Thursday, 25 June 2015

मठ येथील पल्लीनाथ मंदिरात अधिक मासानिमित्त पुरुषोत्तम याग

रत्नागिरी – मठ (ता. लांजा) येथील लक्ष्मीपल्लीनाथाच्या नूतन मंदिरात अधिक आषाढ मासानिमित्ताने पुरुषोत्तम याग आयोजित करण्यात आला आहे. येत्या शनिवार-रविवारी (ता. 27 आणि 28 जून) हा याग होणार आहे.
चाळीस कुळांचे कुलदैवत असलेल्या लक्ष्मीपल्लीनाथाचे मंदिर मठ येथे अलीकडेच बांधण्यात आले आहे. देवस्थानाच्या कुलोपासकांनी एकत्र येऊन भव्य मंदिर साकारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार मंदिराची उभारणी सुरू असून म्हैसूरच्या काळ्या ग्रॅनाइटच्या कोरीव कामाने गाभाऱ्याचे, तर स्थानिक जांभ्या दगडाने घुमट आणि कळसाचे काम पूर्ण झाले आहे. या मंदिरात ध्यानमंत्राप्रमाणे पल्लीनाथ, गणेश आणि महालक्ष्मीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा नुकतीच पंचकुंडी प्रकाराने झाली आहे. त्यानंतर प्रथमच आलेल्या अधिक मासानिमित्ताने पुरुषोत्तम याग आयोजित करण्यात आला आहे. अधिक मास म्हणजे श्रीकृष्णाचा म्हणजेच पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. त्यानिमित्ताने श्रीकृष्णाची आराधना करण्यासाठी हा याग केला जाणार आहे.
शनिवारी (ता. 27) दुपारी 3 वाजता पुण्याहवाचनाने यागाचा प्रारंभ आणि रात्री अष्टोपचार सेवा केली जाईल. रविवारी हवन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम होतील. पल्लीनाथाच्या कुलोपासकांनी या यागाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment