Sunday 12 July 2015

बारामतीजवळच्या संग्रहालयासाठी शंखशिंपले पाठविण्याचे आवाहन

सुरेश खोपडे यांचा उपक्रम : विद्यार्थी, पर्यटक, अभ्यासकांसाठी उपयुक्त


रत्नागिरी – बारामती (जि. पुणे) येथे नव्याने साकारणार असलेल्या संग्रहालयासाठी शंखशिंपले पाठविण्याचे आवाहन माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी निवेदनाद्वारे केले आहे.
श्री. खोपडे महाराष्ट्राला परिचित आहेत. भिवंडी येथील जातीय दंगली थांबविण्यासाठी त्यांची केलेले मोहल्ला कमिटीचे प्रयोग जगभरात वाखाणले गेले आहेत. पोलिस दलाची कार्यपद्धती बदलून लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी पोलिस सेवेत असताना मोठा लढा दिला आहे. निवृत्त झाल्यावर त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे. याचाच एक भाग म्हणून श्री. खोपडे बारामती तालुक्यातील मोरगावजवळील ढोलेमळा येथील त्यांच्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करीत असतात. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयोगी असे विविध वस्तूंचे संग्रहालय उभारण्याचा त्यांचा मानस आहे. अश्मयुगापासूनचा जगाचा इतिहास याद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची त्यांची कल्पना आहे. त्यामध्ये खडकांचे विविध नमुने, विविध वाद्यांचे नमुने, क्रीडासाहित्य, नाण्यांचे आणि नोटांचे संकलन असेल. हा संग्रह संबंधित व्यक्तीच्या नावाने या संग्रहालयात ठेवला जाणार आहे. हे संग्रहालय अष्टविनायकांपैकी एक गणपती असलेले मोरगाव तसेच खंडोबाची जेजुरी या दोन तीर्थक्षेत्रांपासून जवळ असेल. तेथे येणारे भाविक तसेच विद्यार्थी आणि अभ्यासकांनाही या विविध वस्तुसंग्रहालयाचा फायदा होणार आहे.
याच संग्रहालयात प्रामुख्याने कोकणात समुद्रकिनाऱ्यावर आढळणाऱ्या शंखशिंपल्याचे विविध नमुने ठेवले जाणार आहेत. कोकणात किंवा अन्यत्र राहणाऱ्यांकडे शंखशिंपल्यांचा असा संग्रह असेल, त्यांनी ९८८१०९८१३८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. खोपडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment