सागराची अथांगता, गर्द वनराईमधली आणि नारळी-पोमळीच्या बागांमधली शांतता, कौलारू घरांमधला निवांतपणा आणि आंबट-गोड रानमेव्याचा आस्वाद या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी अनुभवायच्या असतील, तर त्याचं एकमेव उत्तर कोकण हे आहे. इथल्या या सगळ्या वातावरणाला एक ईश्वरी स्पर्श असलेला जाणवतो. कारण या सगळ्यातून मिळणारं समाधान मोजता न येण्याइतकं मोठं असतं. म्हणूनच आवर्जून फिरण्याच्या ठिकाणांच्या पर्यटकांच्या यादीत कोकण पहिल्या काही नंबरांत असतं. मग ती वीकेंडची शॉर्ट ट्रिप असो किंवा मोठ्या सुट्टीतली मोठी सहल, कोकण कायमच रिफ्रेश करून टाकतं.
अशा या रिफ्रेशिंग कोकणात आल्यानंतर राहायला हॉटेल्स खूप असली, तरी कोकणाचा खरा फील हॉटेलमध्ये राहून नक्कीच येत नाही; पण मग फिरायला आल्यावर राहणार कुठे? आणि कुठे तरी दुर्गम भागात राहायला गेल्यावर कदाचित चांगला अनुभव घेता येईलही; पण तिथे बाकीच्या सोयी कशा असतील, तिथून बाकीच्या ठिकाणचं पर्यटन करणं किती अवघड असेल, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात उभे राहिले असतील. या सगळ्या प्रश्नांचं समाधान करणारं उत्तर कोकणाशी खूप जवळचा संबंध असलेल्या एका शब्दात सामावलेलं आहे. तो शब्द म्हणजे कैरी.
होय. कैरी! रत्नागिरी तालुक्यातल्या नेवरे गावातल्या उंबरवाडीत मकैरी विश्रांतीस्थळम वसलेलं आहे. अभय खेर आणि त्यांचे पुत्र किरण
खेर यांनी हे विश्रांतीस्थळ उभारलं आहे.
हे नेवरे गाव आहे रत्नागिरी-गणपतीपुळे रस्त्यावर, रत्नागिरी शहरापासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर.
कैरीपासून गणपतीपुळ्याचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे. शिवाय, नेवरे-काजिरभाटी, आरे आणि वारे, भंडारपुळे असे अनेक विस्तीर्ण आणि शांत समुद्रकिनारे इथून केवळ दोन-तीन किलोमीटरच्या परिसरात आहेत. गणपतीपुळ्यापासून पुढे दोन किलोमीटरवरच्या मालगुंड गावात कवी केशवसुतांचं स्मारक आहे. रत्नागिरी शहरातल्या आणि जवळपासच्या पर्यटनस्थळांबद्दल तर तुम्हाला माहिती असेलच.
हे झालं आजूबाजूच्या पर्यटनस्थळांबद्दल... पण कैरीबद्दल काय?
कैरी विश्रांतीस्थळ म्हणजे नेमकं काय आहे, हा प्रश्न अजूनही मनात असेलच ना! तर त्याबद्दल थोडी माहिती घेऊ या. हे विश्रांतीस्थळ खेर कुटुंबीयांच्या सात एकर क्षेत्रावरच्या शेतात आहे. नैसर्गिक डोंगरउतारावर कोकणातल्या पद्धतीनं उभारलेली पाच कौलारू घरकुलं म्हणजेच कॉटेजेस इथं आहेत. कोकणचं वैशिष्ट्य असलेल्या जांभ्या दगडापासून म्हणजेच चिर्याचा वापर करून ही घरं उभारली आहेत. छपरासाठी मंगलोरी कौलं वापरली आहेत. घरांना आतून आणि बाहेरूनही सिमेंटचा गिलावा केलेला नाही. बाहेरून ही घरं कोकणी पद्धतीची दिसत असली, तर आतून मात्र ती सर्व सोयींनी परिपूर्ण आहेत. नारळी-पोफळीच्या बागा, आंबा, काजू, मणस आणि बाकी सगळ्या कोकण मेव्याच्या समृद्ध वनराईच्या सान्निध्यात असलेली ही घरकुलं निवांतपणाचा नितांतसुंदर अनुभव देतात. विशेष म्हणजे कॉटेज उभारताना एकही जुनं झाड तोडलेलं नाही. सर्व झाडं मूळ अवस्थेत आहेत. पांगार्याचं एक झाड छप्पर घालताना अडचणीचं ठरत होतं. तरीही ते झाड न तोडता छपराचा तेवढा भाग आत घेतला आहे. थोडक्यात म्हणजे घरं बांधण्यासाठी नेहमीच्या रिवाजाप्रमाणे झाडं न तोडता आवश्यकतेनुसार घरांची जागाच मागेपुढे हलविली आहे. त्यामुळे पाच घरांच्या या ओळीला एक नैसर्गिक महिरपही लाभल्याचं उंचावरून पाहताना दिसतं. पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी ही खबरदारी जाणीवपूर्वक घेतली आहे. प्रत्येक कॉटेज स्वतंत्र असली, तरी चिर्याच्या पाथवेनं ती एकमेकांना जोडली आहेत.
