिवसांच्या कीर्तन महोत्सवाची रविवारी (ता. १०) दिमाखात सांगता होणार आहे. यामध्ये श्री. आफळेबुवा ४० दिवसांच्या सवाई माधवराव पेशव्याला बारभार्इंनी वीस वर्षे कसे सांभाळले हे सांगणार आहेत. महादजी शिंशदे, रामशास्त्री प्रभुणे, सखाराम बापू बोकील आणि नाना फडणवीस आदी १२ जणांनी हिंहदवी स्वराज्य राखले. फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज आणि घरभेद्यांचा सामना करत त्यांनी पेशवाईसाठी दिलेले अमूल्य योगदान बुवा उलगडणार आहेत.

No comments:

Post a Comment