Tuesday, 23 October 2018

कैरीचा आस्वाद म्हणजे कोकणचा अस्सल अनुभव


      सागराची अथांगता, गर्द वनराईमधली आणि नारळी-पोमळीच्या बागांमधली शांतता, कौलारू घरांमधला निवांतपणा आणि आंबट-गोड रानमेव्याचा आस्वाद या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी अनुभवायच्या असतील, तर त्याचं एकमेव उत्तर कोकण हे आहे. इथल्या या सगळ्या वातावरणाला एक ईश्वरी स्पर्श असलेला जाणवतो. कारण या सगळ्यातून मिळणारं समाधान मोजता न येण्याइतकं मोठं असतं. म्हणूनच आवर्जून फिरण्याच्या ठिकाणांच्या पर्यटकांच्या यादीत कोकण पहिल्या काही नंबरांत असतं. मग ती वीकेंडची शॉर्ट ट्रिप असो किंवा मोठ्या सुट्टीतली मोठी सहल, कोकण कायमच रिफ्रेश करून टाकतं.


      अशा या रिफ्रेशिंग कोकणात आल्यानंतर राहायला हॉटेल्स खूप असली, तरी कोकणाचा खरा फील हॉटेलमध्ये राहून नक्कीच येत नाही; पण मग फिरायला आल्यावर राहणार कुठे? आणि कुठे तरी दुर्गम भागात राहायला गेल्यावर कदाचित चांगला अनुभव घेता येईलही; पण तिथे बाकीच्या सोयी कशा असतील, तिथून बाकीच्या ठिकाणचं पर्यटन करणं किती अवघड असेल, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात उभे राहिले असतील. या सगळ्या प्रश्नांचं समाधान करणारं उत्तर कोकणाशी खूप जवळचा संबंध असलेल्या एका शब्दात सामावलेलं आहे. तो शब्द म्हणजे कैरी.

      होय. कैरी! रत्नागिरी तालुक्यातल्या नेवरे गावातल्या उंबरवाडीत मकैरी विश्रांतीस्थळम वसलेलं आहे. अभय खेर आणि त्यांचे पुत्र किरण
खेर यांनी हे विश्रांतीस्थळ उभारलं आहे.

      हे नेवरे गाव आहे रत्नागिरी-गणपतीपुळे रस्त्यावर, रत्नागिरी शहरापासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर.

कैरीपासून गणपतीपुळ्याचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे. शिवाय, नेवरे-काजिरभाटी, आरे आणि वारे, भंडारपुळे असे अनेक विस्तीर्ण आणि शांत समुद्रकिनारे इथून केवळ दोन-तीन किलोमीटरच्या परिसरात आहेत. गणपतीपुळ्यापासून पुढे दोन किलोमीटरवरच्या मालगुंड गावात कवी केशवसुतांचं स्मारक आहे. रत्नागिरी शहरातल्या आणि जवळपासच्या पर्यटनस्थळांबद्दल तर तुम्हाला माहिती असेलच.

      हे झालं आजूबाजूच्या पर्यटनस्थळांबद्दल... पण कैरीबद्दल काय?

      कैरी विश्रांतीस्थळ म्हणजे नेमकं काय आहे, हा प्रश्न अजूनही मनात असेलच ना! तर त्याबद्दल थोडी माहिती घेऊ या. हे विश्रांतीस्थळ खेर कुटुंबीयांच्या सात एकर क्षेत्रावरच्या शेतात आहे. नैसर्गिक डोंगरउतारावर कोकणातल्या पद्धतीनं उभारलेली पाच कौलारू घरकुलं म्हणजेच कॉटेजेस इथं आहेत. कोकणचं वैशिष्ट्य असलेल्या जांभ्या दगडापासून म्हणजेच चिर्‍याचा वापर करून ही घरं उभारली आहेत. छपरासाठी मंगलोरी कौलं वापरली आहेत. घरांना आतून आणि बाहेरूनही सिमेंटचा गिलावा केलेला नाही. बाहेरून ही घरं कोकणी पद्धतीची दिसत असली, तर आतून मात्र ती सर्व सोयींनी परिपूर्ण आहेत. नारळी-पोफळीच्या बागा, आंबा, काजू, मणस आणि बाकी सगळ्या कोकण मेव्याच्या समृद्ध वनराईच्या सान्निध्यात असलेली ही घरकुलं निवांतपणाचा नितांतसुंदर अनुभव देतात. विशेष म्हणजे कॉटेज उभारताना एकही जुनं झाड तोडलेलं नाही. सर्व झाडं मूळ अवस्थेत आहेत. पांगार्‍याचं एक झाड छप्पर घालताना अडचणीचं ठरत होतं. तरीही ते झाड न तोडता छपराचा तेवढा भाग आत घेतला आहे. थोडक्यात म्हणजे घरं बांधण्यासाठी नेहमीच्या रिवाजाप्रमाणे झाडं न तोडता आवश्यकतेनुसार घरांची जागाच मागेपुढे हलविली आहे. त्यामुळे पाच घरांच्या या ओळीला एक नैसर्गिक महिरपही लाभल्याचं उंचावरून पाहताना दिसतं. पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी ही खबरदारी जाणीवपूर्वक घेतली आहे. प्रत्येक कॉटेज स्वतंत्र असली, तरी चिर्‍याच्या पाथवेनं ती एकमेकांना जोडली आहेत.

