५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. ‘एक्स्पायरी डेट’
दिवस सहावा (२३ नोव्हेंबर २०१९)
............
आपुली ‘एक्स्पायरी’ पाहिली म्यां डोळा!
अमेरिकेच्या एका प्रवासवर्णनात ‘पुलं’नी कोणा सहस्रबुद्धे नावाच्या मराठी कुटुंबाच्या अमेरिकेतल्या वास्तुशांतीचा प्रसंग वर्णन केलाय. सगळा कार्यक्रम आनंदात चाललेला असताना कुणाचा तरी फोन येतो. सौ. सहस्रबुद्धे फोन घेतात. पलीकडचा माणूस सांगत असतो, ‘तुम्ही नवं घर घेतलंय. आता तुमच्या थडग्याची जागाही बुक करून टाका.’ बाई गोऱ्या-मोऱ्या...!
‘एक्स्पायरी डेट’ या नाटकात असंच काहीसं पाहायला मिळतं; पण थडगंबिडगं म्हटलं म्हणून एकदम गंभीर व्हायचं कारण नाही. थडगं बुक करण्याच्याही पुढचं पाऊल टाकलेली खूप माणसं भेटतात या नाटकात. प्रथम ती आपल्या समोर येतात तीच मुळी कुणाची तरी ‘डेथ’ ‘सेलिब्रेट’ करण्यासाठी. मस्त ‘डीजे’च्या तालावर बेभान होऊन नाचत असतात १५-२० तरुण. एका इमारतीपाशी आल्यावर हाका मारून-मारून नानांना बोलावतात. नानाही येऊन नाचू लागतात.
नाना – आपलं वय वीस मानणारे सत्तरीतले गृहस्थ. पत्नी प्रभा आणि ते दोघंच राहतात. मुलगा अजय अमेरिकेत. तो दररोज मोजून पाच मिनिटं फोनवर बोलतो आई-वडिलांशी. चार-चार वर्षं भारतात आला नाही म्हणून काय झालं? रोज व्हिडिओ कॉल करतो ना तो! कम्प्युटरच्या पडद्यावर आई-वडिलांना त्याचा नि आई-वडिलांचे त्याला चेहरे तर दिसतात! आणि त्याला वेळ तरी कुठं आहे भारतात यायला? जाम बिझी?
हल्ली जिकडे-तिकडे अशी बिझी माणसं दिसतातच. अमेरिकेत राहायला गेलेली पुष्कळ. शिवाय काळ बदललाय नाही का? काळ बदलला की माणसं बदलतात, माणसं बदलली की पद्धती बदलतात. म्हणून तर ‘मृत्यूचं सेलिब्रेशन’ करायला निघाले. त्याची सुरुवात तारीख निश्चितीनं. ही अफलातून आयडिया कुणाच्या डोक्यातून निघाली कुणास ठाऊक; पण मनुष्यजीवनाची अशी ‘एक्स्पायरी डेट’ ठरविणाऱ्या डॉक्टरची प्रॅक्टिस मात्र तुफान चालते. आतापर्यंत साडेतीन लाख माणसांची ‘एक्स्पायरी डेट’ अचूक काढून दिल्याचा दावा ठोकतो तो! साधे पेशंट तो बघतच नाही आताशा...! आणि त्याला दुसरं कसलं निदानही करता येईनासं झालंय.
परवा वय विसरून नाना त्या ‘डेथ सेलिब्रेशन’च्या मिरवणुकीत ‘डीजे’च्या तालावर नाचता नाचता घेरी येऊन पडले ना, तेव्हा या डॉक्टर महाशयांची त्रेधा उडाली; पण ‘एक्स्पायरी डेट’ ठरविण्यातली त्यांची ‘स्पेशालिटी’ बघून अजयने अमेरिकेतून त्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा करून नानांची ‘डेट’ ठरविण्यासाठी त्यांना पाठवलं.
