Tuesday, 6 November 2018

‘कोकणातील जलवैभव आणि कलेचा वारसा जपायला हवा’


कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाचे उक्षीच्या कातळशिल्पाजवळ प्रकाशन

उक्षी (रत्नागिरी) : ‘कोकणात सापडलेल्या कातळ-खोदचित्रांमध्ये पाणघोडा, हत्ती अशा अनेक प्राण्यांच्या प्रतिमा आहेत, ज्यातील बहुतांश प्राणी पाण्याशी निगडित आहेत. ही शिल्पे दहा हजार वर्षांपूर्वीची म्हणजेच अश्मयुगीन काळातील असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. याचाच अर्थ असा, की कोकणातील जलसमृद्धीलाही एवढा इतिहास आहे,’ असे प्रतिपादन कातळ-खोद-चित्रांचे शोधकर्ते सुधीर तथा भाई रिसबूड यांनी केले. रत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. कोकणातील जलवैभव, तसेच विविध कलांचा वारसा जपण्याची गरज या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केली.

साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) प्रमोद कोनकर, हरिश्चंद्र बंडबे, सरपंच मिलिंद खानविलकर, भाई रिसबूड, डॉ. रमेश साळुंखे आणि कांचन आठल्ये.
साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाचे यंदा तिसरे वर्ष असून, यंदाच्या अंकात जलवैभव विशेष विभाग आहे. तसेच कोकणातील कातळ-खोद-चित्रांच्या ठेव्याची दीर्घ गूढरम्य शोधकथाही शोधकर्त्यांनी अंकात लिहिली आहे. याचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथील कातळ-खोद-चित्राजवळ वसुबारसेच्या दिवशी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.


माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. रमेश साळुंखे, कातळ-खोद-चित्रांचे शोधकर्ते भाई रिसबूड, कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर, ‘हर्षा हॉलिडेज’चे प्रतिनिधी कांचन आठल्ये, उक्षीचे सरपंच मिलिंद खानविलकर, उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे, ग्रामविकास अधिकारी पद्मजा खटावकर, गावप्रमुख गणपत घाणेकर, मंगेश नागवेकर, अरविंद बंडबे, चंद्रकांत घाणेकर, संतोष देसाई आणि ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

उक्षी गावात लोकसहभागातून संरक्षित करण्यात आलेले हत्तीचे कातळ-खोद-चित्र
‘या गावात सापडलेले हत्तीचे कातळशिल्प लोकसहभागातून संरक्षित करण्यात आले आहे. हा आदर्श जास्त लोकांपर्यंत पोहोचावा या हेतूने अंकाचे प्रकाशन उक्षी गावात करण्यात आले,’ असे संपादक प्रमोद कोनकर यांनी सांगितले. तसेच कोकणातील चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने साप्ताहिक कोकण मीडिया कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


भाई रिसबूड यांनी या वेळी त्यांच्या शोधकार्याबद्दल थोडक्यात सांगून, ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दलही आवर्जून सांगितले. तसेच, ‘लोकसहभागातून कातळशिल्प संरक्षित केल्यामुळे गावात पर्यटक येऊ लागले. त्यामुळे चहावाल्याचा व्यवसाय वाढला. त्याचप्रमाणे पर्यटक अधिक प्रमाणात आले, तर सर्वांचाच फायदा होईल. म्हणूनच गावाची अस्मिता जपण्याची गरज आहे. गावातील तरुणच गाइड म्हणून तयार झाले, तर गावाचाच फायदा होईल,’ असे त्यांनी नमूद केले.

‘हर्षा हॉलिडेज’चे कांचन आठल्ये यांनीही हाच मुद्दा उचलून धरला आणि पर्यटकांना अशा गोष्टीच पाहण्यात रस असल्याचे आणि गावातील तरुणांनी माहिती दिल्यास ते अधिक उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.

माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. रमेश साळुंखे यांनी कातळशिल्प लोकसहभागातून संरक्षित केल्याबद्दल गावकऱ्यांचे कौतुक केले. ‘आता जग छोटे झाले आहे. त्यामुळे अमेरिकेतीलही क्षणात कळते; पण लिखित स्वरूपातील माध्यमे महत्त्वाची आहेत. तो अक्षर ठेवा आहे. कोकण मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होत असलेल्या विषयांचे हेच महत्त्व आहे. मिलिंद खानविलकरांसारखे उत्साही सरपंच गावाला लाभले आणि त्यांना लोकांचे सहकार्य मिळाले, त्यामुळे गावाचे नाव अजरामर झाले आहे. भाई रिसबूड यांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या कार्यामुळे उक्षी गाव जगाच्या नकाशावर आले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गावातील तरुण मुलांनी गाइड होण्यासाठी प्रयत्न करावेत. अश्मयुगातील जुनी माणसे आज नसली, तरी कलेच्या रूपाने आजही ती जिवंत आहेत. अश्मयुगातील ही कला गावापुरती सीमित न राहता सर्वत्र जावी आणि पिढ्यानपिढ्या जपावी. त्यातूनच उपजीविकेचे साधनही उपलब्ध होईल. हा ठेवा जपला, तर पर्यटकांमध्येही गणपतीपुळे, पावसबरोबरच ही कला, इतिहास, संस्कृती बघण्याची आवड निर्माण होईल,’ असे डॉ. साळुंखे म्हणाले.

सरपंच मिलिंद खानविलकर यांनी आपले अनुभव सांगितले. ‘भाई रिसबुडांनी या कातळशिल्पाचे महत्त्व सांगितल्यावर आम्ही तो ठेवा जपण्यासाठी गावकऱ्यांपुढे प्रस्ताव ठेवला. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही तो ठेवा संरक्षित करू शकलो. कोणताही सरकारी निधी आम्ही घेतलेला नाही. कातळशिल्पाच्या माध्यमातून गावाची प्रसिद्धी झाली. अनेक माणसे येथे येत असतात. पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, आयुक्त जगदीश पाटील यांनीही अलीकडेच येथे भेट दिली. हा ठेवा आम्ही जतन केला, तसा आजूबाजूच्या परिसरातील लोकांनीही करावा,’ असे खानविलकर म्हणाले.

उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांनी आभारप्रदर्शन केले.

(साप्ताहिक कोकण मीडियाचा दिवाळी अंक फक्त १२५ रुपये असून, ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून अंक घरपोच मागविण्यासाठी https://www.bookganga.com/R/7X0YW येथे क्लिक करा. ‘बुकगंगा’वर अंक ई-बुक स्वरूपातही उपलब्ध आहे. ई-बुकची किंमत फक्त १०० रुपये. अंकासाठी आणि वार्षिक वर्गणीसाठी संपर्क : 9422382621)

(अंकाच्या प्रकाशनसोहळ्याची आणि उक्षीच्या कातळशिल्पाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...) 




No comments:

Post a Comment