Friday 22 November 2019

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. फेरा

जिवंतपणी विरत जाणाऱ्या स्वप्नांची मृत्यूनंतर होते पूर्तता
नैसर्गिकरीत्या वाढलेल्या जंगलाच्या घेऱ्यातला छोटासा जमिनीचा तुकडा. त्यावर एक झोपडीवजा निवाऱ्याचं घर. जवळच नळाचं कोंडाळं. समोर दोन दगडी ओटे, माणूस झोपू शकेल इतपत आकाराचे. एकदोन वृक्षांच्या बुंध्याभोवती पार बांधलेले. रात्रीची वेळ. दाढी वाढलेला, मळकट-फाटके कपडे घातलेला एक कळकट मनुष्य झोपडीच्या बाहेर दारूच्या नशेत शिवीगाळ करीत, विडी ओढत बसलेला. एवढ्यात अर्धी चड्डी-शर्ट घातलेला, मजुरासारखा दिसणारा अर्ध्या वयाचा मनुष्य येतो. कळकट माणसाबरोबर काही बोलतो. कळकट मनुष्य त्याची दखल घेत नाही. कुणाला तरी शिव्या देत दुसरीकडे निघून जातो.
मग आणखी एक मनुष्य येतो. पँट-शर्ट, नीट राखलेली दाढी, सुसंस्कृत बोलणं. मजुरासारखा माणूस आणि हा या दोघांच्या छान गप्पा सुरू होतात. इतक्यात एक तरुणी अंगात संचार झाल्यासारखी जोरजोराने मागे-पुढे वाकत, मोठमोठ्याने श्वास टाकत येते. मजुरासारखा दिसणारा, मालवणीत बोलणारा बाबल्या नि शरद तिचं स्वागत करतात. ते दोघे एका सरमिसळ वस्तीतले रहिवासी असावेत...
असावेत? आहेतच. वैकुंठ रहिवासी संघाचे ते सगळे वस्तीवाले. बाबल्या तिथला पहिला नागरिक. तिथे तो अभिमानानं तशीच ओळख करून देतो स्वतःची. ठराविक पारावर बसून रोज चंद्र पाहत राहणारा, पौर्णिमेचा वाटोळा चांदोबा बघून प्रफुल्लित होणारा शरद, कायम चिंचेच्या झाडावर मुक्काम ठोकून कविता करणारा जांभेकर नि ही आत्ताच विस्तवातून धापा टाकत बाहेर पडलेली सौ. वेदा....!
वैकुंठ रहिवासी संघ? हे कसलं नाव? आणि सरमिसळ वस्ती ही काय, चिंचेच्या झाडावर मुक्काम म्हणजे काय? काय सगळं हे चमत्कारिक?
ती वसाहत स्मशानातली आहे. तिथले सगळे रहिवासी मृतात्मे आहेत. दारू पिऊन शिवीगाळ करणारा गंगाराम तेवढाच जिवंत माणूस. स्मशानाचा चौकीदार. एखादं प्रेत जाळलं, की त्याची चंगळ असते. दारूच्या नशेत तो बरंच बोलतो. ‘तरण्याताठ्या, चांगल्या, शहाण्या माणसांना इथं का पाठवतोस? पाजी, हरामखोरांना का पाठवत नाहीस,’ असं आकाशाकडे तोंड करून विचारतो. आपलं प्रेत, हे स्मशान झाल्यावर जाळलेलं ‘पहिलं’ याची आठवण सांगणारा बाबल्या पुढाऱ्यांची वाट पाहत आपण तिरडीवर तासभर कसे पडून होतो, पुढारी आल्याबरोबर सगळे जण त्याच्या स्वागताला कसे धावले, जिवंतपणे कुणी नाही, पण मेल्यावर का होईना पुढाऱ्यानं दोन अश्रू ढाळले आणि स्मशानाचं ‘उद्घाटन’ करण्यासाठी स्वतःच्या हातानं भला मोठा हार घालून त्या पुढाऱ्याने आपल्या चितेला चूड कशी लावली, ते सगळं मालवणीत गजाली सांगाव्या त्या थाटात सांगतो.
चितेच्या विस्तवातून बाहेर आलेली वेदा हळूहळू त्या वातावरणाला सरावू लागते. शरदचं असंबद्ध बोलणं, त्यानं दिलेली जांभेकराच्या कवितेची माहिती ऐकते. आपल्या गळ्यातलं आई-वडिलांनी केलेलं सात तोळ्याचं मंगळसूत्र त्यांनी काढून घेतलंय, सासूबाईंनी केलेल्या मोत्याच्या कुड्याही काढून घेतल्यात हे सांगते. शरद विचारतो, ‘आणि नवऱ्यानं काय केलं होतं?’ वेदाचा चेहरा पडतो. ‘त्याच्याबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार झाला नाही, कसलाच झाला नाही!’ असं रुक्षपणे सांगते.
या मंडळींना वैकुंठ वसाहतीच्या बाहेर जाता येत नाही. तुमचा जीवखडा पाहायचाय? अजून असेल तो तिथं, असं म्हणून शरद तिला फाटकाजवळ नेऊ लागतो. ती नकार देते. विटलेली दिसते ती जगण्याला. कदाचित तिला या नव्या वसाहतीत, नव्या रहिवाशांसोबत बरं वाटत असावं. जांभेकरांचीपण ओळख होते.
एवढ्यात मंजी येते. मंजी-गंगारामची बायको. त्याचं घर वैकुंठाबाहेर. तो चौकीत एकटाच राहतो. रोज रात्री मंजी डबा घेऊन येते. तो तिची वाटच पहात असतो. मंजी तारुण्यानं मुसमुसलेली, घट्ट काष्टी नेसणारी, नीटनेटकी नि तो गचाळ दारुड्या गंगाराम; पण त्यांचा संवाद वेदाला आवडतो. संवाद म्हणजे काय? शिवीगाळ नि डाफरणं, ‘तू हडळ, मी खवीस’ हे शब्द ‘तू राधा मैं किशन’ म्हणावं... अशा उत्कटतेने गंगाराम उच्चारतो, ते भावतं वेदाला. गंगाराम ओढत घेऊन जातो मंजीला आत. वेदा प्रफुल्लित होते. गंगाराम-मंजीचं एकत्र जेवणं, थट्टामस्करी, त्यांचा रांगडा प्रणय, सामान्य माणसाला भयानक नि अशुभ वाटणाऱ्या स्मशानाच्या परिसरात भयाणतेच्या छाताडावर नाचत त्या दोघांनी केलेली दंगामस्ती आणि मग झोपडीत जाऊन बंदिस्त होणं...! मृतात्मे त्यांना दिसतच नसतात!
वेदा आसुसलेल्या नजरेनं खिडकीतून डोकावून, डोकावून बघत राहते. लग्नानंतरचं काही महिन्यांचं तिचं सहजीवन मृत्यूनं संपलेलं - ‘सह’ कसलं? म्हणायला पती-पत्नी; पण त्याला रसच नव्हता तिच्यात, ना तिच्याबरोबर बोलण्यात, ना जेवण्यात, ना शृंगारात. ती सहवासाला आसवलेली... इतकी, की ‘गंगाराम जरी आला असता तरी त्याला जवळ घेतलं असतं’ असं म्हणण्याइतपत अधासलेली!
कारणही तसंच होतं. नवरा अभिषेक - त्याला काहीच वाटत नव्हतं ना तिच्याबद्दल. खूपदा वाद. खोदून खोदून विचारल्यावर एकदा तिला समजलं, त्याला कुठल्याच स्त्रीबद्दल आकर्षण वाटत नव्हतं. त्याच्यासारखाच एक पुरुष त्याचा ‘पार्टनर’ होता. अभिषेक समलिंगी होता.
वेदा कोसळते!
तिची कर्मकहाणी ऐकून स्तब्ध झालेला शरद भानावर येतो. ‘तू आता इथून जायला मुक्त झालीस,’ असं म्हणतो; पण वेदा त्याला त्याची कहाणी ऐकवायला लावते. दोघांच्या मनातली मळमळ बाहेर पडलेली. आता दोघांनी इथून बाहेर पडायचं. हा ‘फेरा’ संपला, उजाडण्याची वेळ जवळ आलीय, नवं जीवन शोधण्यासाठी निघण्याची वेळ येऊन ठेपलीय. दोघं परस्परांना आलिंगन देतात. भुईतून धूर निघू लागतो, धुराच्या पडद्याआड ती दोघं झाकली जातात!
‘मृत्यूनंतरचं जग कसं असेल’ यावर अनेक तत्त्वचिंतकांनी शब्दांची चिरफाड करीत लिहिलेलं दिसतं; पण निखिल मोंडकर यांनी ते कलात्मकतेने ‘फेरा’ या नाटकात शब्दांत पकडलंय. संतोष सनगरे यांचं दिग्दर्शन आणि सर्वच कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय यामुळे ‘समर्थ रंगभूमी, रत्नागिरी’ यांचं ‘फेरा’ हे नाटक ‘समर्थ’पणे वठलंय.
- राजेंद्रप्रसाद मसुरकर
(९९६०२४५६०१)
(सौजन्य : आकाशवाणी रत्नागिरी)

No comments:

Post a Comment