Monday 2 April 2018

रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला निर्मल सागर तट महोत्सव कोळथरे येथे उत्साहात


 दापोली - दापोली तालुक्यात दोन दिवसांचा कोळथरे महोत्सव नुकताच पार पडला.

      महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या निर्मल सागरतट अभियानातून कोळथरे या समुद्रकिनाऱ्यावरच्या गावाचा कायापालट झाला असून गावात विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. समुद्रकिनारा स्वच्छ राहावा, यासाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविली जाते. त्याची माहिती पर्यटकांसह सर्वांना व्हावी, यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपातळीवर अशा तऱ्हेने प्रथमच महोत्सव साजरा करण्यात आला. त्याशिवाय गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेला कासव महोत्सवही पार पडला. सरपंच सौ. ज्योती दीपक महाजन यांच्या नेतृत्वाखाली अभियान राबविले गेले आणि महोत्सवही
उत्साहात पार पडला.
      अभियानाच्या निकषानुसार सर्वधर्म समभाव जोपासला जावा, पर्यटकांची संख्या वाढावी, रोजगार संधी मिळावी अशा वेगवेगळ्या हेतूने कोळथरे समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या विकासांचा व पर्यटकांना मूलभूत सुविधांचा आनंद घ्यावा या अनुषंगाने कोळथरे ग्रामपंचायत, सरपंच आणि कमिटी सदस्यांनी २४ आणि २५ मार्च २०१८ रोजी कोळथरे महोत्सव आयोजित केला होता. त्यानिमित्ताने विविध उपक्रम घेण्यात 
आले. कोळथरे गावात आनंदाचे वारे वाहताना दिसून येत होते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच असा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यामुळे ग्रामस्थ, पर्यटक व आजूबाजूच्या लोकांनी संपूर्ण समुद्र किनारा दोन दिवस गजबजून गेला होता. वेगळावेगळ्या कार्यक्रमांमुळे सगळ्यांचे उत्साह वाढत होता.
      कोळथरे महोत्सवात वाळुशिल्प प्रशिक्षण देण्यात आले. किल्ले स्पर्धेत सुमारे ६० बालकलाकारांनी हजेरी लावली. महिलांचे कबड्डी
सामने, लोककला, जाखडी, चवदार खाद्य जत्रा, पतंगबाजी, नेचर ट्रॅक, कासव महोत्सवाकरिता पर्यटक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामपंचायतीने अशा वेगवेगळ्या उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन केले.
................

(चित्रफीत सौजन्य - दीपक महाजन, कोळथरे, ता. दापोली)
No comments:

Post a Comment