Wednesday, 27 November 2019

५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. ‘रेस्ट हाउस’


५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. रेस्ट हाउस
दिवस सातवा (२६ नोव्हेंबर २०१९)
............
 न विझणाऱ्या सूडाग्नीचे रहस्यमय नाटक

५९व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीतील आठवे नाटक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सादर करण्यात आले. रेस्ट हाउसनावाचे हे नाटक नाणीज येथील महाकाली रंगविहार या संस्थेने सादर केले होते. त्याचा हा परिचय...
..........
      नाणीजच्या महाकाली रंगविहार या संस्थेनं रंगमंचावर आणलेलं रेस्ट हाउसहे नाटक रमेश कीर यांनी लिहिलं होतं आणि दीपक कीर यांनी दिग्दर्शित केलं होतं. या नाटकात शेवटी पाच मिनिटं प्रवेशणाऱ्या माळ्यासह पाच पात्रं होती.

      पडदा उघडतो तेव्हा प्रेक्षकांना दर्शन घडतं एका घराच्या दर्शनी भागाचं आणि त्यापुढील अंगणाचं. ते घर म्हणजे जवळजवळ सदैव बंद असणारं एक रेस्ट हाउसआहे. त्याच्या आवाराभोवती नेटकं लाकडी पट्ट्यांचं कुंपण, त्याच्या मध्यभागी लाकडाचंच फाटक, कडेला फुलझाडं, फाटकाबाहेरच्या रस्त्यापलीकडे दूरवर दिसतं एक रान आणि त्यातल्या गर्द झाडीतून मान उंचावून उभा राहणारा डोंगराचा एक उंच सुळका. रात्रीची वेळ, मंद प्रकाश, बराच वेळ कुणीच दिसत नाही. रातकिड्यांची किरकिर, अधून कुत्र्यांचं भुंकणं-रडणं आणि जवळपास कुठे तरी असलेल्या डांबरी सडकेवरून ये-जा करणाऱ्या वाहनांचे अंधारी शांतता चिरत जाणारे आवाज.

      बहुधा तिथं कुणाची फारशी ये-जा नसावी असं दिसतंय या वातावरणावरून. पाच-सात मिनिटं अशीच गेल्यावर कुठूनसं एक जोडपं येतं.


      प्रौढत्वाकडे निघालेल्या त्या जोडप्याची गाडी बंद पडलीय नि रात्रीचा मुक्काम या रेस्ट हाउसमध्ये करावा या विचारानं ते फाटक उघडून आत आलं. या त्यातल्या पुरुषानं बऱ्याच हाका मारल्यावर रेस्ट हाउसच्या दरवाजाचा भयानक कर्रऽऽ आवाज करत तो उघडून एक टक्कल पडलेला, वाकलेला म्हातारा बाहेर येतो. त्याचं नाव रामू. चौकीदार दिसतोय. जोडप्याशी ओळख होते. अभिजित आणि उर्मिला. रामू त्यांचं स्वागत करतो. त्यांना अंगणात खुर्च्या मांडून देतो आणि त्यांच्यासाठी सुग्रास भोजनाचीही व्यवस्था करतो. अभीला तर खूपच आवडतो हा पाहुणचार, आणि उर्मीही रोजच्यापेक्षा चार घास जास्त जेवते. थोडं सांबार शिल्लक असतं; पण ते सकाळला होईलअसं अभीने म्हणताच रामू चमत्कारिक स्वरात सकाळी?’ असं उद्गारतो.

      तिथून सुरू होतं एक रहस्यमय कथानक. त्या दोघांना अंगणात सोडून रामू जवळपास जातो, गप्पा मारता मारता अभिदेखील एकटाच बंगल्याच्या आवारात फेरफटका मारण्यास जातो. उर्मी एकटीच उरते अंगणात. एवढ्यात फाटकाबाहेरच्या वाटेवर धूर येऊ लागतो. त्यापाठोपाठ हळूहळू पुढे सरकत येते एक बाई. पिवळंजर्द नऊवारी लुगडं, केस मोकळे सोडलेले. फाटकातून आत येते. उर्मीच्या मागे बाजूला थोडीशी रेंगाळते आणि सावकाशी चालत रेस्ट हाउसच्या उघड्या दारातून आत शिरते. उर्मीला अस्वस्थ वाटतं. कित्येक क्षण ती घुसमटते, तिला ओरडताही येत नाही. भयंकर घाबरते ती. इतक्यात अभी येतो, तिची अवस्था पाहून तिला आत नेऊन सोडतो आणि पुन्हा बाहेर येतो. थोड्याच वेळात ऐकू येते एक किंकाळी!

      मध्यंतरानंतर पडदा उघडतो तेव्हा अवस्थ अभी त्या गूढ म्हाताऱ्याला या सगळ्याबद्दल विचारत असतो. खोदूनखोदून विचारल्यावर रामू बऱ्याच वर्षांपूर्वीची एक हकीकत सांगतो. त्याची चारचौघींत उठून दिसणारी पत्नी याच रेस्ट हाउसमध्ये गावातल्या एका चांडाळचौकडीच्या वासनेची शिकार बनलेली असते. त्या दूरवर दिसणाऱ्या सुळक्यावरून झोकून देऊन तिनं स्वतःचं जीवन संपवलेलं असतं. अंगावर काटा आणणारी ही कहाणी ऐकवून रामू पडवीत झोपतो. अभी आत न जाता अंगणातल्या खुर्चीतच ताणून देतो.

      थोड्याच वेळात पुन्हा तीयेते मघासारखीच, धुराच्या लोटा मागोमाग. सावकाश पावलं टाकत अभीच्या मागे येऊन उभी राहते. तिच्या सुस्वरूप चेहऱ्यावर हळूहळू कठोर भाव उमटू लागतात. आपल्या सुकुमार हातांची नाजूक बोटं ती अभीच्या गळ्याभोवती आवळते. तिचा चेहरा भयानक बनतो. अभी धडपडतो, तडफडतो आणि शांत होतो. पिवळंधम्मक लुगडं नेसण्यानं नववधूसारखी दिसणारी ती स्त्री आता कमालीची क्रूर भासत असते. भेसूर विकट हास्य करते आणि निघून जाते.

      पहाटेच रामू ओरडतो नि धडपडत उठतो. उर्मी बाहेर येते. नवरा निजलेला. रामू तिचा निरोप घेऊन जातो. उर्मी आत जाते उजाडते.....! सूर्य बऱ्यापैकी वर आला असावा. माळी येतो. अंगणात निजलेल्या अभीला उठवू लागतो. अभीचा हात खाली येतो. निपचित. माळी समजतो. कुणी आहे का म्हणून हाका मारतो, तर उर्मी बाहेर येते. काय घडलंय, हे समजताच हंबरडा फोडते, विलाप करते.


      माळी सांगतो - गावातल्या नराधमांनी त्या स्त्रीवर अत्याचार केल्यावर त्या जोडप्यानं त्या सुळक्यावरून उड्या टाकून जीवन संपवलं. रोज ती दोघं इथं येतात. एकेक करून त्यांनी त्या नराधमांना नाहीसं केलं; पण तरीही त्यांचा सूडाग्नी शांत झाला नाही. इथं येणाऱ्या जोडप्यांपैकी पुरुषांना ते ठार करतात. हे रेस्ट हाउसशापित आहे...!

- राजेंद्रप्रसाद मसुरकर
(९९६०२४५६०१)
(सौजन्य : आकाशवाणी रत्नागिरी)


No comments:

Post a Comment