नाना तसे जुन्या मताचे. प्रभा नानींनाही ही कल्पना आवडली, पटली; पण नानांना नाही; पण करतात काय? नाईलाजानं बसले डॉक्टरच्या पुढ्यात. डॉक्टरांनी भराभर आपली उपकरणं टेबलावर मांडली. पाच मिनिटांत संगणकातून नानांची ‘एक्स्पायरी डेट’ काढून दिली. झालं. पुढची सूत्रं भराभर हलू लागली. चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या उत्साही राजूनं नानांच्या एक्स्पायरी सेलिब्रेशनची व्यवस्था करण्यात विशेष पुढाकार घेतला. देहावसानाची तारीख-वार लिहिलेली आकर्षक निमंत्रणपत्रिका छापून आणली. एका मल्टिनॅशनल क्राइंग कंपनीचे मॅनेजर येऊन भेटले. मनुश्य मेल्यावर नुसतंच रडण्याचं ‘ऑर्डिनरी’ आणि रडारडीपासून पिंडाला कावळा शिवण्यापर्यंतच्या सर्व टप्प्यांवर ‘सर्व्हिस प्रोव्हाइड’ करण्याचं ‘स्पेशल’ पॅकेज समजावून सांगितलं. मध्यमवर्गीयांना परवडणारं पॅकेज आहे का, विचारलं तर मॅनेजर युरोपियन स्टाइलच्या मराठीत म्हणतो कसा – मध्यमवर्गीय तसाही रोज मरतच असतो!
मग रडारड करण्याची रंगीत तालीम. ऑर्केस्ट्रातल्या गायकांना नि वादकांना तो मास्टर हातवारे करून मार्गदर्शन करतो ना, अगदी तश्शी! मॅनेजरनं नानांच्या मरण्यासाठी ‘कम्फर्ट झोन’ची पाहणी करून त्यांची आवडती आरामखुर्ची नक्की केली. एवढ्यात पाठीवर भली मोठी सॅक अडकवलेला अजय अमेरिकेतून येऊन थडकला. नानांसकट खुर्ची वर उचलून अलगद एक्स्पायर करण्याचा थोडा सराव करून झाला. मग मॅनेजरनं नाना-नानींना प्रायव्हसी मिळावी, यासाठी पाच मिनिटं सर्वांना बाहेर पिटाळलं.
पाचव्या मिनिटाला अजय आला, दोन मिनिटं, मग दीड मिनिट, अर्धं मिनिट, असं काउंटडाउन सुरू झालं. ‘झीरो’ला नाना आरामखुर्चीत निपचित. ऑर्केस्ट्रानं गळे काढले. प्रचंड रडारड. अजयनं शेवटची काही सेकंद असताना सेल्फीसुद्धा काढला होता. तो आईचं सांत्वन करू लागला, ‘कमॉन आई, तुझा नवरा मेलाय...!’ पुन्हा रडारड!
इतक्यात नाना जागे होतात. एकदम ओरडतात. नाना जिवंत आहेत हे पाहून सगळ्यांची पळापळ. नाना-नानी, अजय तिघेच उरतात. अजय प्रचंड अपसेट. ‘तुम्ही मेला होतात ना? परत मेलात तर सुट्टी काढून येता येणार नाही मला!’
चिडलेले नाना त्याला हाकलून देतात आणि वातावरणाचा ताण हलका करण्यासाठी प्रभा एक गाणं लावते नि ठेका धरून दोघं नाचू लागतात!
पाली इथल्या नेहरू युवा कलादर्शन नाट्य मंडळानं सादर केलेलं हे नाटक लिहिलं होतं चैतन्य सरदेशपांडे यांनी. दिग्दर्शन होतं गणेश राऊत यांचं.
- राजेंद्रप्रसाद मसुरकर
(९९६०२४५६०१)
(सौजन्य : आकाशवाणी रत्नागिरी)

No comments:
Post a Comment