Saturday, 1 August 2015

मुलांवर गीतेचे संस्कार होण्यासाठी `झोंपाळ्यावरची गीता`

सदानंद मोरे – रत्नागिरीत 98 व्या वर्षी पुनर्प्रकाशन

रत्नागिरी - ``मुलांवर गीतेचे संस्कार लहान वयातच व्हावेत, यासाठी कवी अनंततनय यांनी `झोंपाळ्यावरची गीता` लिहिली. दोनच वर्षांनी शंभर वर्षे पूर्ण करणार असलेली ही गीता पुन्हा एकदा चांगले औचित्य साधून प्रसिद्ध होत आहे. ते उपयुक्त आहे``, असे प्रतिपादन घुमान येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
`झोपाळ्यावरची गीता`चे प्रकाशन करताना साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे.
सोबत (डावीकडून)  प्रकाशक प्रमोद कोनकर, प्रा. डॉ. सुरेश जोशी, राजाभाऊ लिमये,
प्रकाश (बापू) काणे, 
अॅड. मिलिंद पिलणकर
दत्तात्रेय अनंत आपटे ऊर्फ कवी अनंततनय यांनी १९१७ साली लिहिलेल्या झोंपाळ्यावरची गीता` या श्लोकसंग्रहाचे पुनर्प्रकाशन शनिवारी (ता. 1) रत्नागिरीत झाले. लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्यच्या प्रकाशनाच्या शताब्दीनिमित्त रत्नागिरीत दोन दिवसांचे विशेष चर्चासत्र यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि गीता मंडळातर्फे सुरू झाले. तेच औचित्य साधून झोपाळ्यावरच्या गीतेचे पुनर्प्रकाशन श्री. मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ``दत्तात्रेय आपटे हे लोकमान्य टिळकांच्या अऩुयायांपैकी एक होते. त्यांनी लोकमान्यांचे ओवीबद्ध चरित्रही लिहिले. त्याचा दुसरा भाग मात्र प्रसिद्ध होऊ शकला नाही. लोकमान्यांचे गीतारहस्य 1915 साली प्रसिद्ध झाले. गीतारहस्य छापले गेल्यानंतर गीता हा महाराष्ट्रात चर्चाविषयाचा केंद्रबिंदू झाला. सगळीकडे लोक चर्चा करू लागले. टिळकभक्त अनंततनयांनाही गीतेविषयी काही लिहावे, असे वाटले आणि दोनच वर्षांनी 1917 मध्ये त्यांनी झोंपाळ्यावरची गीता लिहिली. मुळात झोपाळ्यावरची गीता म्हणजे काय, हे समजायला हवे. प्रत्यक्ष गीतेचे संस्कार लहनापणापासूनच मुलांवर व्हायला हवेत, असे त्यांना वाटले. मुलांवर आईच संस्कार करू शकते. पण आईला तरी गीता माहीत व्हायला हवी, हे लक्षात घेऊन त्यांनी त्या काळच्या महिला सीता गीताप्रमाणे ओव्या म्हणत, त्या पद्धतीने गीतेतील श्लोकांचा अर्थ लावला. त्याकाळचा हा वेगळा प्रयोग होता. झोपाळ्यावर झोका घेता घेता विशेषतः महिलांना गीतेचे तत्त्वज्ञान सांगता आले पाहिजे, यासाठी महिलवर्ग आणि मुलींना पुढे ठेवून झोपाळ्यावरची गीता त्यांनी लिहिली.``

मूळचे रत्नागिरीचे रहिवासी आणि पुण्यातील पत्रकार अनिकेत कोनकर यांनी हे संकलन केले असून रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनने ही पुस्तिका प्रकाशित केली आहेतरुण वयातच गीतेविषयीचे संकलन करावेसे वाटणाऱ्या अनिकेतचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असेही ते म्हणाले.


...............


No comments:

Post a Comment