Friday 30 November 2018

वेदमूर्ती जनूकाका फडके यांची जन्मशताब्दी कुर्धे-मेर्वी येथे सुरू


     
 रत्नागिरी : कुर्धे-मेर्वी गावचे माजी सरपंच वेदमूर्ती जनार्दन नारायण ऊर्फ जनूकाका फडके 
यांच्या जन्मशताब्दीच्या दोन दिवसांच्या कार्यक्रमाला आज (ता. ३० नोव्हेंबर) प्रारंभ झाला. त्यांच्या शिष्यांनी विविध धार्मिक विधींनी शताब्दी साजरी करायचे ठरविले आहे.
     
पवमान पंचसूक्त
कै. वेदमूर्ती जनार्दन नारायण फडके गुरुजी यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९१८ रोजी झाला. काही काळ मेर्वी-कुर्धे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सरपंच म्हणून त्यांनी काम केले. या काळात गावातील सार्वजनिक विहिरीसह विविध सामाजिक कामे त्यांनी केली. गावातील पहिले गोबर गॅस संयंत्र स्वतःच्या घरी सुरू करून त्यांनी गावाला ऊर्जेच्या नव्या स्रोताची दिशा दिली. कुर्धे गावातील शतकोत्सवी वेदपाठशाळेत त्यांनी सुमारे २५ वर्षे ८० विद्यार्थ्यांना वेदांचे शिक्षण दिले. त्यांनी कीर्तन-प्रवचनेही केली.
     अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची तिथीनुसार जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी त्यांच्या वेदपाठशाळेत शिकलेल्या ५० विद्यार्थ्यांनी कुर्धे येथे दोन दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आज पहिल्या दिवशी उदकशांत, पुण्याहवाचन, व्यासपूजा, पवमान, रुद्र, सौर, ब्रह्मणस्पती आणि रुद्रसूक्ताचा जप, वेदमूर्ती प्रभाकर पाध्ये यांचे प्रवचन, मंत्रजागर, आरती-मंत्रपुष्प, आगवे येथील मुळ्ये मंडळींचे भजन इत्यादी कार्यक्रम पार पडले. कै. फडके यांचे कुटुंबीय, स्नेही, विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आठवणींचे 'जनाशताब्दीहे पुस्तक आज प्रकाशित झाले. ज्येष्ठ लेखिका सौ. आशाताई गुर्जर, पत्रकार प्रमोद कोनकर, कै. फडके यांचे सुपुत्र प्रकाश फडके यांच्या हस्ते प्रकाशन झाले. रत्नागिरीच्या कोकण मीडियातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
     
रुद्रावर्तने
उद्या सकाळी देवतापूजन, हवन, यतेआराधना आणि तीर्थराजपूजन होणार असून कार्यक्रमाची सांगता होईल.
........

'जनाशताब्दी’ संग्रह बुकगंगावर
..................

जनाशताब्दी हा संग्रह bookganga.com या संकेतस्थळावर ई-बुक स्वरूपात मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे पुस्तक पुढील लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून वाचता येईल. (बुकगंगाचा ई-बुक रीडरही डाउनलोड करावा लागेल.)




कुर्धे (ता. रत्नागिरी) : माजी सरपंच वेदमूर्ती जनूकाका फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेल्या 'जनाशताब्दी संग्रहाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ लेखिका सौ. आशाताई गुर्जर, वेदमूर्ती मुंडले, प्रमोद कोनकर, प्रकाश फडके


No comments:

Post a Comment