Saturday, 23 November 2019

रिमोट कंट्रोल : फक्त पहिल्या क्रमांकाच्या ईर्ष्येने मुलाची होणारी फरपट
रत्नागिरीत सुरू असलेल्या ५९व्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या  पाचव्या दिवशी (२२ नोव्हेंबर २०१९) रत्नागिरीतील राधाकृष्ण कला मंचाच्या कलाकारांनी 'रिमोट कंट्रोल'  हे नाटक सादर केले. त्याची ही ओळख..

.........
पटवर्धन आडनावाचं चौकोनी कुटुंब - श्रीकांत, राधिका, आठ-नऊ वर्षांचा शुभंकर नि श्रीकांतचे वडील नाना. एका आलिशान, श्रीमंती फ्लॅटमध्ये ते राहतायत, तसं बऱ्यापैकी सुखी कुटुंब. एकच खंत - तीही राधिकापुरती - तिचा मुलगा शुभंकर साध्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतोय. सामान्य मुलांबरोबर. त्या शाळेत शिकून त्याचं पुढे काय होणार आहे? ही खंत रात्रंदिवस राधिकाला जाळतेय. श्रीकांत आणि ती स्वतः, दोघंही आयआयटीचे स्कॉलर; पण श्रीकांतच्या तत्त्वनिष्ठेमुळे त्यांना अमेरिकेला वगैरे जाता आलं नाही. हीच खंत.

नाना निवृत्त शिक्षक. मुंबईत वास्तव्य असलं तरी मूळ गावाशी-वडगावशी नाळ तुटलेली नाही. त्यांची नाहीच; पण कॉर्पोरेट विश्वात वावरणारा मुलगा श्रीकांत याचीही तुटलेली नाही. हा ऋणानुबंध शुभू-शुभंकरच्या माध्यमातून तिसऱ्या पिढीतही अतूट राहतोय. राधिका गृहिणीची कर्तव्यं पार पडते, नानांशीही चांगली वागते, श्री आणि राधिकाच्या नात्यात मिठाचा खडा पडलेला नाही; पण तरीही सारं काही आलबेल होतंय, असं म्हणता येत नाही!

एके दिवशी एक वेगळा योग जुळून येतो. अमेरिकेत राहणारा राधिकाचा एक भाऊ निखिल भारतात आलाय. त्याला ‘मिनरल वॉटर’चा ‘प्लांट’ इथं उभा करायचाय. त्यासाठी पटवर्धन कुटुंबाचं वडगाव हे ठिकाण त्याच्या डोळ्यापुढे आहे. श्रीकांतच्या मदतीने हे शक्य होणार असा त्याला ठाम विश्वास.

निखिलच्या या प्रस्तावाने राधिका हरखून जाते. अमेरिकेचे दरवाजे किलकिले होतायत असं समजते. आता शुभंकरला त्या ‘गावंढळ’ शाळेतून काढलंच पाहिजे हे वर्ष कसं तरी जाईल. तेवढ्यात एका ‘पॉश’ अमेरिकन संस्थेच्या ‘डे स्कूल’मध्ये दाखल होण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यायची. त्यासाठी शुभंकरची कसून तयारी करून घ्यायची. इंग्रजी कविता म्हणताना त्याचे उच्चार अमेरिकेतल्या वास्तव्याला शोभतील असे घटवून घटवून तयार करून घ्यायचे. राधिका तयारीला लागते.
श्रीकांत तयारी सुरू करतो. वडगावमध्ये ‘सीएसआर’च्या माध्यमातून विकास कामं व्हायला हवीत अशी अट घालून निखिलच्या प्रकल्पाला सहकार्य करण्याचं मान्य करतो.

शुभंकर परीक्षेची तयारी करतो. ठरल्या दिवशी परीक्षेला जातो; पण कॉपी केली म्हणून त्याला बाहेर काढतात. हे फोनवरून कळताच श्रीकांत हादरतो.

पहिल्या क्रमांकाचं, गोल्डमेडलच उद्दिष्ट समोर ठेवणारी राधिका मात्र खटपट सोडत नाही. परीक्षेची फी चाळीस हजार रुपये भरलीच होती ना, शाळेला आणखी काही रक्कम देऊन पुन्हा परीक्षेची ती परवानगी मिळवते. दरम्यान, शुभंकरला समजवण्यासाठी निखिल ‘मामा’ फोन करतो. तो सांगतो, ‘कॉपी करूनच मी अमेरिकेला गेलो!’ शुभंकरला हे आवडत नाही. नानांचे संस्कार जागे असतात; पण दुसऱ्यांदा परीक्षेला गेल्यावर आजोबांशी फोनवरून बोलताना, मी तुम्हाला पण अमेरिकेला नेणार, हे सांगत असताना राधिका फोन काढून घेते आणि थोड्याच वेळाने मित्र हृषीकेश याला बेदम मारल्याबद्दल शुभंकरला बाहेर काढतात. पुन्हा वादळी अशांतता!

बिथरलेल्या शुभंकरची समजूत घालण्यात आजोबा पुढाकार घेतात. हळूहळू तो पुन्हा नानांशी नेहमीसारखा वागू लागतो. मग तो आजोबा नि नाना नातू असा खेळ सुरू होतो. या खेळात नातवाला गोष्ट सांगण्यासाठी शुभंकर श्रावणबाळाची हकीकत निवडतो. या गोष्टीत श्रावणबाळ आई-वडिलांना कावडीतून नेतो, पण त्याचे चालून चालून सुजलेले पाय, ठेचकाळलेली बोटं, रक्ताळलेले तळवे पाहून त्याची आई-जिला तो ‘रिमोट कंट्रोल’ म्हणतो - तिला वाईट वाटतं - रडू येतं ते आता श्रावणबाळ ‘रेस’ जिंकू शकणार नाही या कल्पनेमुळे!

दरम्यान, निखिलच्या प्रोजेक्टमधली लबाडी वगैरे लक्षात येऊन राधिकाचे डोळे उघडतात. ती वडगाव वाचवण्यासाठी श्रीकांतला साथ द्यायचं ठरवते. मघाशी सांगितलेल्या गोष्टीतला ‘रिमोट कंट्रोल’च्या तालावर चालणारा श्रावणबाळ राधिकापर्यंत कसा पोहोचतो ते मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही. शेवट गोड होतो एवढंच!

शेखर ढवळीकर यांनी लिहिलेलं हे नाटक रत्नागिरीच्या ‘राधाकृष्ण कलामंच’नं सादर केलं. संजय गणपुले यांचा नाना आणि बालकलाकार सारंग जोशी याचा शुभंकर छान वठलेत. अलका बेंदरकर यांनी कॉर्पोरेट संस्कृतीनं प्रभावित झालेली राधिका आणि विनायक जोशी यांनी श्रीकांतचं मातीशी नातं जपणारं व्यक्तिमत्त्व चांगलं साकारलंय. दिग्दर्शक मिलिंद टिकेकर यांनी घेतलेली मेहनत प्रयोगातून व्यक्त होते.

- राजेंद्रप्रसाद मसुरकर, मोबाइल : ९९६०२ ४५६०१

(सौजन्य : आकाशवाणी रत्नागिरी केंद्र)
No comments:

Post a Comment