      अशा वातावरणात असलेल्या या घरकुलांत राहण्याच्या अनुभवाची तुलना अन्य कशाशी करता येणार नाही. कारण तो अनुभव खराखुरा निवांतपणा देणारा आणि रिफ्रेश करणारा असतो. बरं, हे विश्रांतीस्थळ गावात असलं, तरी शहरी पर्यटकांच्या गरजा पूर्ण करणार्‍या सर्व सुविधा इथं आहेत. त्याची अजिबातच काळजी नको. कोकणातला हा डोंगराळ भाग आहे. त्यामुळे विजेची समस्या अधूनमधून उद्भवते. दिवसा ठीक आहे, पण रात्री वीज नसेल, तर काय करायचं, असा प्रश्न निर्माण होईल. त्याचा विचार कैरी विश्रांतीस्थळावर केला आहे, इन्व्हर्टची सुविधा आहे. गरम पाण्याची केटल् व चहा-कॉफीची सामग्री प्रत्येक कॉटेजमध्ये आहे. सर्व पाचही कॉटेजमधली कमोडची सुविधा असलेली टॉयलेट चांगली ऐसपैस आहेत. बेसिन, शॉवरची सोय तर आहेच, पण विजेवरच्या गीझरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

      उत्तम प्रकारच्या कोकणी नाष्टा व भोजनाचा आस्वाद तुम्हाला घ्यायचा असेल, तर मात्र त्यासाठी आधी तसं कळवावं लागेल. कळवलं, तर तशी व्यवस्था करता येऊ शकेल.

      याशिवाय कॉमन फॅसिलिटी हॉलमध्ये वॉशिंग मशीन, फ्रिजचीही सुविधा असेल. म्हणजेच आधुनिक सुविधा आणि कोकणाचा खरा अनुभव यांची सांगड या विश्रांतीस्थळात उत्तमरीत्या घातलेली आहे.

      ज्या हंगामात तुम्ही याल, त्या हंगामातल्या रानमेव्याची अस्सल चव चाखता येईलच; पण जवळूनच वाहणार्‍या संथ, शांत ओढ्याच्या काठावर फिरता येईल. सात एकरात पसरलेल्या अस्सल कोकणी शिवारात सहज फेरफटका मारता येईल. आंबा, पोफळी अशा जुन्या खास कोकणी झाडांची राई या भागात आहेच, पण नारळी-पोफळीची नवी लागवडही केली आहे. याच शिवारात श्री. खेर यांनी कोकणीपणाला साजेसंच स्वतःचं घर उभारलं आहे. तब्बल सतरा फूट व्यासाची विहीर घराजवळच बांधली आहे. याच विहिरीतून सर्व कॉटेजना अखंड पाणीपुरवठा होतो.

      कोकणात धावतपळत फिरायला येण्यासाठी नव्हे, तर धकाधकीच्या जगण्यातून थोडासा चेंज म्हणून अस्सल कोकणपण अनुभवण्यासाठी, कोकणातल्या शांत वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी या कॉटेजमध्ये राहायला या. निवांत राहा. शांतता मिळवा. चिंता विसरा आणि फ्रेश होऊन परत जा. आणि हे सगळं अगदी किफायतशीर दरांत.

