Tuesday 14 July 2015

गीतारहस्यविषयक चर्चासत्रासाठी कतारमधून अठरा हजाराची देणगी

                     रत्नागिरी – लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेवर लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथाला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने रत्नागिरीत होणाऱ्या चर्चासत्रासाठी कतारमधील मराठीभाषिकांनी अठरा हजाराची देणगी नुकतीच दिली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागाने गीता मंडळाच्या सहकार्याने येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी गीतारहस्याविषयी सांगोपांग परिचय घडविण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन गीता भवनात होणार आहे. दोन दिवसांच्या या चर्चासत्रासाठी आता व्यवसायानिमित्ताने कतारमध्ये वास्तव्य असलेले मूळचे रत्नागिरीतील रहिवासी गणेश कृष्णा पाटील यांनी व्यक्तिगतरीत्या पाच हजार आणि कतारमधील गणेश मित्रमंडळातर्फे तेरा हजार रुपये अशी अठरा हजाराची देणगी आयोजकांकडे सुपूर्द केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागाचे अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी ती स्वीकारली. याशिवाय रत्नागिरी जिल्हा पदवीधर शिक्षक संघटनेने पंचवीस हजाराची देणगीही ही श्री. लिमये यांच्याकडे सुपूर्द केली.

                सर्वांच्या सहकार्याने चर्चासत्र पार पडणार असून इच्छुकांनी देणग्या देऊन आगळ्या वेगळ्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन गीता मंडळ आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानच्या कोकण विभागीय कार्यालयाशी (टिळक आळी, रत्नागिरी. दूरध्वनी – 02352-222701) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment