हिंदवी स्वराज्याला नानासाहेब पेशव्यांनी लावली प्रशासकीय शिस्त
चारुदत्त आफळे : दुसऱ्या दिवशी पाच हजार श्रोत्यांची गर्दी
रत्नागिरी : ``हिंदवी
स्वराज्याचा कारभार पुण्यात नेल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी भविष्याचा विचार करून
पुण्याचे सुशोभीकरण करण्यावर भर दिला. शहर वसविण्यासाठी कष्टकरी व सेवेकरी दहा
ज्ञातीतील लोकांना कर माफ केला. मुळा, मुठा
नद्यांचे ९० टक्के पाणी शेतकऱ्यांसाठी पुरविले जाईल, अशी व्यवस्था केली..
कात्रजच्या जलाशयात मोठे हौद बांधून दगडी नळ्यांद्वारे शहरात पाणीपुरवठा केला.
नानांच्या दूरदृष्टीने हिंदवी स्वराज्याला प्रशासकीय शिस्तही मिळाली``, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार
चारुदत्त आफळे यांनी केले.
येथील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात सुरू असलेल्या कीर्तनसंध्या
महोत्सवातील दुसऱ्या दिवशीचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी पाच हजार श्रोते
उपस्थित होते. या वेळी बुवांना हर्षल काटदरे, प्रसाद
करंबेळकर, राजा केळकर आणि महेश सरदेसाई यांनी
साथसंगत केली.
श्री. आफळे यांनी पूर्वरंगामध्ये `आपुलिया
हिता जो जागता, धन्य मातापिता तयाचिया`
हा अभंग निरूपणाला घेतला. भगवद्गीतेमधील कर्मयोग, सावतामाळीची
कथा सांगितली. मंत्रपुष्पांजली म्हणजे सर्व हिंदूंचे राष्ट्रगीत आहे. नाशिकला
झालेल्या कुंभमेळ्यामध्ये सर्व पंथांनी मिळून दहा श्लोकांचे स्तोत्र तयार केले
आहे. ते सर्व पंथांनी म्हणावे. हिंदू म्हणून एकत्र येण्याचा हा प्रयत्न असून हे
सर्व एकत्र असल्याची भावना निर्माण होण्यासाठी हे स्तोत्र म्हणावे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ``बाजीरावांनंतर पेशवेपद कोणाला द्यावे हा
प्रश्न होता. छत्रपती शाहूंनी या पदासाठी इच्छुक असलेल्या काही जणांची पारख करून
अखेर बाजीरावांचे बंधू नानासाहेब यांना अठराव्या वर्षी हे पद दिले. त्यांनी वीस
वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक युद्धे जिंकली आणि प्रशासकीय घडी नीट बसवली. पहिल्या
चार वर्षांतच बुंदेलखंडामध्ये समेट घडवला. त्यासाठी बाजीराव-मस्तानी पुत्र समशेरबहाद्दर
याची मदत घेतली. एका बाजूला पोर्तुगीजांचा धोका व दुसरीकडे सावनूरचा नबाब
कोल्हापूरवर चाल करून येणार होता. त्यावेळी तुळाजी आंग्रेंच्या आरमाराने हिंदवी
स्वराज्याविरोधात बंड पुकारल्याने नानासाहेबांनी क्षणभर इंग्रजांशी हातमिळवणी
केली. नंतर नानांनी नवीन आरमार उभारून ते समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले. निधनापूर्वी
छत्रपती शाहूंनी नानासाहेब पेशव्यांना बोलावून वंशपरंपरागत पेशवाई देतो, असे कागद करवून घेतल्याचे सांगितले. मात्र
नानांनी त्यास स्पष्ट नकार दिला आणि हिंदवी स्वराज्याच्या गादीवर भोसले वंशच असावा, असे निक्षून सांगितले. त्यानुसार नानांनी
ताराराणीचा नातू दुसरा राजाराम याला
गादीवर बसवले. शाहूंच्या सांगण्यानुसार स्वराज्याची सर्व कागदपत्रे, दरबार पुण्यात नेला. परंतु अंतिम शिक्कामोर्तब सातारच्या गादीकडेच राहील, अशी व्यवस्था केली. पुण्यामध्ये
पर्वतीवर नानांनी देवदेवेश्वर संस्थानात पंचायतन स्थापन केले. त्यातील एका
कोनाड्यात शाहूंच्या पादुका पूजनासाठी ठेवल्या होत्या. यावरूनच त्यांची शाहूनिष्ठा
दिसून येते.``
माणसांची पारख नानासाहेब सुरेख करत होते. न्यायमूर्ती रामशास्त्री
प्रभुणेही त्यातीलच एक. हिंदवी स्वराज्याचे मुख्यालय पुण्यात नेले. मराठशाहीचे
अधिकार माळवा ते बंगाल आणि चित्रदुर्ग, दक्षिणेकडील
विस्तीर्ण भागात असल्याने तिथले लोक कामानिमित्त पुण्यात यायचे. त्यातून पुण्याची
लोकसंख्या वाढणार होती. याकरिता सेवेकऱ्यांच्या दहा ज्ञातींचा कर माफ केला. शहर
सुशोभीकरणामध्ये नानांनी विशेष लक्ष दिले. गणेश हे पेशव्यांच्या आराध्य दैवत. त्यामुळे
थेऊरच्या गणपतीला पेशव्यांची सुवर्णतुला केली जायची. नानासाहेबांची तीन वेळा तुला
झाली आणि त्यातील मोहरा दारिद्र्यरेषेखालील लोकांना देण्यात आल्या.