      मनात आलं तर आजूबाजूच्या पर्यटनस्थळांवर सवडीनं फिरणंही सोपं अगदी सहज शक्य आहे.

      थोडक्यात सांगायचं तर, कोकणात आल्यावर या कैरीचा आस्वाद घ्यायला पर्याय नाही!

      एक मात्र आहे, कैरी विश्रांतीस्थळावर सर्व सोयीसुविधांनी सज्ज असलं, तर राहण्यासाठी मात्र ही घरं 28 डिसेंबर 2018 नंतरच उपलब्ध होणार आहेत.

- प्रमोद कोनकर

..............

पत्ता : कैरी विश्रांती, उंबरवाडी, नेवरे, ता. जि. रत्नागिरी

संपर्क : किरण खेर - 9657932617 (मोबाइल, व्हॉट्सअ‍ॅप)

अभय खेर - 9422319711

Email - abhaykher@yahoo.co.in

......................



कैरी विश्रांतीस्थळावरील घरांची आणि परिसराची झलक पाहण्यासाठी खाली दिलेली यूट्यूबची लिंक क्लिक करा -




............

Saturday, 13 October 2018

कुरतडे येथील संतोषीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा जागर सुरू



संतोषीमाता
      रत्नागिरी – कुरतडे (ता. रत्नागिरी) येथील पालवकरवाडीतील संतोषीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा जागर सुरू झाला आहे.
      कुरतडे येथील पालवकरवाडीतील निसर्गरम्य परिसरात एकतीस वर्षांपूर्वी संतोषीमाता मंदिराची स्थापना करण्यात आली. परिसरातील ग्रामस्थांनी वर्गणी काढून मंदिराची उभारणी आणि सुशोभीकरण केले. त्यामध्ये चाकरमान्यांचा मोठा हातभार लागला. मंदिर स्थापन झाल्यापासून दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने गरबा नृत्यही आयोजित केले जाते. यावर्षीही नवरात्रोत्सव थाटात सुरू झाला आहे. पारंपरिक पद्धतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये दररोज देवीची आरती केली जाते. त्यामध्ये भाविकांचा मोठा सहभाग असतो. लहा मुले तसेच पुरुष आणि महिलांसाठीही दररोज फनीगेम्स घेतले जातात. तरुणांच्या आकर्षणाचा बिंदू असलेल्या गरबानृत्याचा कार्यक्रम दररोज रात्री आयोजित केला जातो. कोकणाची ओळख असलेल्या जाकडी नृत्याचे कार्यक्रमही केले जात असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
      नवरात्रोत्सवातील विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन जय संतोषीमाता नृत्य नाच नमन मंडळातर्फे नारायण पालवकर  आणि गोपाळ पालवकर यांनी केले आहे.
........
कुरतडे (ता. रत्नागिरी) पालवकरवाडीतील संतोषीमाता मंदिर.


-    ...................

Sunday, 7 October 2018

रत्नागिरीत दर महिन्याला सायकल फेरीचे आयोजन करावे – राहुल पंडित


      रत्नागिरी : सुदृढ आरोग्यासाठी सायकलिंग आवश्यक असून या उपक्रमाच्या प्रसारासाठी दरमहिन्याला रत्नागिरीत सायकल फेरीचे आयोजन केले पाहिजे. नगरपालिकेकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी दिली.

वीरश्री ट्रस्ट आणि ट्रिनिटी हेल्थ क्लबच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत नव्यानेच स्थापन झालेल्या सायकल क्लबतर्फे रत्नागिरी शहर ते हातखंबा आणि परत अशा वीस किलोमीटरच्या पहिल्या सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष श्री. पंडित यांनी रत्नागिरी ते हातखंबा आणि परत ही संपूर्ण फेरी पूर्ण केली. त्यानंत समारोप प्रसंगी ते बोलत होते.

