Thursday, 30 July 2015

विद्वत्ता आणि व्यासंगाचा चंदनी टिळा - लोकमान्य टिळक


लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेवर लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथाला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागाने गीता मंडळाच्या सहकार्याने र्चासत्र आयोजित केले आहे. १ आणि २ ऑगस्ट १५ असे दोन दिवस चालणार असलेल्या या चर्चासत्राच्या निमित्ताने सत्राचे समन्वयक प्राचार्य सुरेश जोशी यांनी लोकमान्यांच्या विद्वत्तेचा घेतलेला मागोवा.

...................
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रात विद्वत्ता आणि व्यासंगाचे महाबुरूज म्हणता येईल असे अनेक थोर पुरुष कार्यरत होतेराजकारण, समाजकारण, अर्थकारण, इतिहास संशोधन, प्राच्यविद्या. ज्योतिष, वेदांग, भाषा, तत्त्वज्ञान अशा अनेक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे महामेरू त्या शतकात दाखवता येतात. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे अशा महामेरूंमध्ये अग्रणी ठरतात. राजकारणाच्या धकाधकीत अखेरपर्यंत राहूनही त्यांनी वरीलपैकी एकदोन विषयातच नव्हे तर तत्त्वज्ञान, धर्मजिज्ञासेपासून ते शेतकऱ्यांच्या समस्यांपर्यंत अनेक विषयांबाबत जे मौलिक संशोधन वा विचार व्यक्त केलेले आहेत, त्यांचे अवलोकन केले, की मन खरोखरच विस्मित होते. सुखीसमाधानी आणि शांत जीवन जगणाऱ्या आधुनिक सुशिक्षितांच्या हातूनही होणार नाही, एवढे मौलिक आणि बहुलक्ष्यी लेखन लोकमान्य टिळकांनी केलेले आहे. त्या लेखनाचा पसारा आणि व्याप्ती तसेच सखोलता लक्षात आली की खरोखरच त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे, असे कोणाही ज्ञानजिज्ञासूला वाटणे स्वाभाविक आहे. धकाधकीच्या आणि व्यापतापाच्या सक्रिय राजकारणात राहून आणि अनेकदा तुरुंगवास सोसूनही लोकमान्यांनी एवढे ज्ञानसंपन्न लेखन केलेले आहे, तर त्यांना खरेच स्वास्थ्यसंपन्न जीवन लाभले असते तर या ज्ञानमहर्षीने आणखी किती बुरूज उभे केले असते?
समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे-
ज्ञानी आणि उदास । समुदायाचा हव्यास ।
तेणे अखंड सावकास । एकान्त सेवावा ।।
असा एकांत लोकमान्य टिळकांच्या वाट्याला फार थोडा आला. मुख्यतः मंडालेसारख्या तुरुंगवासात, क्वचित प्रवासात आणि मुद्दाम व्यासंगासाठी आणि लेखनसंकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी निवडलेल्या सिंहगडावरील वास्तव्यात त्यांना थोडाबहुत एकांत गवसला तेवढाच. पण एवढा अल्पस्वल्प एकांतसुद्धा त्यांनी मौलिक चिंतनात आणि शिस्तबद्ध गंभीर लेखनात व्यतीत केला, त्यांना मिळालेल्या त्या सवडीचे त्यांना खरोखरच सोने करता आले. कारण लोकमान्य टिळकांची मूळची ज्ञानलालसा अत्यंत तीव्र होती. ती विद्यार्थीदशेपासून पोसली गेली होती. संस्कृत भाषेचे अध्ययन आणि गीतेचे सूक्ष्म परिशीलन यामधून त्या ज्ञाननिष्ठेचे संवर्धन झाले होते. गीतेच्याच भाषेत बोलायचे तर ज्ञानरूप यज्ञ अखंड तेवता-धगधगता ठेवणे हीच त्यांची जीवननिष्ठा होती. म्हणूनच कवी गोविंदांनी त्यांचा गौरव करताना म्हटले आहे-
टिळक नव्हे हे श्रीगीतेचे
रूप प्रकट जाहले
ज्ञानमय रूप प्रकट जाहले
टिळकांच्या व्यक्तिमत्त्वातील हे ज्ञानमय रूप हा शतकाशतकानंतरही लक्षवेधी ठरणारा झळाळता पैलू आहे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनांसारख्या गेल्या पिढीतील थोर तत्त्ववेत्यानेही,  ``टिळक वॉज नॉट ओन्ली ए पॉलिटिकल लीडर बट ऑल्सो ए ग्रेट स्कॉलर अँड जर्नालिस्ट. हिज माइंड हॅड ए कॉम्प्रहेन्सिव्ह स्वीप एम्ब्रान्सिंग एन्शन्ट लिटरेचर अँड मॉडर्न सायन्स. ही इल्यमिनेटेड एव्हरी सब्जेक्ट ही टुक अप् ..`` अशा शब्दांत त्यांच्या विद्वत्तेचा गौरव करून त्यांच्या ज्ञाननिष्ठेचा आणि बौद्धिक शिस्तीचा मुद्दाम निर्देश केलेला आहे.
या बौद्धिक शिस्तीचा मूलाधार टिळकांचा तत्त्वज्ञानाचा व्यासंग हा होता.  भारतीय तत्त्वज्ञानाबरोबरच अनेक पाश्चात्य तत्त्ववेत्यांचेही त्यांनी सूक्ष्म परिशीलन केलेले होते, याची साक्ष त्यांच्या लेखनात अनेकदा आढळते. आद्य शंकराचार्य, सांख्य-चार्वाक आदी दार्शनिक यांच्याइतकेच हर्बर्ट स्पेन्सर, मॅक्समुल्लर असे पाश्चात्य आधुनिक विद्वानही त्यांना वंद्य होते. किंबहुना बरोबरीच्या अनेक विद्वान सहकाऱ्यांबरोबर अनेकदा तीव्र मतभेदाचे, कधी कडवट प्रतिक्रियेचे वेळोवेळी प्रसंग येऊनही टिळकांनी त्यांच्या अशा स्नेह्यांबद्दल साश्रू नयनांनी जे श्रद्धांजली लेख लिहिले आहेत, त्यामधून त्यांच्या भावपरतेहून अधिक त्या स्नेह्यांच्या ज्ञानसाधनेबद्दलचा आदरभाव प्रकटतो.
लोकमान्य टिळकांच्या या बौद्धिक शिस्तीमागे त्यांचे गणिताचे प्रेम हेही एक कारण होते. काही काळ फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते गणिताचे प्राध्यापक होतेच. ``राजकारणात पडलो नसतो तर किंवा स्वतंत्र हिंदुस्तानात जन्माला आलो असतो तर गणिताचा प्राध्यापक होऊन संशोधन केले असते,`` हे त्यांचे उद्गार सुप्रसिद्धच आहेत. पण त्यांचे गणितप्रेम केवळ व्यवसायापुरतेच नव्हते. गणिताची गोडी ज्याला नाही, त्याची विचारसरणी एका प्रकारे अपक्व राहते. गणिताच्या योगाने विचारांची साखळी अत्रुटित व सुसंबद्ध होते. गणितात काव्य नाही हे खोटे आहे. शाळांतून किंवा कॉलेजातून जे गणित शिकवितात ती खऱ्या गणिताची पहिली पायरी आहे. काव्यासारखे गणितातही तल्लीन होता येते. मुळाशी पाहिले म्हणजे सर्व शास्त्रे एकरूप आहेत. गणितात काव्य आहे आणि काव्यात गणित आहे, या त्यांच्या उद्गारांतून त्यांची या विषयाकडे पाहण्याची निखळ ज्ञानाची भूमिका समजते. इंटिग्रल कॅल्क्युलस असो वा इतर अवघड प्रमेय असो ते पाठ्यपुस्तकात दिले आहे त्यापेक्षा वेगळ्या रीतीने सोडवण्यात त्यांना आनंद मिळे.
काव्यात गणित आहे, हे विधान टिळकांनी केवळ वादापुरते गमतीने केले नव्हते. तर कवी कालिदासाचे मेघदूत शिकविताना त्यांनी प्रत्यक्ष उपयोजनही करून दाखवले होते. गणिताच्या किंवा भूमितीच्या जशा पायऱ्या असतात, त्याप्रमाणे पहिल्या श्लोकातून दुसरा श्लोक, दुसऱ्यातून तिसरा कसा आला हे त्यांनी समजावून सांगितले. महाकवीच्या प्रतिभेत आणि कल्पनाशक्तीत भूमितीच्या पायऱ्यांप्रमाणे आकृती सूचित असतात. त्यांचा समतोल सांभाळलेला असतो, हे टिळकांच्या मर्मज्ञ प्रज्ञेने जाणलेले होते.
