Wednesday, 25 November 2015

अण्णा शिरगावकरांचे कार्य समाजाला दिशा देणारे



डॉ. सुभाष देव : यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार प्रदान



रत्नागिरी : ``पुराणपुरुष अण्णा शिरगावकर यांनी ध्येयाने प्रेरित होऊन केलेले कार्य समाजाला निश्चित दिशा देणारे आहे``, असे गौरवोद्गार रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी आज येथे काढले.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे विभागीय स्तरावर प्रथमच सुरू झालेला यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार दाभोळ (ता. दापोली) येथील इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर यांना प्रदान करण्यात आला. पंधरा हजार रुपये रोख आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पटवर्धन हायस्कूलच्या नाटेकर सभागृहात झालेल्या या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. देव बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष राजाभाऊ लिमये, उपाध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर, जिल्हाध्यक्ष बापू काणे, माजी प्राचार्य डॉ. सुरेश जोशी, भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष विनायक हातखंबकर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. देव यांनी यावेळी यशवंतराव चव्हाण यांची राजकीय आणि साहित्यिक कामगिरी विशद केली. त्यांचे कृष्णाकाठ हे दोन भागांतील आत्मचरित्र राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सतत समोर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. अण्णा शिरगावकर यांनी इतिहासाच्या संशोधनासाठी केलेल्या धडपडीचाही त्यांनी आढावा घेतला. समाजासाठी कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींना पाठबळ देण्याचे काम संस्थांनी करायचे असते. अण्णांना पुरस्कार देऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने ते केले आहे, असेही डॉ. देव म्हणाले.
अण्णा शिरगावकर यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.
समाजसेवेची प्रेरणा आपल्याला आईकडून मिळाल्याचे प्रारंभी नमूद करून सत्काराला उत्तर देताना अण्णा शिरगावकर म्हणाले, ``स्वातंत्र्यासाठी लढा देणारे आपले अनेक पूर्वज फाशी गेले, तुरुंगात गेले. अनेक हालअपेष्टा त्यांनी सोसल्या. त्या काळात पुरस्कार नव्हते. त्यांचे वाढदिवस साजरे होत नव्हते. आजकाल मात्र कोणाचे ना कोणाचे पुरस्कार आणि वाढदिवस सतत सुरूच असतात. त्यामुळे खरे समाजकार्य करणारे दुर्लक्षितच राहतात. पण समाजसेवेची दखल घेणारे आजही आहेत, याचे समाधान वाटते. शेवटपर्यंत कार्यरत राहायची माझी इच्छा आहे.``
डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानतर्फे विभागीय स्तरावर प्रथमच सुरू झालेल्या यशवंतराव चव्हाण पुरस्काराविषयी तसेच प्रतिष्ठानच्या कोकण विभागाने आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या गीतारहस्य चर्चासत्राविषयी माहिती दिली. या चर्चासत्रातील निबंध संकलित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. हे चर्चासत्र आणि पुस्तकाच्या प्रकाशनाविषयीची माहिती पुस्तकाचे संपादक डॉ. सुरेश जोशी यांनी दिली. ते म्हणाले ``लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्य या शतकोत्सवी ग्रंथाविषयी महाराष्ट्रात कोठेच चर्चासत्र झाले नाही. लोकमान्यांच्या जन्मभूमीत ते व्हावे, अशी इच्छा राजाभाऊ लिमये यांच्याकडे व्यक्त केल्यानंतर गेल्या १ आणि २ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत हे सांगोपांग चर्चासत्र झाले. ते पुस्तकस्वरूपात तयार करण्यासाठीही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने पुढाकार घेतला. हाताशी कोणतीही अभ्यासाची सामग्री नसताना लोकमान्यांनी तुरुंगावसात गीतारहस्य लिहिले. पीएचडीचे प्रबंध लिहिणाऱ्या किंवा संशोधन करणाऱ्या आजच्या तरुणांना ते आजही मार्गदर्शक आहे.`` राजाभाऊ लिमये यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रतिष्ठानचे कार्यवाह एम. के. गावडे यांनी आभार मानले. निशा काळे यांनी सूत्रसंचालन केले.
..............
गीतारहस्य चर्चासत्र पुस्तकाचे प्रकाशन

राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
प्रतिष्ठानच्या पुण्यातील कृषी-सहकार व्यासपीठाने शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या `कथा जोतिबा सावित्रीची` या विषयावरील राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिके देण्यात आली. ते शिक्षक असे : लीलाधर मोहन कूड (द्वितीय क्रमांक, ७५० रु.- शिवार आंबेरे, रत्नागिरी), योगेश पेढांबकर (तृतीय ५०० रु., चिपळूण) आणि विश्वनाथ रामचंद्र चिले (उत्तेजनार्थ ३०० रु., - वरवडे, ता. रत्नागिरी).
``

पुरस्कार कोणाला देऊ?
सत्काराला उत्तर देताना अण्णा शिरगावकर पत्नीच्या आठवणीने भावनावश झाले. ते म्हणाले, ``आतापर्यंत मला मिळालेला पुरस्कार मी माझ्या पत्नीकडे देत असे. यमराजाने जीवनगौरव पुरस्कार देऊन तिला आमच्यातून नेले. त्यामुळे आता मी पुरस्कार कोणाला देऊ, हा प्रश्न पडला आहे. मी मात्र माझे काम अखेरपर्यंत करत राहणार आहे. मी इतिहासाचा अभ्यास करताना जमविलेल्या वस्तू ठाण्याच्या प्राच्यविद्या संस्थेला दिल्या. आताही माझ्याकडे जुना अमोल ग्रंथसंग्रह आहे. तो रत्नागिरी जिल्ह्यातल्या संस्थेने स्वीकारावा आणि अपरान्त संशोधन केंद्र सुरू करावे, अशी माझी अपेक्षा होती. त्यासाठी कोणत्याच संस्थेने स्वारस्य दाखविले नाही. त्यामुळे नाइलाजाने हा ठेवाही जिल्ह्याबाहेर द्यावा लागणार आहे.``

No comments:

Post a Comment