Wednesday 11 November 2015

खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल कल्याणी पांडे रंगविणार




रत्नागिरी : खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल मुंबईतील गायिका कल्याणी पांडे-साळुंके रंगवणार आहेत. गुरुवारी (ता. १२) सायंकाळी ५ वाजता ही मैफल गुरुकृपा कार्यालयात होईल.
सौ. कल्याणी पांडे-साळुंके एमए (संगीत) असून प्राथमिक शिक्षण वडील कै. पुरुषोत्तम पांडे यांच्याकडे आणि त्यानंतर कै. पं. वसंतराव कुलकर्णी (आग्रा घराणे) यांच्याकडे झाले. कै. डॉ. अशोक रानडे यांच्याकडे सलग १८ वर्षे त्यांनी गायनाचे धडे घेतले. सध्या पं. अरुण कशाळकर यांच्याकडे त्यांचे शिक्षण चालू आहे. कै. डॉ. सरला भिडे आणि सौ. मीनाक्षी मुडबिद्री यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.
सौ. साळुंके यांना साजन मिलाप, मेरिट स्कॉलरशिप अशा स्कॉलरशिप मिळाल्या आहेत. त्यांना महाराष्ट्र टाइम्सचा २०१३ चा कोहिनूर म.टा. पुरस्कार अजंठा या चित्रपटासाठी मिळाला आहे. साम मराठी, दूरदर्शन, झी मराठी, ई टीव्ही, सह्याद्री इत्यादी दूरचित्रवाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. भारत व भारताबाहेरही त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. अनेक नाटके, चित्रपटासांठी त्यांनी पार्श्वगायन केले. त्यांची व्हर्टिकल नोट नावाची स्वत:ची संगीत संस्था आहे.
खल्वायनच्या दिवाळी पाडवा मैफलीत त्यांना तबलासाथ प्रसाद करंबेळकर व हार्मोनियमसाथ अनंत जोशी करणार आहेत. कार्यक्रमाची प्रवेशिका ५० रुपये असून कार्यक्रमाआधी १ तास ती कार्यक्रमस्थळी उपलब्ध होईल. मैफलीचा आस्वाद घेण्याचे आवाहन खल्वायन संस्थेने केले आहे.

No comments:

Post a Comment