Wednesday 20 November 2019

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. नांगर, आता उठवू सारे रान!

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र.
दिवस दुसरा (१९ नोव्हेंबर २०१९)

`नांगर`मधून मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न, `आता उठवू सारे रान` एक ठसठशीत नाटक
सर्वसामान्यांना भरडून टाकणाऱ्या निष्ठुर सामाजिक-राजकीय व्यवस्था - अलीकडे ज्याला सिस्टीम म्हटलं जातं - त्याचं रंगमंचावरून दर्शन घडविण्याचं काम बहुतेक प्रायोगिक नाट्य संस्थांना आवडतं. रत्नागिरीचा ‘संकल्प कला मंच’ अशी नाटकं नाट्य स्पर्धेत दर वर्षी सादर करतो. १९ नोव्हेंबरला, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी या संस्थेनं राजेंद्र पोळलिखित ‘नांगर’ हे नाटक सादर केलं.
एकमेकांना जीवनसाथी बनवू इच्छिणारी, पण तात्त्विक मतभेदांमुळे दुरावलेली तरीही परस्परांवरील प्रेम मनात टिकवून ठेवणारी, दुरावूनही नित्य भेटत राहणारी युवक-युवतीची जोडी या नाटकाच्या मध्यवर्ती स्थानी आहे. ‘ती’ - पूर्वा - एका वाहिनीची रिपोर्टर. तो शहाजी - कृषी विषयात एमएस्सी - त्याला शेती करायची आहे. त्यासाठी तो चाळीस हजार रुपये पगाराची नोकरी सोडतो; पण आपला नवरा शेतकरी असावा हे मान्य नसल्याने पूर्वा त्याची जीवनसाथी बनण्यासाठी दिलेली अंगठी परत करते. शहाजीला शेतीतून सोनं पिकवण्याचा आत्मविश्वास असतो. धनुष्य आणि अन्य शस्त्रधारी देवांपेक्षा नांगरधारी बलरामाची मंदिरे बांधली पाहिजेत असं त्याचं मत. शेतकऱ्यांच्या नावाने केल्या जाणाऱ्या गलिच्छ राजकारणाला त्याचा विरोध, तर त्याच परिस्थितीवर सनसनाटी रिपोर्ट तयार करण्यात पूर्वाला खूपच इंटरेस्ट. नांगर या नाटकामध्ये दोन पुढाऱ्यांमधील संघर्षातून होणारे राजकारण, पुढाऱ्यांच्या विजयाने बेभान होऊन हिडीस नाचणारे सामान्य तरुण, विरोधकांना आयात करून, महामंडळांवर त्यांची वर्णी लावून त्यांची तोंडं बंद करणारे मुख्यमंत्री ही पात्रं आहेत.
अशाच प्रकारे आयात करण्यात आलेला ‘भालकर’ हा पुढारी एके दिवशी शहाजीला मुख्यमंत्र्यांकडे नेतो. सामान्य माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दंड थोपटून उभा राहणारा तरुण शेतकरी अशी तोपर्यंत शहाजीची प्रतिमा तयार झालेली असते. भालकरच्या मते तो विस्तव असतो. आपल्या शेतकरी आंदोलनात तो हवाच असे त्याला वाटते. शहाजीची जळजळीत मतं मुख्यमंत्री शांतपणे ऐकतात आणि नंतर बोलावतो असं सांगून त्याची बोळवण करतात. थोड्याच वेळात बातमी येते, ‘मंत्रालयात नांगर नेण्याचं अभिनव आंदोलन करू पाहणाऱ्या शहाजीचा मोटारीच्या धडकेनं मृत्यू ..!’ मुख्यमंत्री आणि भालकरचे विरोधक मंत्री हस्तांदोलन करतात आणि पडदा पडतो. एका ज्वलंत विषयावर लिहिलेलं हे नाटक गणेश गुळवणी यांनी दिग्दर्शित केलं होतं.
त्याच दिवशी १९ नोव्हेंबरला सादर झालेलं ‘आता उठवू सारे रान!’ हे नाटक ठसा उमटवून गेलं. मंडणगड तालुक्यातील धामेळीवाडी इथल्या आकेश्वर सेवा मंडळानं सादर केलेल्या या नाटकात रत्नागिरीजवळच्या कोतवडे गावचे एक-दोन हौशी कलाकारही सहभागी झाले होते. आदर्श गाव, बिनविरोध येणारे ग्रामपंचायत सदस्य आणि खेळीमेळीनं राहणारे ग्रामस्थ अशा वातावरणात गावातल्या एक-दोघांना पक्षीय राजकारणाची दुर्बुद्धी सुचते. गावात दोन तट पडतात आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी तरुण पिढी पुढे येते.
नाटकाचा प्रारंभ ग्रामसभेनं होतो. बराच वेळ होऊनही सुरू न झालेली मीटिंग, तिथंच आडवा होऊन घोरू लागलेला ग्रामस्थ, इकडच्या तिकडच्या गप्पा, हे सारं दाखवत अत्यंत गतिमानतेनं नाटक पुढे सरकतं. पक्षीय राजकारणाचा विषय निघाल्यानं बघता बघता तापलेलं वातावरण, सभेत होणारी गुद्दागुद्दी, फूट, एक-दोन दिवसांतच या प्रश्नावरून होणारी घमासान मारामारी हे प्रसंग दाखवत सादरकर्त्यांनी प्रेक्षकांना मूळ सूत्राकडे केव्हा नेलं हे कळतच नाही.
या परिस्थितीतून मार्ग शोधण्यासाठी तरुणांमध्ये चर्चा होऊ लागते. मुंबईतून गावी आलेले तरुण विचार करू लागतात. मुंबईतल्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये रुळून सफाईदार इंग्रजी बोलणारी नेहा, चांगल्या हुद्द्यावर नोकरी करणारा जय, गावात राहणारा अर्जुन, उच्चशिक्षित प्रिया ही सारी जणं एकत्र येतात. गाव सोडून मुंबईला गेलेल्यांनी परतावं यासाठी ‘रिव्हर्स मायग्रेशन’ची योजना आखतात. कॉर्पोरेट विश्वात सरावलेली नेहा कृषी उत्पादन गट थेट ग्लोबल मार्केटमध्ये पोहोचविण्याची धडपड सुरू करते. सगळे श्रमदानाला लागतात. गावातला एकोपा पुन्हा जागा होतो. पार्श्वभूमीला साने गुरुजींचं ‘आता उठवू सारे रान’ हे गीत संपूर्ण नाट्यगृहातच एक वेगळं चैतन्य निर्माण करतं. एवढ्यातच महिलांसाठी आरक्षित झालेल्या सरपंचपदाची थेट निवडणूक लढवून प्रिया विजयी होते आणि भारावलेल्या नवतरुणांची सर्वांना सोबत घेऊन जाणारी सत्ता ग्रामपंचायतीवर स्थापन होते. शेवटच्या क्षणी विरोधकांचं मनही पालटतं.
सुनील माळी या युवकाने हे नाटक लिहून आणि दिग्दर्शित करून ‘खेड्याकडे चला’ या महात्मा गांधी यांच्या संदेशाचंच जणू कलात्मक सादरीकरण केलंय. यातली सर्वच पात्रं अभिनय, संवादफेक आणि टायमिंगच्या बाबतीत प्रभावी वाटली. एकूणच ‘आता उठवू सारे रान’ हे ठसठशीत नाटक वाटलं.

- राजेंद्रप्रसाद मसुरकर
(संपर्क: ९९६०२४५६०१)
(सौजन्य : आकाशवाणी, रत्नागिरी)

No comments:

Post a Comment