महाराष्ट्र राज्य विधानसभेची निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली आणि एक महिना पूर्ण होत आला तरी राज्यात कोणाचेच सरकार अधिकारावर येऊ शकलेले नाही. त्यामुळे अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू झाली आहे. आधीच्या विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येऊन सरकार स्थापन व्हावे, असा संकेत आहे. तसे यावेळच्या निवडणुकीनंतर घडलेले नाही. मोठा गाजावाजा करून निवडणूक किती महत्त्वाची असते, हे कानीकपाळी ओरडून सर्वच यंत्रणेवर अतिप्रचंड खर्च करून निवडणुकीचा सोहळा पार पडला. सर्वसामान्य मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे, यासाठी खूप प्रयत्न केले गेले. प्रशासकीय पातळीवर आणि राजकीय पक्षांकडूनही हे प्रयत्न झाले. मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावणाऱ्या सर्व मतदारांनी आपले अमूल्य क्षण मतदानासाठी देऊन निवडणूक प्रक्रियेतला सर्वांत महत्त्वाचा भाग पार पाडला. मात्र राजकीय अहमहमिकेमुळे कोणाचेच सरकार स्थापन होऊ शकले नसल्याने तो मतदारांचा एक प्रकारे अवमानच आहे. हा अवमान आपण लोकांचे प्रतिनिधी आहोत, असे ठणकावून सांगणाऱ्या, निवडून आलेल्या विधानसभेतील साऱ्या लोकप्रतिनिधींनी केला आहे.
या सर्व प्रकारात कोणत्याही एका राजकीय पक्षाला दोष देण्यात काहीही अर्थ नाही. सरकार ही आपली मालमत्ता आहे, ज्या लोकांसाठी आपण सत्ता राबवणार आहोत ती सर्वसामान्य जनता आम्ही सांगू तेच सहन करणार आहे, असा समज असलेले सारे लोकप्रतिनिधी एकत्र झाले की काय होते, ते महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती पाहिल्यावर लक्षात येते. एक ठरावीक उद्दिष्ट घेऊन दोन वेगवेगळे मतप्रवाह असलेले पक्ष एकत्र येतात, निवडणुकीसाठी मतदारांना आश्वासने देतात, निवडून आल्यानंतर मात्र त्या साऱ्याचा निवडून आलेल्यांना विसर पडतो, निवडणूक ही लोकशाहीतील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे याकडे दुर्लक्ष केले जाते. निवडणूक हे एक निमित्त ठरते आणि सरकार चालविणे ही आपली जहागिरी आहे, असा समज लगेच निर्माण होतो. मतदार म्हणजे लोकशाहीमध्ये राजा असतो असे म्हटले जाते, पण ते कागदावरच राहते. निवडणूक लढविल्यामुळे आपणच या लोकांचे तारणहार आहोत, मालक आहोत, हाच आविर्भाव निर्माण होतो. त्यामुळेच सरकारच्या स्थापनेला खीळ बसली आहे.
एकूण मतदारांपैकी ६० टक्के मतदारांनी कोणत्याच एका पक्षाला सरकार स्थापन करण्याएवढे बहुमत दिलेले नाही. राहिलेल्या ४० टक्के मतदारांनी मुळातच मतदान केलेले नाही. तो नाराजीचा एक भाग आहे, असे समजले तर आपल्यापैकी कोणाबद्दलच जनतेला काही वाटत नाही, साऱ्यांच्या बाबतीतच नाराजी निर्माण झाली आहे, हा निवडणुकीच्या निकालांचा संदेश कोणत्याच पक्षाला समजलेला नाही. त्यातूनही सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने ज्या युतीला मतदान झाले आहे, त्या युतीचे एकमेकांशी पटत नाही. त्यापेक्षा कमी मते मिळालेली आघाडी सरकार स्थापन करण्याएवढी सक्षम नाही. ही राजकीय परिस्थिती राजकीय पक्षांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. मात्र त्याकडे पाहावे, असा विचारही कोणत्याच पक्षाच्या मनात येणार नाही. निवडणूक म्हणजे केवळ उपचार ठरला आहे. व्यक्तिगत महत्त्वाकांक्षाच राजकीय परिस्थिती अस्थिर करायला कारणीभूत ठरत आहे, ही गंभीर बाब आहे. हे गांभीर्य लक्षात न घेता या महत्त्वाकांक्षाच वारंवार मांडून जनतेसमोर संभ्रम निर्माण करणे हासुद्धा जनतेचा अवमानच आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य मतदार याच अवमानाच्या छायेत सध्या वावरत आहे.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, रत्नागिरी. १५ नोव्हेंबर २०१९)

No comments:
Post a Comment