त्यांचे वाचन साहित्याचे असो, चरित्रग्रंथाचे असो वा तत्त्वज्ञानपर पुस्तकाचे असो टिळकांना त्या त्या पुस्तकात गाभा फार लवकर हस्तगत करता येत असे. कधी कधी एखाद्या पुस्तकाचा उपोद्घात आणि उपसंहार वाचून आणि मधल्या काही पानांचे अवलोकन करून त्या लेखकाचे प्रतिपादन नेमके ओळखता येई. तर्कबुद्धीने ते जाणून घेता येते, असा त्यांचा अनुभव होता. मुळातच त्यांना फापटपसारा आणि अघळपघळणा यांची नावड होती. केवळ मनोरंजनार्थ कथाकादंबऱ्या वाचणाऱ्यांची साळूमैनेच्या गोष्टी वाचणारे तरुण म्हणून ते थट्टा उडवीत. किंबहुना अकारण पुनरुक्ती आणि अनावश्यक विस्तार यांचा त्यांना तिटकारा होता.
एकदा हभप पांगारकरबुवा यांचे तीन तीस चाललेले भाषण ऐकल्यानंतर टिळक म्हणाले,  ''काय हे व्याख्यान! व्याख्यान म्हणजे तास किंवा फार तर दीड तास असावं. नियमित वेळात काम करावयास शिकलं पाहिजे.''
ध्येमध्ये जे आठवतं ते मी बोलतो. त्यामुळे श्रोत्यांना विषय पुरता ऐकावयाला मिळतो. आपण काही घड्याळाचे गुलाम नाही.  - पांगारकर
श्रोते वेडे, तुम्ही वेडे. नियमितपणे काम करण्याची सवय लागली पाहिजे. आम्हाला काय दुसरे विषय मध्ये आठवत नाहीत? पण जेवढे मुद्दे सांगायचे अगोदर ठरविले असतील त्याच्या बाहेर जायचे नाही असा निग्रह पाहिजे. -टिळक
काव्यविषयाला असे निर्बंध घालून चालत नाही. - पांगारकर
नियम सर्वत्र पाहिजेत. -टिळक
टिळकांची बौद्धिक शिस्त त्यांच्या सर्व प्रकारच्या लेखनात आढळते. शब्दयोजना आणि वाक्यरचना एवढी घासूनपुसून केलेली असते की एखाद्या अखंड पाषाणातील शिल्पाप्रमाणे एकसंध, एवढासुद्धा तुकडा हलवता येणार नाही! त्यांच्या अशा गद्यशिल्पाचा अजोड नमुना पाहावा तर त्यांच्या सुविख्यात गीतारहस्य या बृहद्ग्रंथातच!
अव्वल इंग्रजी काळातील ओबडधोबड आणि रांगत-धडपडत पुढे जाणाऱ्या बाळबोधी मराठी गद्याला सौष्ठवसंपन्न प्रौढ रीप दिले ते टिळकांच्या या 'गीतारहस्य' ग्रंथानेच! तेराव्या शतकातील पद्याने ज्ञानेश्वरीमधून जे 'अमृताते पैजा जिंके' असे बळ प्रकट केले, तसे आधुनिक काळात मराठी गद्याचे अमृतबळ 'गीतारहस्या'ने! दोघांचाही विषय 'भगवद्-गीता भाष्य' हाच, पण दोहोंत सहाशे वर्षांचे अंतर आणि प्रकृतिभिन्नता व दृष्टीभिन्नता तर सुस्पष्टच. पण 'ज्ञानेश्वरी' आणि 'गीतारहस्यम्हणजे वाग्देवीचे कंठमणी.. पण 'गीतारहस्या'ची थोरवी केवळ त्या ग्रंथाच्या तर्कशुद्ध प्रतिपादनात सामावलेली नाही. तत्त्वज्ञानाचा बृहद् आवाका पेलवणारे पहिलेवहिले ज्युडिशियल प्रोज तर ते आहेच, पण टिळकांनी ज्या कर्मयोग प्रतिपादनार्थ हे संदर्भसंपन्न लेखन केले आहे, ते त्यांचे नवप्रतिपादन त्यांच्या व्यासंगसमृद्धीचे आणि जनहित कळवळ्याचे द्योतक आहे.
