Sunday, 2 August 2015

आजच्या काळात गीतारहस्याच्या तत्त्वज्ञानाची अधिक गरज

दा. कृ. सोमण – गीतारहस्य ग्रंथावरील चर्चासत्राचा रत्नागिरीत समारोप

चर्चासत्राच्या समारोप सत्रात बोलताना खगोल अभ्यासक
दा. कृ. सोमण. व्यासपीठावर डॉ. सुरेश जोशी, पद्मश्री
मधू मंगेश कर्णिक, प्रकाश काणे
रत्नागिरी - ``निद्रिस्त समाजाला जागृत करण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी लोकमान्यांनी गीतारहस्य ग्रंथ लिहिला असला, तरी शिस्त आणि जबाबदारीचा अभाव असलेल्या आजच्या काळात त्या ग्रंथातील तत्त्वज्ञानाची अधिक गरज आहे``, असे मत पंचागकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्यच्या प्रकाशनाच्या शताब्दीनिमित्त रत्नागिरीत दोन दिवसांचे विशेष चर्चासत्र यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि गीता मंडळाने आयोजित केले होते. चर्चासत्राच्या समारोप सत्रात श्री. सोमण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चर्चासत्राचे समन्वयक प्रा. डॉ. सुरेश जोशी, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काणे उपस्थित होते. श्री. सोमण पुढे म्हणाले, ``गीतारहस्यावर शताब्दीच्या निमित्ताने दोन दिवस चर्चा झाली. अशा तऱ्हेची चर्चा महाराष्ट्रात सर्वप्रथम रत्नागिरीत झाली. वास्तविक ती टिळकांच्या कर्मभूमीत म्हणजे पुण्यात व्हायला हवी होती. हा ग्रंथ निवृत्तीचा नव्हे, तर सतत कार्यरत राहण्याचा संदेश देतो. म्हणूनच निवृत्तीच्या काळात नव्हे, तर तरुणांनी वाचायचा हा ग्रंथ आहे. वास्तविक शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, पाणीटंचाई, औद्योगिक प्रश्नांबाबत पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन करायला हवे. मात्र ज्ञानाच्या अभिवृद्धीकडे प्राध्यापक लक्ष देत नाहीत, असे टिळकांनी म्हटले होते. त्यांचे ते विधान आजही खरे आहे. त्यामुळे आजचा समाज कोणीतरी अवतार घेईल आणि आपला उद्धार करील, म्हणून वाट पाहतात. बोगस महाराज आणि भोंदू साधू गल्लोगल्ली निर्माण होत आहेत. समाज त्यांच्या भजनी लागत आहे. खरा ईश्वर लोकांनी ओळखलाच नाही. अशा स्थितीत समाजात शिस्त आणि जबाबदारीचा अभाव जाणवतो. यावेळी वर्तमानात जगा, सतत कार्यरत राहा, असा संदेश देणाऱ्या लोकमान्यांच्या गीतारहस्याच्या अभ्यासाची आणि अनुकरणाची खरी गरज आहे.``
समारंभात मधू मंगेश कर्णिक, श्री. सोमण यांचा पगडी देऊन सत्कार करण्यात आला. समन्वयक प्रा. डॉ. सुरेश जोशी यांनी चर्चासत्राच्या आयोजनाचा हेतू साध्य झाल्याचे सांगितले. निबंध स्पर्धेतील बक्षिसाचे वितरण करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काणे यांनी आभार मानले. यावेळी विनायक हातखंबकर, कृ. आ. पाटील, चंद्रमोहन देसाई यांच्यासह चर्चासत्राच्या आयोजकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
.............

समारोप सत्रात बोलताना पद्मश्री मधू मंगेश कर्णिक.
शेजारी डॉ. जोशी, श्री. सोमण, श्री. काणे

चर्चासत्र म्हणजे राष्ट्रीय भावना - कर्णिक

``लोकमान्य टिळक आणि त्यांनी लिहिलेले गीतारहस्य लोकोत्तर आहेच, पण या ग्रंथाविषयीच्या चर्चासत्राचे आयोजन म्हणजे ऱाष्ट्रीय भावना आहे. या चर्चासत्रातून जिज्ञासा जागृत होते आणि जिज्ञासा ज्ञानापोटी जन्माला येते``, अशा शब्दांत पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी अध्यक्षीय समारोपात चर्चासत्राच्या आयोजनाचा गौरव केला. ते म्हणाले, ``लोकमान्यांनी मंडाले येथील तुरुंगात गीतारहस्याचे लेखन केले. त्यामुळे त्यांना झालेला तुरुंगवास ही इष्टापत्तीच होती, असे म्हणावे लागेल. परदेशी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून त्यांनी गीतेवरचे भाष्य लिहिले आणि स्वतःचे तत्त्वज्ञान निर्माण केले. इतरांपेक्षा भारतीय तत्त्वज्ञान श्रेष्ठ होते, हेच त्यांनी सिद्ध केले. ते करतानाच सर्वसामान्यांच्या जिज्ञासेला पोषक अशा शब्दांत त्यांनी या ग्रंथाचे लेखन केले. ``

No comments:

Post a Comment