Monday 2 April 2018

नाणारचा रिफायनरी प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण होणार      रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात नाणार (ता. राजापूर) येथे केंद्र सरकारच्या तीन तेल कंपन्या एकत्रितरीत्या उभारत असलेला रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प येत्या २०२३ सालापर्यंत कार्यान्वित होणार आहे. प्रकल्पाविषयीची माहिती आज प्रथमच रत्नागिरीतल्या प्रसारमाध्यमांना देण्यात आली, त्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आले. मोहन मेनन, अजित मोरये आणि अनिल नागवेकर यांनी प्रकल्पाविषयीची माहिती दिली.
      इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातल्या तीन कंपन्या तीन लाख कोटी रुपयांचा खर्च असलेला हा प्रकल्प उभारत आहेत. देशात २३ रिफायनरी प्रकल्प असून अशा तऱ्हेचा पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स प्रथमच उभारला जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमार्फतच प्रकल्प उभारायचे ठरल्यानंतर रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड या कंपनीची स्थापना २२ सप्टेंबर २०१७ रोजी झाली. एमआयडीसी कायद्यानुसार महाराष्ट्र सरकार प्रकल्पाकरिता आवश्यक असलेली सुमारे पंधरा हजार एकर जमीन खरेदी करून देणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील चौदा गावांमध्ये हा प्रकल्प साकारणार असून प्रकल्पाला आतापर्यंत १४ टक्के लोकांनी प्रकल्पाला आक्षेप नोंदविले आहेत. अनेक सामाजिक संस्था प्रकल्पाबाबत अपप्रचार करत आहेत. संभाव्य प्रदूषणाबाबत चुकीची माहिती देत आहेत. रेनवॉटर हार्वेस्टिंग, कोयना प्रकल्पाचे अवजल इत्यादी स्रोतांमधून प्रकल्पाला आवश्यक पाणी घेतले जाणार असून या प्रकल्पातून समुद्रात टाकाऊ पाणी सोडले जाणार नाही. सर्व पाणी शुद्धीकरण करून प्रकल्पाच्या परिसरातच वापरले जाणार आहे. प्रकल्पाच्या जागेपैकी ३० टक्के जागा हरितपट्टा म्हणून विकसित केली जाणार असून आंब्याची एक लाख झाडे, तसेच काजू आणि झाडांची लागवड तेथे केली जाणार आहे. गुजरातमधील रिफायनरीच्या परिसरात केलेल्या आंब्याच्या लागवडीपासून मिळणारे उत्पन्न देशाच्या आंब्याच्या सरासरी उत्पन्नाच्या तिप्पट आहे. तेथील आंबा कॅनिंगसाठी महाराष्ट्रात पाठविला जातो. प्रकल्पात केवळ पेट्रोलियम उत्पादने नव्हेत, तर फर्निचर, टेक्स्टाइल, पॅकेजिंग, फ्रिज, वॉशिंग मशीन, ऑटोमोबाइल इत्यादीसाठी लागणाऱ्या पेट्रोकेमिकल उत्पादनांची निर्मिती होणार आहे. ही उत्पादने सर्वांत आधुनिक अशा बीएस-वीआय प्लस (युरो – सिक्स) दर्जाची असतील. त्यामध्ये फर्निचरहा संपूर्णपणे प्रदूषणविरहित प्रकल्प असेल.
      प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात दोन टक्क्यांनी, तर राज्याच्या उत्पन्नात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. प्रकल्पाचे बांधकाम सुरू असताना सुमारे दीड लाख, तर प्रकल्प सुरू झाल्यानंतर २० हजार जणांना प्रकल्पात प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. स्थानिकांना प्रकल्पात नोकऱ्या मिळाव्यात, याकरिता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील तीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था दत्तक घेण्यात येणार असून प्रकल्पासाठी आवश्यक ती कौशल्ये तेथे शिकविली जाणार आहेत. याशिवाय लाखाहून अधिक लोकांना प्रकल्पाच्या परिसरात सुरू होणाऱ्या विविध पूरक उद्योगांमध्ये अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. प्रकल्पामध्ये वाहतुकीच्या पायाभूत सुविधा, बंदर सुविधा आणि हवाई जोडणीच्या विकासाची क्षमता आहे. रत्नागिरी ते विजयदुर्ग या दरम्यान रेल्वेमार्ग उभारण्याची तयारी कोकण रेल्वेने दाखविली असून या मार्गावर ६ ते ७ स्थानके असतील. प्रकल्पाच्या परिसरातील लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार असून जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा निर्माण केल्या जातील. याशिवाय मनोरंजन, पर्यटन, मत्स्यव्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये तरुणांना रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रकल्प अत्यंत सुरक्षित असून त्याकरिता जागतिक दर्जाच्या मानकांची पूर्तता केली जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला निर्मल सागर तट महोत्सव कोळथरे येथे उत्साहात


 दापोली - दापोली तालुक्यात दोन दिवसांचा कोळथरे महोत्सव नुकताच पार पडला.

      महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या निर्मल सागरतट अभियानातून कोळथरे या समुद्रकिनाऱ्यावरच्या गावाचा कायापालट झाला असून गावात विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. समुद्रकिनारा स्वच्छ राहावा, यासाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविली जाते. त्याची माहिती पर्यटकांसह सर्वांना व्हावी, यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपातळीवर अशा तऱ्हेने प्रथमच महोत्सव साजरा करण्यात आला. त्याशिवाय गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेला कासव महोत्सवही पार पडला. सरपंच सौ. ज्योती दीपक महाजन यांच्या नेतृत्वाखाली अभियान राबविले गेले आणि महोत्सवही
उत्साहात पार पडला.
      अभियानाच्या निकषानुसार सर्वधर्म समभाव जोपासला जावा, पर्यटकांची संख्या वाढावी, रोजगार संधी मिळावी अशा वेगवेगळ्या हेतूने कोळथरे समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या विकासांचा व पर्यटकांना मूलभूत सुविधांचा आनंद घ्यावा या अनुषंगाने कोळथरे ग्रामपंचायत, सरपंच आणि कमिटी सदस्यांनी २४ आणि २५ मार्च २०१८ रोजी कोळथरे महोत्सव आयोजित केला होता. त्यानिमित्ताने विविध उपक्रम घेण्यात 
आले. कोळथरे गावात आनंदाचे वारे वाहताना दिसून येत होते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच असा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यामुळे ग्रामस्थ, पर्यटक व आजूबाजूच्या लोकांनी संपूर्ण समुद्र किनारा दोन दिवस गजबजून गेला होता. वेगळावेगळ्या कार्यक्रमांमुळे सगळ्यांचे उत्साह वाढत होता.
      कोळथरे महोत्सवात वाळुशिल्प प्रशिक्षण देण्यात आले. किल्ले स्पर्धेत सुमारे ६० बालकलाकारांनी हजेरी लावली. महिलांचे कबड्डी
सामने, लोककला, जाखडी, चवदार खाद्य जत्रा, पतंगबाजी, नेचर ट्रॅक, कासव महोत्सवाकरिता पर्यटक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामपंचायतीने अशा वेगवेगळ्या उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन केले.
................

(चित्रफीत सौजन्य - दीपक महाजन, कोळथरे, ता. दापोली)
Sunday 1 April 2018

समाज परिवर्तनामध्ये सामाजिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे : सुरेश प्रभू                रत्नागिरी : समाजामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी शासनासोबतच सामाजिक संस्थांचीही तितकीच गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा सुरेश प्रभू यांच्या हस्ते रत्नागिरीतील महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात पर्यावरणपूरक इलेक्ट्रॉनिक बाइक्सचे वितरण करण्यात आले. त्यावेळी श्री. प्रभू यांनी बोलत होते.

                श्री. प्रभू म्हणाले की, कोकणाचा विकास अद्यापही अपूर्ण आहे. याचे कारण येथील महिला घराबाहेर पडत नाहीत. मात्र जेव्हा महिला घराबाहेर पडतात तेव्हा समाजाच्या विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते असा माझा विश्वास आहे. त्यातूनच १९९४-९५ च्या दरम्यान मानव साधन विकास संस्थेची स्थापना करण्यात आली. आजपर्यंत महिला सबलीकरणाच्या निमित्ताने कोकणातील सुमारे ६० ते ७० हजार महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्याची संधी या संस्थेने दिली आहे. त्यातच पुढचे पाऊल म्हणून कोकणातील महिलांना सुमारे ४५ हजार रुपये किमतीची पर्यावरणपूरक इलेक्ट्रॉनिक बाइक देण्याचा प्रस्ताव हिरो ग्रुपचे ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनने आमच्या मानव साधन विकास संस्थेकडे आणला. त्याचाच प्रारंभ आज होत आहे. कोकण विकासासाठी शासनासोबतच अशा सामाजिक संस्थांचीही सांगड घालणे गरजेचे आहे, असेही श्री. प्रभू यांनी यावेळी सांगितले.
                कार्यक्रमाला व्यासपीठावर सौ. उमा प्रभू यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, माजी आमदार डॉ. विनय नातू, ग्लोबल कोकणचे संजय यादवराव, सौ. उल्का विश्वासराव आणि ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनचे अनिल शर्मा उपस्थित होते. महिला सबलीकरणासाठी मानव साधन विकास संस्था गेली २० वर्षे काम करीत असून याहीपुढे हे काम असेच सुरू राहील, असे सौ. उमा प्रभू यांनी सांगितले. अनिल शर्मा यांनीही ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. जाणीव फाऊंडेशनच्या वतीने श्री. प्रभू यांच सत्कार करण्यात आला.
                मानव साधन विकास संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बचत गटांतर्गत अनेक उपक्रम २० वर्षांपेक्षा जास्त काळ सातत्याने सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील १ लाखापेक्षा जास्त महिलांना या माध्यमातून स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. येणाऱ्या काळात महिलांना स्वयंरोजगारासाठी व नोकरी व्यवसायासाठी वाहतुकीची कमी खर्चात व पर्यावरणपूरक व्यवस्था व्हावी,  या हेतूने इलेक्ट्रिक बाइक्स देण्यात आल्या आहेत. ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सौ. उमा प्रभू यांच्या मार्गदर्शनाने मानव साधन विकास संस्थेच्या वतीने महिलांच्या सबलीकरणाकरिता ५०० इलेक्ट्रिक बाइक्सचे वितरण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात केले जाणार आहे. त्यापैकी २५० सायकली रत्नागिरी जिल्ह्यात वितरित केल्या जाणार आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात रोहिता सहदेव पांचाळ (ताम्हाणे, राजापूर), मंदाकिनी महादेव माईंगडे (जाकादेवी, रत्नागिरी), योगिता योगेश पवार (कोसुंब, संगमेश्वर), शमिका संतोष रामाणी (मालगुंड, रत्नागिरी), प्रियांका प्रकाश जोशी (निवे, संगमेश्वर), दीपाली मनोज कुंभार (टेरव, चिपळूण), माधवी मंगेश किर्लोस्कर (उन्हाळे, राजापूर), साक्षी चंद्रकांत भुवड (वाकेड, लांजा) आणि रूपाली राहुल पवार (जावडे, लांजा) या महिलांना सायकलींचे वितरण करण्यात आले. हा भारतातील पहिलाच उपक्रम आहे.