गीतारहस्य चर्चासत्रातील डॉ. सदानंद मोरे यांचे बीजभाषण
रत्नागिरी - ``लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहून मराठी गद्य
साहित्याला आधुनिक बनवले``, असे मत घुमान येथील 88
व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेवर लिहिलेल्या `गीतारहस्य’ या
ग्रंथाला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या ग्रंथाचा सांगोपांग परिचय करून देणारे दोन दिवसांचे चर्चासत्र रत्नागिरीत
शनिवारी (1 ऑगस्ट) सुरू झाले. हा
कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा कोकण विभाग आणि गीता मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गीता भवनमध्ये झाला. या
चर्चासत्राचे बीजभाषण डॉ. मोरे यांनी केले. लीळाचरित्राचा
अपवाद वगळला, तर गीतारहस्यापूर्वी सहाशे वर्षांहून अधिक काळ मराठीतले सर्व साहित्य
पद्यातच लिहिले गेले, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, ``पारतंत्र्यातील मराठी समाजाला
कार्यप्रवण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी `गीतारहस्य’चे लेखन केले. महाराष्ट्राच्या वैचारिक विकासातला `गीतारहस्य’ हा
फार मोठा टप्पा असून मराठी भाषा घडवण्यातसुद्धा त्याचा मोठा वाटा आहे. 1915 मध्ये
लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य ग्रंथ छापला. त्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत.
महाराष्ट्राच्या लोकांना भगवद्गीता कळावी म्हणून टिळकांनी गीतारहस्य लिहिले. गीतारहस्य
हे मराठी भाषेला मिळालेले फार मोठे योगदान आहे. त्यावेळी लोकांना अल्प दरात ग्रंथ उपलब्ध
करून देण्यासाठी टिळकांनी विशेष प्रयत्न केले. आधुनिक गद्यलेखनाचा वस्तुपाठ या
ग्रंथाने दिला.``
पगडी घालून डॉ. मोरे यांचा सत्कार करण्यात आला. |
मराठीतील सर्वांत
पहिला मोठा ज्ञानेश्वरी हा पद्यात्मक ग्रंथ भगवद्गीतेवर आधारित होता, तर सर्वांत
मोठा गीतारहस्य हा गद्यग्रंथही गीतेवरच आधारित आहे, असे सांगून डॉ. मोरे पुढे
म्हणाले, ``मराठीव्यतिरिक्त अन्य भाषांमध्ये
कृष्णाच्या रासलीलांवर गीते लिहिली गेली. मराठीने मात्र कृष्णाच्या तत्त्वज्ञानाला
प्राधान्य दिले, हे ज्ञानेश्वरी आणि गीतारहस्याच्या लेखनातून स्पष्ट झाले. भगवद्गीता
हा लोकमान्यांच्या चिंतन-मननाचा भाग होता. लहानपणी वडिलांच्या आजारपणात त्यांना
वाचून दाखविताना त्यांची भगवद्गीता मुखोद्गत झाली. त्यानंतरच त्यांचे गीतेविषयीचे
चिंतन सुरू झाले. जानेवारी 1902 मध्ये त्यांनी नागपूरला महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांसमोर सर्वप्रथम गीतेवर भाषण केले, तर 1904 साली संकेश्वर मठात
शंकराचार्यांसमोर गीतेविषयीचे आपले विचार मांडले. मंडालेच्या तुरुंगात
असताना केवळ पेन्सिलने त्यांनी हा ग्रंथ लिहिला. याचवेळी ते तुरुंगात जर्मन, फ्रान्स आणि पाली भाषा शिकले. मोठ्या चिंतनातून त्यांनी हा ग्रंथ साकार
केला. त्यामुळे त्यांना गीतेचे भाष्यकार म्हणून मान्यता मिळाली. सामान्य लोक तर
त्यांना भगवान टिळक म्हणूनच ओळखू लागले होते. आगरकरांसारखे विद्वान जॉन स्टुअर्ट
मिल, स्पेन्सरसारख्या पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांचे सुखदायी नीतिशास्त्र मांडत
असताना टिळकांनी मात्र गीतेच्या आधारे भारतीय नीतिशास्त्र श्रेष्ठ असल्याचे
वारंवार ठामपणे सांगितले. गीता म्हणजे निवृत्ती सांगणारा नव्हे, तर कर्म करा, असे
सांगणारा ग्रंथ आहे, हेच त्यांनी गीतारहस्यातूनही पटवून दिले. त्या काळात एकाच
वेळी टिळकांना गीतेतील कर्मसंन्यासाचा पारंपरिक विचार मांडणारे, पाश्चात्त्य
विचारांचा पुरस्कार करणारे आणि पारंपरिक विचार कालबाह्य झाल्याचे सांगणारे अशा
तिहेरी विचारसरणीचा प्रतिकार करून वेगळा विचार मांडायचा होता. तो त्यांनी
गीतारहस्यातून मांडला. ज्ञान मिळविण्यासाठी कर्म करावे आणि ज्ञानप्राप्तीनंतर
संन्यास घ्यावा, असे विचार शंकराचार्य मांडत असताना ज्ञानपूर्व आणि ज्ञानोत्तरही
कर्मच करत राहण्याचा उपदेश भगवद्गीतेने कसा केला आहे, हे टिळकांनी पटवून दिले.``
चर्चासत्राला उपस्थित श्रोते |
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून प्रा. सुरेश जोशी, डॉ. कल्याण
काळे, प्रतिभा बिवलकर, डॉ.
विद्याधर करंदीकर, डॉ. शं. रा. तळघट्टी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष राजाभाऊ लिमये, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण आदी मान्यवर उपस्थित होते.
गीतारहस्य चर्चा हा बौद्धिक पातळीवरचा
कार्यक्रम असल्याचे डॉ. सुरेश जोशी यांनी सांगून कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू
स्पष्ट केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ लिमये यांनी केले. यशवंतरावांना
टिळकांबद्दल आदर होता. म्हणूनच त्यांच्या नावाच्या प्रतिष्ठानमार्फत चर्चासत्राचे
आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. टिळकांचे पणतू आणि `केसरी`चे सध्याचे संपादक दीपक टिळक
यांनी मात्र या चर्चासत्राच्या बाबतीत कोणताच प्रतिसाद दिला नाही, अशी खंत
राजाभाऊंनी व्यक्त केली.
यावेळी डॉ. सदानंद मोरे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन
सौ.निशा काळे यांनी केले, तर विनायक हातखंबकर यांनी आभार मानले.
...............
No comments:
Post a Comment