बिवलकर, करंदीकर बहीणभावांनी उलगडला संसारशास्त्र-पुरुषार्थ विचार
गीतारहस्य चर्चासत्र - दुसरा दिवस
रत्नागिरी
- ``भारतीय
असंतोषाचे जनक आणि तेल्यातांबोळ्यांचे पुढारी मानले जाणारे लोकमान्य टिळक जगभरातील
प्राच्यविद्या अभ्यासकांना तसेच संस्कृत पंडितांना वेदवाङ्मयाचे अभ्यासक म्हणून
ओळखत होते``, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक धनंजय चितळे यांनी
व्यक्त केले. अखेरच्या दिवशीच्या या सत्रात प्रतिभा बिवलकर आणि डॉ. विद्याधर
करंदीकर या दोघा भावंडांनी गीतारहस्यातील संसारशास्त्र आणि पुरुषार्थ विचार उलगडून
दाखविला.
अभ्यासक
लोकमान्य टिळकांविषयी सांगताना
धनंजय चितळे. व्यासपीठावर प्रा. डॉ. सुरेश जोशी
|
लोकमान्य
टिळकांच्या गीतारहस्य ग्रंथाच्या शताब्दीनिमित्ताने ग्रंथाचा सांगोपांग परिचय करून
देणारे दोन दिवसांचे चर्चासत्र रत्नागिरीत शनिवारी (ता. १) सुरू झाले. दुसऱ्या
दिवशीच्या पहिल्या सत्रात श्री. चितळे यांनी `गीतारहस्यातून दिसणारे अभ्यासक टिळक` या
विषयावरील निबंध सादर केला. त्यामध्ये त्यांनी अनेक लेखकांची मते उद्धृत करून टिळकांच्या
अभ्यासू वृत्तीचा आढावा घेतला. ते म्हणाले, ``स्वातंत्र्याची चळवळ आणि राजकारण
सांभाळतानाच त्यांचे चिंतन आणि वाचन सतत सुरू होते. अफाट स्मरणशक्ती आणि कुशाग्र
बुद्धीची देणगी त्यांना लाभली होती. पाश्चात्य तत्त्वज्ञानाबरोबरच भारतीय वाङ्मयातील
वेद, उपनिषदे, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामाची गाथा इत्यादींचाही सखोल अभ्यास
केला. गीतेचा अभ्यास करतानाही एकच गीता त्यांनी प्रमाण मानली नाही. महाभारत आणि
गीतेतील 400 साम्यस्थळे त्यांच्या निदर्शनाला आली. गीता आणि उपनिषदातील साम्य,
महाभारत आणि गीतानिर्मितीचा काळ यांचाही मागोवा त्यांनी घेतला. उपनिषदे आणि
ब्रह्मसूत्रेच नव्हे, तर बौद्ध आणि जैन धर्मांच्या तत्त्वज्ञानाचाही त्यांनी अभ्यास
केला. एवढ्या चिंतनाचा त्यांना मंडाले येथील तुरुंगात गीतारहस्य लिहिताना उपयोग
झाला. तेथे त्यांनी फ्रेंच, जर्मन, पाली भाषांचा अभ्यास केला. त्या त्या भाषांमधील
मिल, स्पेन्सर, कान्ट, ग्रीन इत्यादी तत्त्ववेत्त्यांची चारशेहून अधिक पुस्तके त्यांनी
संदर्भ लक्षात ठेवून गरजेनुसार मागवून घेतली. स्वतःचे ग्रंथालय, अन्य ठिकाणचे
संग्रह आणि वेळप्रसंगी परदेशांतूनही पुस्तके मागविली. त्यांचा एवढा सारा अभ्यास
त्यांनी कसा केला असेल, याची कल्पना केली तरी थक्क व्हायला होते. आजच्या
माहितीच्या युगात एका क्लिकवर विविध संदर्भ सापडू शकतात. टिळकांच्या काळात ते शक्य
नव्हते आणि कारावासात असताना तर मुळीच शक्य नव्हते. त्यातून सिद्ध झालेला
गीतारहस्य हा ग्रंथ उत्तम अभ्यास कसा करावा, याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे.
टिळकांमधील अभ्यासक याच ग्रंथातून प्रकट होतो.``
श्रीमती प्रतिभा बिवलकर यांनी गीतारहस्यातील
संसारशास्त्र उलगडून दाखवले.
|
``भगवद्गीतेसाठी टिळकांनी संसारशास्त्र हा सुंदर शब्द
प्रथम वापरला```, असा संदर्भ देत श्रीमती प्रतिभा बिवलकर यांनी गीतारहस्यातील
कर्मयोगशास्त्राविषयी विवेचन केले. त्या म्हणाल्या, ``योग्य काय आणि अयोग्य काय, याचा निर्णय
घेण्यासाठी गीता उपयुक्त ठरते. गीता हे नीतिशास्त्र आणि कोणत्या प्रसंगी कसे
वागावे, हे सांगणारे व्यवहारशास्त्र आहे, असे टिळकांनी सांगितले आहे. प्रत्येकाने
आपापले विहित कर्म करावे. कर्मयोग म्हणजे कर्म करण्याची शैली किंवा पद्धती. जीवन
हा यज्ञ आहे. यज्ञचक्र चालविण्यासाठी कर्म हवेच. प्रत्येकाने चांगले काम करत
राहावे. फळाची आसक्ती धरू नये. आसक्ती हे दुःखाचे मूळ आहे. कर्माचे फळ केव्हा आणि
कसे मिळेल, हे सांगणे अवघड असते.`` कर्मफल
कर्म करण्याचा उद्देश किंवा हेतू, कर्माचे चिंतन, पद्धती, परिणाम आणि कर्म
करतानाची स्थिती या पाच निकषांवर आधारित असते, असे सांगून श्रीमती बिवलकर यांनी या पाचही
निकषांचा ऊहापोह केला. पौराणिक आणि आधुनिक काळातील कथा आणि प्रसंग सांगून आपले
मुद्दे त्यांनी अधिक स्पष्ट केले.
गीतारहस्यातील
पुरुषार्थ विचारांची मांडणी
डॉ. विद्याधर करंदीकर यांनी केली.
|
चर्चासत्रात दोन दिवस सहभागी झालेल्या
श्रोत्यांनी आपल्या प्रतिक्रिया यावेळी दिल्या. निवृत्तांनी नव्हे, तर तरुणांनीच गीतारहस्य
वाचायला हवे, याची जाणीव चर्चासत्राने करून दिल्याचे मत वर्षा फाटक यांनी व्यक्त
केले. श्रीकांत वहाळकर, वैशाली कानिटकर, रेणुका भडभडे, विश्वनाथ बापट इत्यादींनीही
आपापली मते व्यक्त केली.
No comments:
Post a Comment