लोकमान्य म्हणतात, ''गीतेतील उपदेश परलोक आणि इहलोक या दोहोंतील कार्य साधण्यासाठी सांगितला आहे, नुसत्या परलोकासाठी नव्हे, हे सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे.. उत्कट भक्तीबरोबर आपण जे काही करतो, ते परमेश्वरार्पण करून सर्व व्यवहार चालविणे हे प्रत्येक मनुष्याचे काम आहे, असा गीतेचा उपदेश आहे.. निष्काम कर्म हे ज्ञानप्राप्तीचे नुसते साधन न मानता ज्ञानोत्तर कर्म करावयास गीतेने सांगितले आहे. मनुष्यमात्राच्या अंगी असणाऱ्या बुद्धी, श्रद्धा, कर्म या तीन वृत्तींची गीताधर्मात सुंदर जोड घातली आहे. अर्जुनास आपल्या कर्तव्याबाबत मोह पडला अशी गीतेची सुरुवात आहे आणि श्रीकृष्णांनी गीता सांगून त्यास ताळ्यावर आणले व युद्ध करण्यास लावले हा गीतेचा उपसंहार आहे. अर्जुनाने संन्यास घ्यावा किंवा सर्वकाळ भक्तीत गढून राहून दुसरे काम करू नये, असे श्रीकृष्णाला सांगावयाचे नव्हते. त्याने दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाची निर्भर्त्सना केली आहे व 'नियतं कुरु कर्म त्वम्असे सांगितले आहे. यावरून गीतेचे काही तात्पर्य असेल तर ते प्रवृत्तीपर म्हणजे कर्मपरच असले पाहिजे हे उघड आहे.''
'गीतारहस्य' लेखनामागची लोकमान्य टिळकांची भूमिका अशी सुस्पष्ट आहे. मंडालेच्या कारावासात हे लेखन झालेले आहे. पुरेसे संदर्भग्रंथ हातांशी नसातानाही हा ग्रंथ लिहिला गेला आहे. ऐहिक जगातील राजकीय विद्वेषातून वाट्याला आलेल्या बंदिवासात असताना एका वैश्विक विषयाला हात घालून प्रवृत्तिपर कर्मयोगाचे प्रतिपादन टिळकांनी करावे, ही त्यांच्या विद्वत्तेची विस्मयकारक निष्पत्ती आहे.
पण 'गीतारहस्या'पेक्षा वेगळ्या विषयातील त्यांच्या स्वतंत्र संशोधन प्रज्ञेचा प्रत्यय येतो तो त्यांनी इंग्रजीत लिहीलेल्या 'ओरायन' आणि 'आर्टिक होम इन् वेदाज' या ग्रंथामधून. एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विद्वानांच्या प्राच्यविद्या परिषदेकडे पाठवलेला 'ओरायनहा संशोधनपर निबंध १८९३ साली पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. त्यांचे भगवद्गीतेवरील सातत्याने सुरू असलेले चिंतन हाच या संशोधनाचा मूलाधार आहे. 'मासानां मार्गशीर्षोहम्या वचनाचा गूढ अर्थ शोधता शोधता वेदकालनिर्णयाबद्दल एक नवा प्रकाश टिळकांना दिसला. मॅक्समुल्लर या भाषापंडिताने यापूर्वी वेदकाळाबद्दल भाषाशास्त्रीय पद्धतीने उलगडा केला होता. पण टिळकांना ती पद्धती फार ढोबळ वाटत होती. त्यांनी ज्योतिर्गणिताच्या आधारे वेदकाळाबद्दलची नवी उपपत्ती 'ओरायन' मध्ये मांडली. टिळकांच्या गणिती मनाला आकाशातील ताऱ्यांची गती आणि बदलणारी स्थिती यामध्ये रेखीवपणा आढळला. वसंतसंपात आणि शरत्संपात या ज्योतिर्वेदातील संकल्पनांच्या आधारे त्यांनी ऋग्वेदातील संदर्भ तपासले आणि त्यावरून गणित मांडून वेदांचा काळ इ.. पूर्व ४००० ते २५००० वर्षांपर्यंतचा असावा, असे अनुमान काढले. भारतीय आणि ग्रीक पुराणातील काही गोष्टींचा पूरक आधार दिला. त्यांच्या या अनुमानाला शं. बा. दीक्षित यांच्यासारख्या समकालीन महापंडिताची जशी संमती होती, डॉ. ब्लूमफील्डसारख्या प्राच्यविद्या संशोधकानेही टिळकांच्या या स्वतंत्र नव्या दृष्टिकोनाला त्या वर्षातील सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाची घटना म्हणून गौरविले आहे. 'आर्यांचे मूळ वसतिस्थान' या दुसऱ्या ग्रंथातही त्यांच्या मूलगामी संशोधनप्रज्ञेचा प्रत्यय येतो. तेरा भागातील या ग्रंथात ध्रुव प्रदेशाचे शास्त्रशुद्ध वर्णन दिले असून आर्यांचे मूळ वसतिस्थान उत्तर ध्रुवाजवळील प्रदेशातच होते हे पौराणिक कथांच्या आधारे स्पष्ट केले आहे.
