रत्नागिरी तालुका `आप`ची मुख्यमंत्र्यांकडे
निवेदनाद्वारे मागणी
रत्नागिरी – दुष्काळ, अवकाळी पाऊस,
गारपीट आणि नापिकीने त्रस्त झालेल्या कोकणासह राज्यभरातील शेतकऱ्यांना एकरी किमान पंचवीस
हजार रुपयांचे पीककर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रत्नागिरी तालुका आम
आदमी पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन
बी. यांना हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात राज्यभरातील शेतकऱ्यांच्या स्थितीचे
वर्णन करण्यात आले आहे. दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आणि सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या
आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. कापूस आणि सोयाबीनचे बाजारभाव मुळातच तोकड्या असलेल्या
हमीभावापेक्षाही कमी होते. गाईच्या दुधाचा दर लिटरला सोळा रुपयांपर्यंत घसरला आहे.
आपच्या विदर्भ आणि मराठवाड्यातील संवाद यात्रेत दूध उत्पादकांनी आत्महत्या केल्याचे
वास्तव समोर आले आहे. स्वामीनाथन समितीच्या शिफारशींनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्च
आणि पन्नास टक्के नफा मिळवून दिला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. ते प्रत्यक्षात आलेले नाही. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने
त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली साडेचार हजार रुपयांची तुटपुंजी
मदतही अजून मिळालेली नाही. आता पावसाळा सुरू होणार असून शेतकरी नव्या अपेक्षेने पेरणीस
उत्सुक असला, तरी कोसळत्या बाजारभावाने तो हतबल झाला आहे. तसेच पेरणीचा खर्चही त्याच्या
आवाक्याबाहेर झाला आहे. अशा स्थितीत सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. याआधीचे
शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करून त्यांना तातडीने एकरी पंचवीस हजाराचे नवे पीककर्ज उपलब्ध
करून देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
आपचे रत्नागिरी तालुका संयोजक जुबेर
काझी, उपसंयोजक रवींद्र कोकरे, सचिव अमोल माने, छात्र युवा संघर्ष समितीचे कोकण संयोजक
नीलेश आखाडे यांनी हे निवेदन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना सादर केले.
No comments:
Post a Comment