रत्नागिरी – गीतारहस्य
ग्रंथाच्या शताब्दीच्या निमित्ताने रत्नागिरीत होणार असलेल्या चर्चासत्राच्या
प्रारंभी आयोजित केलेली शोभायात्रा आणि ग्रंथदिंडी राष्ट्रीय दुखवट्यामुळे रद्द करण्यात
आली आहे. चर्चासत्र मात्र नियोजनानुसार होणार आहे.
यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठानच्या कोकण विभागाने गीता मंडळाच्या सहकार्याने येत्या 1 आणि 2 ऑगस्ट
रोजी गीतारहस्याविषयी सांगोपांग परिचय घडविण्यासाठी रत्नागिरीत चर्चासत्राचे आयोजन
केले आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते या
चर्चासत्राचे उद्घाटन गीता भवनात होणार आहे. दोन दिवसांच्या या चर्चासत्राच्या
प्रारंभी एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता टिळक आळीतील लोकमान्यांच्या
जन्मस्थानापासून गीता भवनापर्यंत शोभायात्रा आणि ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली
होती. शहरातील शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होणार होते.
मात्र ही दिंडी आणि शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती ए. पी. जे.
अब्दुल कलाम यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
जाहीर केला आहे. त्यामुळे शोभायात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे
कोकण विभागीय अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी दिली. दोन दिवसांचे चर्चासत्र मात्र
नियोजनानुसार होणार असून एक ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता चर्चासत्राचे उद्घाटन होणार
आहे.
No comments:
Post a Comment