टिळकांची ही दोन्ही संशोधने आज निर्विवाद मान्य होणारी नसली तरी त्यांच्यातील ज्ञानोपासकाची संवेदनशीलता त्यामधून जाणवते. वेदकालीन संस्कृतींचा अभ्यास करताना तिच्या उत्तुंगतेने टिळकांचे मन उचंबळून येते आणि तिच्या उदात्त रूपाने त्यांच्या अभ्यासक मनाला अपूर्व साफल्य लाभते, हे महत्त्वाचे आहे. 'ज्याची ज्ञानलालसा असाधारण त्याला ग्रंथांच्या सहवासात दिवाळी सणाचा आनंद मिळतो,' अशा आशयाचे उद्गार टिळकांचे आहेत, त्याचे मर्म अशा प्रसंगी उमगते.
पंचांग संशोधन हा टिळकांच्या ज्ञानमग्न व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू. सामान्यजनांना टिळकपंचांग परिचित असले तरी त्यामागील त्यांची बौद्धिक चिकित्सा, पंचांग संशोधन परिषदा भरविण्यासाठी त्यांनी घेतलेली यातायात, अभ्यासकांनी त्यांनी केलेले वादविवाद याची कल्पना सामान्यांना येणार नाही. ग्रहलाघवीय पंचांगाचा आग्रह सोडून गणितशुद्ध पंचांगाचा स्वीकार करावा अशी त्यांची भूमिका होती. भावी काळात त्याला फार मोठी लोकमान्यता मिळाली नाही हे खरे असले तरी टिळकांचे बौद्धिक परिश्रम कमी मोलाचे ठरत नाहीत.
लोकमान्य टिळकांची अक्षय ज्ञानलालसा त्यांना फुरसत मिळताच ग्रंथांच्या सहवासात ओढून नेई. इंग्लंडमधील वास्तव्यात इंडिया हाऊस ग्रंथालयात वाचत बसण्यात त्यांना आनंद मिळे. 'मॅक्समुल्लर तुरुंगात जवळ होता म्हणून दिवस चांगले गेले' हे त्यांचे उद्गार त्यांच्या ग्रंथप्रेमाचे द्योतक आहेत. तुरुंगातून घरी लिहिलेल्या त्यांच्या अनेक पत्रांमधून पुस्तकांचा वारंवार उल्लेख असे. त्यांना हवा असलेला ग्रंथ नेमका कोठे आहे, कपाटाच्या कोणत्या खणात आहे, कोणत्या रंगाचा व आकाराचा आहे याचा तपशील ते दूरवर तुरुंगात बसून सांगत. स्वतःच्या ग्रंथसंग्रहाची हेळसांड झालेली तर त्यांना बिलकुल खपत नसे. त्यातले काही दाखलेच पाहा ना!
''कौमुदीचे पुस्तक सापडत नाही म्हणता? मग ते काय सांडलं? अशीच आणखीही बुके गहाळ झाली असतील अशी शंका वाटते. कोणीही येतो व पुस्तक घेऊन जातो असे दिसते. केळकर आणि सदाशिव भावे यांना म्हणावे, लायब्ररीची पुस्तके तरी नीट सांभाळा. बाहेर कोणास होता होई तो पुस्तक देऊ नये. मला व्याकरण पाहिजे ते पालीभाषेचे. हे सुमारे शंभर पानांचे पुस्तक कातडी पुठ्ठा घातलेले फ्रान्समध्ये छापलेले आहे.”
 “मजजवळ आता गीतेची सर्व भाष्ये जमली आहेत. फक्त वल्लभाचार्यांचे तेवढे नाही. मुंबईत जेष्ठराम यांच्याकडे चौकशी कर. ते वल्लभाचार्यांच्या मुंबईतील महाराजांजवळ नक्की शोध करतील. मधुसूदन सरस्वती यांच्या प्रस्थानभेदाचीही एक प्रत पाठवावी. जर्मन तत्त्ववेत्ता लिट्झ याची इंग्रजीत भाषांतर झालेली तत्त्वज्ञानावरील चारही पुस्तके पाहिजेत. तसेच बौद्धधर्म व ख्रिस्तीधर्म यांच्यावरील श्नेडर यांचे जर्मन भाषेतील पुस्तक प्रो. घाटे यांना सांगून ऑटो हॅ रोजॉ विट्झ यांच्याकडून व लॉरिन्सर याची भगवद्गीता व सुत्तनिपात (फॅन्सबॉल यांच्या टीकेसह) पाठवावी.”