शनिवारवाड्याच्या दुरुस्तीनंतर नानांनी कारभारासाठी गणेशमहाल, गणेश दरवाजा, दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा अशी नावे दिली. बावनखणी
हे विविध प्रांतांमधली कलाकारांचे दालन होते. त्यावेळी बैठकांमध्ये एखाद्या सरदार, प्रेक्षकाला नाकारण्याचा अधिकार या
कलावंतांना होता. दुर्दैवाने कलावंतीणी देहविक्रय करतात, असा गैरसमज समाजात पसरवला गेला, अशी खंत
आफळेबुवांनी व्यक्त केली.
``बुंदेलखंड, बंगालच्या लोकांनी आम्ही पेशव्यांना कर
का द्यायचा अशी बंडाळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नानांनी खरमरीत पत्र लिहून
त्यांना ठणकावले,
तुमच्या प्रांताच्या संरक्षणासाठी मराठ्यांच्या
फौजा येतात. तुमची सुरक्षा आम्ही करतो, त्यासाठी हा कर दिला पाहिजे. हा कर हिंदवी
स्वराज्यासाठीच वापरला जातो. आजही भारतामध्ये अशी दुहीची भाषा केली जाते. नागालँड, मिझोराम आदी राज्ये "आमचा दिल्लीशी काय संबंध?" असे विचारतात. अहिंदूंची संख्या
वाढल्यानंतर भारताने हजारो वर्षे अन्याय पाहिला आहे. पुन्हा असे घडू नये यासाठी हिंदूंनी
आता जागे झाले पाहिजे. इंग्रजांनी ब्राह्मण आणि इतर हिंदूंमध्ये फूट पाडली,
तेव्हाच त्यांना राज्य करता आले. मात्र आज हिंदूंनी जागरूक राहण्याची गरज आहे,`` असे मतही श्री. आफळे यांनी व्यक्त
केले.
................................................................
`झोंपाळ्यावरच्या गीते`च्या पाठांतर स्पर्धा घ्याव्यात
कवी अनंतततनय यांनी
शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्या `झोंपाळ्यावरची
गीता` या
भगवद्गीतेच्या ओवीबद्ध मराठी श्लोकसंग्रहाचा आफळेबुवांनी पूर्वरंगात आवर्जून उल्लेख
केला. झोपाळ्यावर बसून सहज गुणगुणाव्यात आणि त्या गुणगुणताना गीतेचा अर्थ समजावा,
अशी या गीतेची रचना आहे. सुबोध मराठीमध्ये लिहिलेले हे श्लोक ओव्यांप्रमाणे पाठ
कराव्या आणि गीतेविषयीची गोडी वाढविण्याकरिता या झोंपाळ्यावरची गीतेच्या पाठांतर
स्पर्धा घ्याव्यात, असे, त्यांनी सूचित केले. तसेच झोंपाळ्यावरच्या गीतेमधील कर्मयोग
या तिसऱ्या अध्यायातील
कर्माहूनी जरी । वरचढ बुद्धी । कर्म करीं आधीं । सांगसी कां ?
नको घोटाळून । घेऊं देवा मशीं
। सांग हृषीकेशी । एक कांहीं ।।
कर्मयोग्या कर्म । सांख्यियांना
ज्ञान । दोन्हीही प्रमाण । कृष्ण बोले ।।
कर्म न केल्यानें । कर्मशून्यता
न । कर्म टाकील्यानं । ज्ञान नाही ।।
कर्म केल्यावीण । सांग राहे
कोणे? घडवीती गुण । कर्म लोकीं ।।
कर्म टाकल्यानें । देहही चालेना
। म्हणूनी अर्जुना । करावें तें ।।
स्वधर्म म्हणोनी । कर्म तें करावें । परी नसूं
द्यावें । फलीं मन ।।
या ओव्या
त्यांनी गाऊन दाखविल्या.
(`झोंपाळ्यावरची
गीता` हे पुस्तक रत्नागिरीच्या
कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसतर्फे सत्त्वश्री प्रकाशनने अलीकडेच पुनर्मुद्रित
केले आहे.)
................
`झोंपाळ्यावरची
गीता` या
पुस्तकाविषयी निरूपण करताना राष्ट्रीय
कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा
|
No comments:
Post a Comment