Sunday, 2 August 2015

गीतेच्या माध्यमातून ब्रिटिशांविरुद्ध लढण्यास लोकमान्यांनी प्रवृत्त केले

गीतारहस्य चर्चासत्र


श्रीराम शिधये – पहिल्या दिवशी शं. रा. तळघट्टी, डॉ. कल्याण काळे यांचेही निबंधवाचन


 रत्नागिरी - ``ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा उत्तम मेळ साधूनच श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त केले. तेच गीतेचे रहस्य असून गीतारहस्य हा ग्रंथ लिहिताना लोकमान्यांनी भारतीय जनतेला ब्रिटिशांविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले``, असे मत ज्येष्ठ पत्रकार श्रीराम शिधये यांनी व्यक्त केले.

  लोकमान्य टिळक आणि गीतारहस्याविषयी
विचार मांडताना श्रीराम शिधये
टिळकांनी भगवद्गीतेवर लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या ग्रंथाचा सांगोपांग परिचय करून देणारे दोन दिवसांचे चर्चासत्र रत्नागिरीत शनिवारी (ता. १) सुरू झाले. चर्चासत्राचा प्रारंभ घुमान येथील अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या बीजभाषणाने झाला. त्यानंतर श्री. सिधये यांनी `लोकमान्य टिळक आणि गीतारहस्य` या विषय़ावरचा आपला निबंध सादर केला. ते म्हणाले, ``टिळकांच्या विचारधारेला तत्त्वज्ञानाची पक्की बैठक होती. अव्वल इंग्रजी अमदानीत कायद्याची परीक्षा देणाऱ्या टिळकांनी इंग्रजी माणसाची वृत्ती आणि मनोधारणा पक्की ओळखली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी नेमके काय करायला हवे, याचे पक्के आराखडे त्यांनी मनाशी बांधले होते. त्यांच्या आणि तत्कालीन भारतीय राजकारणाच्या प्रगतीच्या दृष्टीने त्यांच्या आयुष्याचे तीन कालखंड दिसतात. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय वाटचाल करताना सोळाव्या वर्षापासून भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाचा त्यांनी केलेला अभ्यासही त्यांच्या कामी आला. त्यातूनच सहा वर्षांचा मंडालेच्या तुरुंगातील शिक्षेचा काळ त्यांना गीतारहस्य लिहिण्यास उपयुक्त ठरला.`` टिळकांची भाषणे, सामाजिक उपक्रम आणि राजकीय चळवळींचा मागोवाही श्री. शिधये यांनी घेतला. गीतेचे तत्त्वज्ञानच त्यांना वेळोवेळी अंगीकारल्याचे दिसते, असेही ते म्हणाले. वैज्ञानिक प्रगती आणि भोगवादामुळे निर्माण होणारा संदेह दूर करण्यासाठी टिळकांनी लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
`आद्य शंकराचार्य आणि टिळक` या विषयावरील निबंध प्रा. डॉ. शं. रा. तळघट्टी यांनी सादर केला. ते

प्रा. डॉ. शं. रा. तळघट्टी यांनी शंकराचार्य आणि
टिळकांची तुलना करणारे अभ्यासपूर्ण विवेचन केले.
शेजारी प्रा. डॉ. सुरेश जोशी

म्हणाले, ``आद्यशंकराचार्य आणि लोकमान्य टिळक यांच्या गीतेविषयीच्या भूमिका परस्परविरोधी असल्याचे मानले जाते. प्रत्यक्षात गीतेतील तत्त्वज्ञानाकडे पाहण्याच्या दोघांच्याही भूमिका परस्परपूरकच आहेत. मात्र गीतेच्या प्रयोजनासंबंधी दोघांची मते भिन्न आहेत. मोक्ष म्हणजेच निवृत्ती हेच गीतेचे प्रयोजन आहे, असे शंकराचार्यांचे मत आहे, तर टिळकांच्या मते कर्मयोगस्वरूपाच्या धर्म या पुरुषार्थाची सिद्धी म्हणजेच प्रवृत्ती हाच गीता सांगण्याचा उद्देश आहे. गीतेचा व्यावहारिक उपयोग टिळकांनी सांगितला, जो आजही कर्माला म्हणजेच कार्य करत राहण्याला प्रवृत्त करतो.`` शंकराचार्य, टिळक, समर्थ रामदासांचे विविध दाखले देऊन त्यांनी आपल्या मुद्द्याचे स्पष्टीकरण केले.
डॉ. कल्याण काळे यांना पगडी घालून सत्कार करताना
प्रा. चंद्रमोहन देसाई. शेजारी प्रा. डॉ. सुरेश जोशी
अखेरच्या सत्रात डॉ. कल्याण काळे यांनी `कर्मविपाक आणि कर्मयोग` या विषयावरचा निबंध सादर केला. जातीधर्म, पुरुष-स्त्री अशी मानवी जीवनातील विविध प्रकारची विषमता दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यांचा चांगला परिणाम होत असला, तरी शारीरिक व्यंगे, आर्थिक दैन्य, आकस्मिक संकटे इत्यादींमुळे होणारी सुखदुःखाची विषमता दूर करता येत नाही. अशा वेळी भारतीय लोक पूर्वजन्माशी आणि आपल्या कर्माशी त्याचा संबंध लावतात. चुकांची पुनरावृत्ती टाळतात. सावधानता बाळगतात. यातील वस्तुस्थितीचा अभ्यास टिळकांनी गीता, महाभारत, मनुस्मृती आणि वेदवाङ्मयाचा शोध घेऊन केल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. माणसाने केलेल्या कर्माचे फळ म्हणजे कर्मविपाक असे स्पष्ट करून त्यांनी याबाबत गीतेतील तत्त्वज्ञान टिळकांनी सोपे करून सांगितल्याचे नमूद केले. पापपुण्याच्या कल्पना, संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म, कर्माचे फळ इत्यादींची माहिती देऊन सविस्तर विवेचन त्यांनी केले.
.................

No comments:

Post a Comment