''वेबरच्या नक्षत्राच्या दोन प्रती आपल्या संग्रही होत्या, पण तुम्हाला एकही सापडली नाही, हे कसे? तरी मोठ्या दालनातील भिंतीशी पूर्वेकडील टेकून ठेवलेल्या तीनही कपाटात आणि मधोमध ठेवलेल्या दोन शिसवी कपाटात नीट शोधा. यंदे यांना देण्याची नाट्यकथार्णवातील अपुरी पुस्तके त्याच कपाटात कागदात गुंडाळलेली सापडतील.''
टिळकांचे हे विलक्षण ग्रंथप्रेम अतिशय डोळस होते. सखोल आणि मनःपूर्वक वाचनातूनच बुद्धीची मशागत होते, अशी त्यांची धारणा होती. महाभारतासारखा बृह्द् ग्रंथ मुळातून एकदा वाचणे भल्याभल्यांनाही कष्टप्रद वाटते, पण टिळकांनी तो मुळातून तीनतीनदा वाचला होता आणि भारताचार्य चिं. वि. वैद्य यांच्याबरोबर अनेकदा वादही केला होता. भगवद्गीता तर त्यांनी बालपणापासूनच मुखोद्गत केलेली होती, वेळोवेळी चिंतन-मनन केले होते आणि मंडालेच्या तुरुंगात फुरसत मिळताच गीतारहस्याचे लेखन हातावेगळे केलेले होते. महाभारत, गीतेप्रमाणेच पूर्वमीमांसाशास्त्र त्यांना विशेष आवडत होते. त्यामुळे तर्कानुगामी विचार पद्धती विकसित होते, अशी त्यांची अनुभवसिद्ध धारणा होती.
टिळकांच्या या चौफेर आणि सखोल वाचनाचा त्यांना पत्रकारितेमध्ये आणि न्यायालयात खटल्यांना सामोरे जाताना फार फार लाभ झाला. अनेक विधिज्ञ कायद्याच्या अचूक संदर्भाबाबत वेळोवेळी चर्चा करीत. कायद्याच्या व्यासंगाच्या बळावर ते भल्या भल्या प्रतिपक्षालाही खटल्याच्या वेळी घायाळ करीत. चिरोल खटल्यात टिळकांना कार्सनसारख्या बड्या धेंडाच्या उलटतपासणीला तोंड देण्याचे दिव्य करावयाचे होते. कार्सन यांनी तत्पूर्वी आणि नंतर अनेक भल्याभल्यांना आपल्या उलटतपासणीच्या माऱ्याने जेरीला आणले होते. पण लोकमान्यांनी कार्सन यांचे वार चुकविले. इतकेच नव्हे, तर कार्सन यांनाच दोन फटके मारून रक्तबंबाळ केले. आतापर्यंत झालेल्या चिरस्मरणीय खटल्यात आणि वकील व साक्षीदार यांच्यात निर्माण झालेल्या ऐतिहासिक चकमकीत कार्सन व टिळक यांच्या चकमकीचा अवश्य उल्लेख करावा लागेल. कार्सन अनेक वेळा टिळकांच्यापुढे कमी पडत, वकिली डावपेचांना टिळक तसाच पेच टाकून उत्तर देत, संधी सापडताच निर्भयपणे प्रतिहल्ला करीत, असा बॅ. बॅप्टिस्टा यांचा अनुभव आहे. विद्वत्ता आणि व्यासंगाच्या बळावरच टिळकांनी ही निर्भयता प्रकट केली होती हे स्पष्टच आहे.
विद्वत्ता आणि व्यासंगाचा टिळा असा लोकमान्य टिळकांचा सार्थ अभिमान बाळगावा याचा प्रत्यय सामान्यजनांना 'केसरी'तील त्यांच्या अनेक अग्रलेखातून वारंवार येतो. अग्रलेखांच्या टोकदार, धारदार शीर्षकापासून ते समर्पक अवतरणे देऊन बिनतोड युक्तिवाद करण्याच्या त्यांच्या अपूर्व चापल्यापर्यंत त्यांच्या व्यासंगाच्या खुणा शोधता येतात. त्यांच्या अग्रलेखांची शीर्षके तर अत्यंत वेधक आणि मार्मिक असत. 'उजाडले, पण सूर्य कोठे आहे !' 'बादशहा ब्राह्मण झाले', 'प्रिन्सिपॉल, पशुपाल की शिशुपाल', `हे आमचे गुरूच नव्हेत', 'डोंगर पोखरून उंदीर निघाला', 'पुनश्च हरिः ओम्', 'नवी विटी,नवे राज्य!', 'युनिव्हर्सिट्या ऊर्फ सरकारी हमालखाने', 'चतकोर भाकरीची गुलामगिरी!' यासारखे कितीतरी अग्रलेख अशा मथळ्यांमुळे लक्षात राहतात, तसेच त्यामधून प्रकट होणारी जनहिताची कळकळ, अभ्यासपूर्वक मिळवलेली माहिती, तर्कशुद्ध प्रतिपादन यामुळेही संस्मरणीय ठरतात. किंबहुना या गुणांमुळेच टिळकांचे वृत्तपत्रीय लेखन हे निर्माल्यवत न होता अक्षरवाङ्मयाच्या दालनात विराजमान होते.
काही सामान्य कुवतीचे तत्कालीन आंग्लविद्याविभूषित तरुण इंग्रजधार्जिण्या 'टाइम्स' चे एडिटर बनून काही तरी वल्गना करीत, तेव्हा त्यांची निर्भर्त्सना करताना टिळकांची लेखणी सात्त्विक प्रक्षोभाने धारदार बनते. “अँग्लो इंडियनांची पोरे इकडे येऊन एखाद्या अँग्लो इंडियन पत्राची एडिटरे झाली म्हणजे मग त्यांच्या उद्दामपणास, घमेंडखोरीस आणि अहंमन्यतेस सीमा नाहीशी होऊन हव्या त्या बाबतीत आणि वाटेल तेव्हा आपला पोक्त उपदेश या देशातील लोकांना देण्यास ती नेहमी तयार असतात.. ही धृष्टता, हे साहस आणि हा कावेबाजपणा कातडीच्या रंगाच्या जोरावर आहे; विद्वत्तेच्या, सौजन्याच्या किंवा विवेकीपणाच्या जोरावर नाही, हे आम्ही ओळखून आहोत व म्हणून मोरोपंतांच्या शब्दांनी 'निज नीचपण प्रकटिसि तू श्वान भल्यावरीही भुंकोन' अशी या पत्रकारास आम्ही इशारत देत आहोत.”
अशी क्षोभकारक लेखणी जेव्हा एखादी संकल्पना देण्यास सिद्ध होते तेव्हा किती संयत आणि स्पष्टार्थबोधक बनते हे 'स्वराज्य आणि सुराज्य'सारख्या अग्रलेखातून जाणून घेता येते. “ 'स्व' म्हणजे 'ज्याचा तो', किंवा लोक अथवा एकंदर प्रजा आणि त्यांचे म्हणजे त्यांच्या सल्ल्याने चालणारे जे राज्य ते 'स्वराज्य'. अशा स्थितीत राजा स्वदेशी असला तर चांगलेच, पण परदेशस्थ असला तरी फारशी हानी होत नाही. असले राज्य प्रायः व्यवस्थित आणि शिस्तवार किंवा एका दृष्टीने सुराज्य असावयाचेच. पण शिस्त थोडी कमी असली म्हणून तिची किंमत स्वातंत्र्यापेक्षा काही अधिक धरता येत नाही. सुराज्याने स्वराज्याची वाण भरून येत नाही, असे जे म्हणतात त्याचा अर्थ हाच होय. सर्वांत मु्ख्य गोष्ट आपल्या मताप्रमाणे जे आपल्यास हित वाटते, त्या धोरणाने राज्यव्यवस्था चालविण्याचा आपणा सर्वांस अधिकार असावा ही होय, खरे स्वराज्य हेच होय आणि याच अर्थाने हा शब्द आम्ही वापरीत असतो.”
लोकमान्य टिळकांच्या कोणत्याही लेखनाचे अधिष्ठान ज्ञानजिज्ञासा आणि चिकित्सा हेच असल्याने त्यांच्या वाग् गंगेतून विचारांची मोठी जहाजेसुद्धा सुखाने फिरत आणि विनागोंधळ ईप्सित बंदरावर पोचत असत. वृत्तपत्रीय लेखनाबद्दल लोकमान्य टिळक नेहमी आपल्या नवोदित सहकाऱ्यांना इशारा देत असत की,बंदुकीतून सुटलेल्या गोळीप्रमाणे संपादकीय मत निश्चित, अचूक मर्मभेद करणारे व ठणठणीत असावे.”  “न्यायाधीश आपल्या खुर्चीवर बसताना जसा युनिफॉर्मचा झगा अंगावर घालून बसतो व तो घालतांच सर्वाधिकारसंपन्न ठरतो, तसाच संपादकानेही हातात लेखणी घेताना सर्वज्ञत्वाचा झगा अंगावर घालूनच बसले पाहिजे. कारण ती जागाच अशी आहे की, तेथे विनयापेक्षा हुकुमतीची भाषा, शंकाखोरीपेक्षा आत्मविश्वासाचे शब्द हेच अधिक काम देतात.”