तत्पूर्वी फेरीचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी सहा वाजता झाले. शिवाजीनगर आठवडा बाजाराजवळ आयटीआयसमोर या फेरीचा प्रारंभ झाला. शहरात दुचाकी, चारचाकी व रिक्षांची भरपूर वाहतूक असते. त्यामुळे या रस्त्यांवरून सायकलस्वारांना जाताना अडथळ्यांना सामोरे जावे लागते. याकरिता स्वतंत्र ‘सायकल ट्रॅक’ करावा, अशी विनंती वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली. जिल्हाधिकार्यांंनी त्याला सहमती दर्शवत नव्या रस्त्यांवर अशी सुविधा देण्याचा मानस असल्याचे सांगितले. उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी काही वेळ स्वतः सायकलने या फेरीत सहभागी झाले. वीरश्री ट्रस्ट आणि रत्नागिरी सायकल क्लबचे अध्यक्ष, रत्नागिरीतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश शिंदे यावेळी म्हणाले की, रत्नागिरी सुंदर शहर आहे. ते तसेच राहावे, हे एक नागरिक म्हणून मनापासून वाटते, तर एक डॉक्टर म्हणून सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये रत्नागिरीकरांचे आरोग्य उत्तम राहावे हीदेखील भावना आहे. त्यातूनच सायकल क्लबची स्थापना करण्यात आली असून या क्लबचे उद्घाटन म्हणून सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सायकलिंग ही सर्वांची सवय बनावी, हा आमचा प्रयत्न असेल.

फेरीच्या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक अनिल विभूते, जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ३०० विद्यार्थ्यांच्या फेरीचे उद्घाटन नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी केले. या वेळी रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते धरमसी चौहान यांनी फेरीला झेंडा दाखवला.
फेरीसोबत रिकामा टेम्पो, वैद्यकीय व्यवस्था, रुग्णवाहिका ठेवण्यात आली होती. मार्गावर एनर्जी ड्रिंक, पाणी देण्याची व्यवस्था 10 ठिकाणी केली होती. येथे सामाजिक संस्थांनी सहकार्य केले. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे चिरायू हॉस्पीटलशेजारील स्टॉलवर पाणी, बिस्कीटे व एनर्जी ड्रिंकची सुविधा सायकलपटूंना दिली. पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय महाडिक यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.
वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे, डॉ. तोरल शिंदे, डॉ. निशीगंधा पोंक्षे, नितीन दाढे तसेच धन्वंतरी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी, सामाजिक संस्थांनी या फेरीचे उत्तम नियोजन केले होते. त्यांना इंडियन मेडिकल असोसिएशन, जाणीव फाउंडेशन, रोटरी क्लब, लायनेस क्लब, लायन्स क्लब, संस्कार भारती, मानवता संयुक्त संघ, रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघ, लेन्स आर्ट, बाबुराव जोशी गुरुकुल व अॅधड. नानल गुरुकुल या संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. क्रेडाई, गद्रे मरीन्स, हिंद सायकल, कार्निव्हल, ट्रॅक्विलिटी यांचे सहकार्य लाभले. सांगता कार्यक्रमात सहभागी मोठ्या व्यक्तींना मेडल्स देण्यात आली तर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
आरोग्यवर्धक आणि इंधनाची बचत करणार्या  सायकल फेरीमुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. असे उपक्रम दोन महिन्यांतून एकदा तरी व्हावे, अशी अपेक्षा सार्यां्नी व्यक्त केली.
नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी स्वतः वीस किलोमीटरची रॅली पूर्ण केली. हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे. स्वच्छ सुंदर रत्नागिरी प्रदूषणमुक्ततेकडे वाटचाल करण्यासाठी इंधन बचत करणारी व फिटनेस राखणारी सायकल सर्वांनी चालवावी व ‘सायकल डे’ साजरा व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली.
सुदृढ आरोग्य, सुंदर शहर आणि वाढते इंधन दर यावर एकत्रित उपाय म्हणून सायकलस्वारांना प्रोत्साहन देण्याकरिता क्लब स्थापन झाला. आजच्या रॅलीनंतर सभासद संख्या वाढू लागली आहे. दररोज सायकलिंग आणि दर रविवारी सायकल भ्रमण मोहीम सुरू करण्याचा मानस या क्लबचा आहे.
  
 

.............

सायकल फेरीच्या समारोप समारंभात बोलताना रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित. सोबत डॉ. सौ. निशिगंधा पोंक्षेडॉ. नीलेश शिंदेडॉ. सौ. तोरल शिंदे.
..........


सायकल फेरीच्या आयोजनाविषयी डॉ. नीलेश शिंदे यांचे मनोगत पाहा कोकण मीडियाच्या यूट्यूब चॅनेलवर. त्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा –



............