Friday 31 July 2015

लोकमान्यांच्या गीतारहस्यावर रत्नागिरीत आजपासून चर्चासत्र

रत्नागिरी - लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेवर लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथाला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या ग्रंथाचा सांगोपांग परिचय करून देणारे दोन दिवसांचे चर्चासत्र रत्नागिरीत आयोजित करण्यात आले आहे. लोकमान्यांच्या ९५ व्या पुण्यतिथीच्या दिवशी उद्या ता. १) ते सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी चर्चासत्राचा समारोप होईल. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा कोकण विभाग आणि गीता मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल. दरम्यान, चर्चासत्राला प्रारंभ होण्यापूर्वी आयोजित केलेली शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे.
प्रा. डॉ. सुरेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी दहा वाजता सुरू होणाऱ्या या चर्चासत्रात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे बीजभाषण होईल. उद्या श्रीराम सिधये (लोकमान्य टिळक आणि गीता), डॉ. शं. रा. तळघट्टी (आद्यशंकराचार्य आणि लोकमान्य टिळक),  डॉ. कल्याण काळे (कर्मविपाक आणि कर्मयोगसिद्धांत) यांचे निबंधवाचन होईल. रविवारी (ता. २) धनंजय चितळे (गीतारहस्यातून दिसणारे अभ्यासक टिळक), प्रतिभा बिवलकर (कर्मयोगशास्त्र), डॉ. विद्याधर करंदीकर (वर्णाश्रमव्यवस्था आणि पुरुषार्थ विचार) निबंध सादर करतील. दुपारी २ वाजता दा. कृ. सोमण यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सत्र सुरू होईल. ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक अध्यक्षस्थान भूषवितील. चर्चासत्राला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निबंध, भित्तिचित्र स्पर्धांचा निकाल

दरम्यान, चर्चासत्राच्या निमित्ताने आयोजित केलेल्या निबंध आणि भित्तिचित्र स्पर्धांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. निबंध स्पर्धेतील अनुक्रमे विजेते आणि बक्षिसे अशी - खुला गट (विषय - लोकमान्य टिळकांचे लेखन आणि संशोधन) – माधव अंकलगे (वाटद-खंडाळा, रत्नागिरी, 750 रुपये), गणेश देवजी मुळ्ये (तानाजीराव चोरगे अध्यापक महाविद्यालय, मांडकी-पालवण, चिपळूण, 500 रुपये), प्रा. सौ. मानसी मंगेश चव्हाण (गांधी-कीर कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी, 300 रुपये). उच्च माध्यमिक गट – (विषय - गीतेचे महत्त्व आणि लोकमान्य टिळकांची भूमिका) – सिद्धराज सुधाकर गंगावणे (डीबीजे महाविद्यालय, चिपळूण, 500 रुपये), मुस्कान अल्ताफ पकाली (विजू नाटेकर कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी, 300 रुपये), स्नेहल प्रल्हाद बोरकर (विजू नाटेकर, रत्नागिरी, 200 रुपये). स्पर्धेचे पारितोषिक वितरण उद्घाटन समारंभात होईल. लोकमान्य टिळक जीवनदर्शन या विषयावरील भित्तिचित्र स्पर्धेचे पारितोषिक वितरण चर्चासत्राच्या सांगता समारंभात होणार असून या स्पर्धेतील तिन्ही विजेते रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलचे विद्यार्थी आहेत. त्यांची नावे आणि बक्षिसे अशी – स्वरूप संदीप जोशी (300 रुपये), नीलाक्षी सचिन पवार (200 रुपये), साक्षी संदीप बेलवलकर (100 रुपये).


No comments:

Post a Comment