वृत्तपत्रीय लेखनात कायद्याची सीमा भिडविली पाहिजे व सांभाळलीही पाहिजे. स्पष्ट आवेशाने तर लिहिलेच पाहिजे, पण शक्य तेथवर कायद्यात न सापडेल अशा बेताने लिहिले पाहिजे. खेळात तडफ दाखविली पाहिजेच. पण घाबरून गेल्यावर किंवा मार खाल्ल्यावर खेळ बिघडतो व हरलाही जातो, हे लक्षात ठेवले पाहिजे. 'केसरी व्यक्तीपक्षपाती नाही, तत्त्वाचा आहे'. याचा पुनरुच्चार करताना टिळकांनी म्हटले आहे,केसरीकरांना मनुष्यापेक्षा अगर संस्थेपेक्षा लोकहिताची म्हणून जी काही तत्त्वे आहेत ती जास्त प्रिय आहेत.” ते नेहमीच न्यायाची भूमिका घेत, ''रावसाहेब घोड्यावरून खाली आले' आणि 'गण्या घोड्यावरून पडला', अशा प्रकारचा भेद 'केसरी' कधीही करीत नाही हे टिळकांनी स्पष्ट केलेले आहे.
त्यांच्या या न्यायप्रिय वृत्तीमुळे ना. गोखल्यांसारख्या स्वकीय स्नेह्यालासुद्धा 'चोराच्या उलट्या बोंबा' असा आहेर देण्यास ते कमी करीत नाहीत किंवा एखाद्या संस्थानिकाने वेदान्तावर काही अज्ञानमूलक मते व्यक्त केली तेव्हा "ईश्वराचे अस्तित्व उपयुक्ततेवर आहे या समजुतीपलीकडे जर महाराजांचे विचार गेलेले नसतील तर त्यांनी वेदान्तसारख्या गहन विषयावर भाषण करू नये हे चांगले. सर्वज्ञतेचा त्यांनी काही विडा उचललेला नाही,असे ठणकावून सांगण्याचा निर्भयपणा टिळकांच्या ठायी निर्माण होतो तो त्यांच्या कष्टार्जित विद्वत्ता-व्यासंगामुळेच!
"गणिताप्रमाणेच धर्म हे एक स्वतंत्र शास्त्र आहे व त्याला एका विशिष्ट मनोवृत्तीची आवश्यकता असून अध्ययन, ग्रंथावलोकन आणि मनन यांचीही गणितशास्त्राइतकी किंबहुना अधिकच आवश्यकता आहे", असा सुस्पष्ट इशारा टिळकांनी रँग्लर परांजपे यांना दिला, त्यामागे टिळकांची ज्ञानविश्वासाकडे पाहण्याची निखळ दृष्टी होती. त्यांच्या बौद्धिक सामर्थ्यामुळे त्यांच्या राजकारणाची नदी खळखळाट करीत वाहत नव्हती, तर तिची खोली व विस्तार प्रचंड असल्याने त्या नदीच्या प्रवाहाला गती असूनही एक प्रकारचा संथपणा होता. ते ज्ञानसाधना अखेरपर्यंत करीत होते पण राजकारणाचा संन्यास घेऊन त्यांनी ज्ञानसाधनेसाठी स्वतःची मठी स्थापन केली नाही. त्यांची ज्ञानाच्या क्षेत्रातील महत्ता एवढी होती की एखाद्याने एवढ्या बळावरच आकाशाला गवसणी घालण्याची दर्पोक्ती केली असती. पण टिळक हे 'लोकमान्य' होते आणि जनसामान्यातील आपले अस्तित्व ते कधीही विसरले नाहीत म्हणून जमिनीचे पूर्ण भान ठेवूनच असीम आकाशाची, ज्ञानविश्वाची साधना त्यांनी केली. एखाद्या शाल्मली वृक्षाप्रमाणे विविध ज्ञानशाखांमध्ये स्वतःला विस्तारले आणि 'पहिले ते राजकारणकरता करताच ज्ञानोपासनाही चालू ठेवली. 'आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे' अशा सुखासमाधानाने या जगाचा निरोप घेतला.
'विद्वत्ता आणि व्यासंगाचा टिळा' अभिमानाने मिरवावा असे हे लोकमान्य टिळक आपल्या या 'राकट देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा' ,  हे केवढे आमचे भाग्य !


-    प्रा. सुरेश जोशी,
'मानसी' अपार्टमेंट,
मधली आळी,
देवरूख – ४१५८०४
(९४२३८७४७८१)
(सौजन्य – आकाशवाणी, रत्नागिरी. १ ऑगस्ट १९९७)

No comments:

Post a Comment