Tuesday, 19 November 2019

‘अचानक’ नाटकाने रत्नागिरीत राज्य हौशी नाट्य स्पर्धेला प्रारंभ

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या ५९ व्या हौशी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा प्रारंभ रत्नागिरीत सोमवारी (ता. १८ नोव्हेंबर) झाला. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष राजकिरण दळी यांनी उद्घाटन केले. परिषदेचे सचिव समीर इंदुलकर, ज्येष्ठ रंगकर्मी सुहास साळवी, डॉ. शशिकांत चौधरी, गजानन कराळे आणि ज्योती केसकर हे तीन परीक्षक यावेळी उपस्थित होते.
रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होत असलेल्या या स्पर्धेसाठी यावर्षी अकरा संस्थांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धा येत्या २९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. जांभारी (ता. रत्नागिरी) येथील श्री भैरी देव देवस्थान संस्थेने सादर केलेल्या ‘अचानक’ या नाटकाने स्पर्धेला प्रारंभ झाला. त्या नाटकाची ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी करून दिलेली ओळख...
अनाहूतपणे घरी येऊन मुक्काम ठोकलेल्या पाहुण्यांनी आपली ओळख ‘दहशतवादी’ अशी सांगितली तर काय?... अंगावर काटा येईल ना! बँकेत कॅशिअर असणारा सोहेल आणि त्याचे कुटुंबीय यांचं असंच झालं.
सोहेल आणि राधा हे आंतरधर्मीय विवाह करून संसार थाटलेलं दाम्पत्य. सरीन ही त्यांची महाविद्यालयात शिकणारी मुलगी. आंतरधर्मीय विवाह करूनही आपापल्या धर्मश्रद्धा जपत, परस्परांच्या परंपरांचा आदर करणारं हे समाधानी जोडपं एक दिवस अचानक आलेल्या त्या दहशतवादी पाहुण्यांच्या कचाट्यात सापडतं. अब्बास आणि अमीर नावाचे ते दोघे सोहेलवर एक कामगिरी सोपवतात - सर्व जाती-जमातींमध्ये आदराचं स्थान असलेल्या एका ज्येष्ठ धर्मगुरूची हत्या करण्याची. पापभीरू, धर्मनिरपेक्ष नि देशप्रेमी वृत्तीच्या सोहेलला हे मान्य होत नाहीच.
‘दहशतवाद तुमच्या उंबरठ्यावर’ हे मिशन सुरू करणारा निष्ठुर अब्बास सोहेलच्या कुटुंबावर पद्धतशीर दडपण आणतो. लाखो रुपयांच्या बनावट नोटा बँकेच्या तिजोरीत ठेवून चलनातल्या नोटा आणायला भाग पाडतो. त्याला पिस्तूल हाताळायला शिकवतो. सोहेलची पत्नी राधा ही मानसशास्त्राची प्राध्यापक. अब्बासच्या शिकवणुकीचा, किंबहुना तो आणत असलेल्या मानसिक दबावाचा परिणाम होऊन सोहेलच्या हातून एखाद्याची हत्या कशा प्रकारे घडू शकते याचं मानसशास्त्रीय विश्लेषण राधा करते.
अब्बासचा साथीदार अमीर त्यांच्या मुलीला - सरीनला तिच्याच महाविद्यालयात घेऊन जातो. मूलतत्त्ववादी विचारांच्या युवकासोबत तिला पाहिल्यावर महाविद्यालयातील काही युवक तिच्यावर चिखलफेक करतात, ती भेदरून घरी येते. या सगळ्या वातावरणाचा सोहेलवर नकळत परिणाम होऊ लागतो... कदाचित, अब्बासला पाहिजे तसा!
धर्मगुरूची हत्या अजून दूर आहे. सोहेलला माणूस ठार झालेला पाहायला मिळावा यासाठी अब्बास एक दिवस अनपेक्षितपणे आपल्याच साथीदाराला गोळी घालून ठार करतो. त्याचं प्रेत घरातल्या एका खोलीत ठेवून देतो. अशा भेसूर वातवरणात ते कुटुंब कित्येक तास काढतं. ती परिस्थिती असह्य झाल्यानं, एका क्षणी तिथून निसटून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या त्या तिघांना अब्बास रोखतो आणि सोहेलच्या हातून राधालाच गोळी घातली जाईल अशी परिस्थिती निर्माण करतो. ‘आज या घरात मुडदा पडलाच पाहिजे’ असं अब्बास सांगत असतानाच अचानकपणे मागे वळून सोहेल अब्बासवर गोळ्या झाडून त्याचा खात्मा करतो.

यानंतरच्या काही क्षणांतच भानावर आलेल्या सोहेलची हातून घडलेल्या कृत्यांबद्दल न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगण्याची तयारी होते. त्याचं देशप्रेम जिवंत आहे या भावनेनं ते त्रिकोणी कुटुंब प्रफुल्लित होतं.
जांभारी इथल्या श्री भैरीदेव देवस्थानच्या कलाकारांनी हे नाटक सादर केलं. योगेश सोमण यांनी लिहिलेल्या या संहितेला प्रशांत पावरी यांच्या दिग्दर्शनाची साथ मिळाली. सदैव सावध असलेला अमीर, थंड डोक्याचा अब्बास, दडपणाखाली वाहत चाललेला सोहेल आणि भेदरलेली कॉलेजकन्यका सरीन यांच्या भूमिका चांगल्या वठल्या आहेत. स्वाती खापरे या तरुण कलावतीनं मध्यमवयीन राधा सादर करताना भीतीनं उठलेले काहूर, उद्वेग, विश्लेषण करण्याचं भान आणि संकटातही सत्त्व जपण्याची निष्ठा या भावना ताकदीनं पेश केल्या. दहशतवादाला सामोरं जाण्याचा प्रसंग सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब कशा प्रकारे हाताळू शकतं याचं एक प्रात्यक्षिकच ‘अचानक’च्या रूपाने पाहायला मिळतं.
- राजेंद्रप्रसाद मसुरकर
(संपर्क: ९९६०२४५६०१)
.............
या नाटकाचा आढावा ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://youtu.be/C5l-91xGcq8
(सौजन्य : आकाशवाणी, रत्नागिरी)


No comments:

Post a Comment