अशा वातावरणात असलेल्या या घरकुलांत राहण्याच्या अनुभवाची तुलना अन्य कशाशी करता येणार नाही. कारण तो अनुभव खराखुरा निवांतपणा देणारा आणि रिफ्रेश करणारा असतो. बरं, हे विश्रांतीस्थळ गावात असलं, तरी शहरी पर्यटकांच्या गरजा पूर्ण करणार्या सर्व सुविधा इथं आहेत. त्याची अजिबातच काळजी नको. कोकणातला हा डोंगराळ भाग आहे. त्यामुळे विजेची समस्या अधूनमधून उद्भवते. दिवसा ठीक आहे, पण रात्री वीज नसेल, तर काय करायचं, असा प्रश्न निर्माण होईल. त्याचा विचार कैरी विश्रांतीस्थळावर केला आहे, इन्व्हर्टची सुविधा आहे. गरम पाण्याची केटल् व चहा-कॉफीची सामग्री प्रत्येक कॉटेजमध्ये आहे. सर्व पाचही कॉटेजमधली कमोडची सुविधा असलेली टॉयलेट चांगली ऐसपैस आहेत. बेसिन, शॉवरची सोय तर आहेच, पण विजेवरच्या गीझरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
उत्तम प्रकारच्या कोकणी नाष्टा व भोजनाचा आस्वाद तुम्हाला घ्यायचा असेल, तर मात्र त्यासाठी आधी तसं कळवावं लागेल. कळवलं, तर तशी व्यवस्था करता येऊ शकेल.
याशिवाय कॉमन फॅसिलिटी हॉलमध्ये वॉशिंग मशीन, फ्रिजचीही सुविधा असेल. म्हणजेच आधुनिक सुविधा आणि कोकणाचा खरा अनुभव यांची सांगड या विश्रांतीस्थळात उत्तमरीत्या घातलेली आहे.
ज्या हंगामात तुम्ही याल, त्या हंगामातल्या रानमेव्याची अस्सल चव चाखता येईलच; पण जवळूनच वाहणार्या संथ, शांत ओढ्याच्या काठावर फिरता येईल. सात एकरात पसरलेल्या अस्सल कोकणी शिवारात सहज फेरफटका मारता येईल. आंबा, पोफळी अशा जुन्या खास कोकणी झाडांची राई या भागात आहेच, पण नारळी-पोफळीची नवी लागवडही केली आहे. याच शिवारात श्री. खेर यांनी कोकणीपणाला साजेसंच स्वतःचं घर उभारलं आहे. तब्बल सतरा फूट व्यासाची विहीर घराजवळच बांधली आहे. याच विहिरीतून सर्व कॉटेजना अखंड पाणीपुरवठा होतो.
कोकणात धावतपळत फिरायला येण्यासाठी नव्हे, तर धकाधकीच्या जगण्यातून थोडासा चेंज म्हणून अस्सल कोकणपण अनुभवण्यासाठी, कोकणातल्या शांत वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी या कॉटेजमध्ये राहायला या. निवांत राहा. शांतता मिळवा. चिंता विसरा आणि फ्रेश होऊन परत जा. आणि हे सगळं अगदी किफायतशीर दरांत.
मनात आलं तर आजूबाजूच्या पर्यटनस्थळांवर सवडीनं फिरणंही सोपं अगदी सहज शक्य आहे.
थोडक्यात सांगायचं तर, कोकणात आल्यावर या कैरीचा आस्वाद घ्यायला पर्याय नाही!
एक मात्र आहे, कैरी विश्रांतीस्थळावर सर्व सोयीसुविधांनी सज्ज असलं, तर राहण्यासाठी मात्र ही घरं 28 डिसेंबर 2018 नंतरच उपलब्ध होणार आहेत.
- प्रमोद कोनकर
..............
पत्ता : कैरी विश्रांती, उंबरवाडी, नेवरे, ता. जि. रत्नागिरी
संपर्क : किरण खेर - 9657932617 (मोबाइल, व्हॉट्सअॅप)
अभय खेर - 9422319711
Email - abhaykher@yahoo.co.in
......................
कैरी विश्रांतीस्थळावरील घरांची आणि परिसराची झलक पाहण्यासाठी खाली दिलेली यूट्यूबची लिंक क्लिक करा -
............
No comments:
Post a Comment