कोट येथे १९ ला जयंती : विविध कार्यक्रमांचे आयोजन
लांजा : झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची १७१ वी जयंती
येत्या १९ नोव्हेंबर रोजी कोट येथे थाटात साजरी केली जाणार आहे. यावेळी इतिहास आणि क्रांतिकारकांविषयीचे गाढे अभ्यासक डॉ.
सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून ते राणी लक्ष्मीबाईचा
वेधक इतिहास उलगडणार आहेत.
झाशीच्या
राणीचे माहेर आणि सासर लांजा तालुक्यात कोलधे आणि कोट येथे आहे. चिमाजी आप्पांचे व्यवस्थापक
मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई यांच्या पोटी १९ नोव्हेंबर १८३५ रोजी जन्म झालेल्या मनकर्णिका ऊर्फ
मनूताईने लहानपणीच नानासाहेब पेशवे, रावसाहेब यांच्यासह तत्कालीन युद्धकलेसाठी
आवश्यक असलेले तलवार, दांडपट्टा, बंदुक चालवणे, घोडदौड असे
शिक्षण घेतले. झाशी संस्थानचे अधिपती गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी तिचा विवाह झाला
आणि तिला झाशीची राणी असे संबोधले जाऊ लागले. त्यांना झालेल्या पुत्राचे अवघ्या
तिसऱ्या महिन्यात निधन झाले. त्या धक्क्याने अल्पावधीत त्यांच्या पतीचेही निधन
झाल्याने राणीकडे झाशीच्या राज्याची जबाबदारी आली. राणीने कर्तबगारीने राज्याचे रक्षण
केले, मात्र ब्रिटिशांच्या आक्रमणापुढे तिचा निभाव लागू शकला नाही. भारतीय
स्वातंत्र्यासाठी झालेल्या पहिल्या
म्हणजे १८५७ च्या संग्रामात झाशीच्या राणीने मोठा पराक्रम गाजविला. तिच्या या पराक्रमाची आठवण म्हणून लांजा तालुक्यात
स्मारक उभारण्याचे ठरवून कोट आणि कोलधे
येथील ग्रामस्थांनी समिती स्थापन केली आहे. या समितीतर्फे येत्या १९ नोव्हेंबर
रोजी कोट येथे राणीच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी डॉ.
सच्चिदानंद शेवडे राणीचा संघर्ष आणि तिने दिलेल्या लढ्याचा संघर्षमय इतिहास उलगडून
सांगणार आहेत. त्यांच्या व्याख्यान दुपारच्या सत्रात होणार आहे.
दरम्यान, जयंतीच्या कार्यक्रमात सकाळच्या
सत्रात राणीचे स्मारक उभारण्यासंदर्भात चर्चासत्र होणार आहे. राणीची ऐतिहासिक आणि कौटुंबिक माहिती असणारे अभ्यासक,
त्यांच्याबद्दल आदर असणाऱ्या सर्वांना यावेळी निमंत्रित करण्यात आले आहे.
जयंतीच्या या
समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन उपसरपंच कृष्णा आगरे, दिनकर नेवाळकर, अॅड. विलास कुवळेकर इत्यादींचा समावेश असलेल्या राणी
लक्ष्मीबाई स्मारक समितीने केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२२७३४३६६, ८९७५४०९०५४,
९२७०९८५२०० किंवा ९२७०९६३५७४ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment