Thursday 24 October 2019

रत्नागिरीत शिवसेनेने कमावले, राष्ट्रवादीने गमावले, काँग्रेस जैसे थे


            शिवसेनेने कमावले, राष्ट्रवादीने गमावले आणि काँग्रेसची स्थिती जैसे थे राहिली, असेच विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे रत्नागिरी जिल्ह्याचे विश्लेषण करता येऊ शकेल.
            या निवडणुकीने अनेक गमतीजमती रत्नागिरी जिल्ह्यात घडवून आणल्या आहेत. मावळत्या विधानसभेत शिवसेनेचे तीन, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार होते. शिवसेनेने एक अधिक जागा मिळविली असली, तरी चिपळूणची आधीची एक जागा गमावली आहे. गेल्या निवडणुकीत गमावलेला दापोली मतदारसंघ शिवसेनेने पुन्हा खेचून आणला, तर गुहागरचा मतदारसंघ शिवसेनेने पहिल्यांदाच मिळवला आहे. जनता पक्षाचे रत्नागिरी आणि रत्नागिरी हे एकेकाळचे बालेकिल्ले आता शिवसेनेच्या ताब्यात गेले आहेत.
            चिपळूणची जागा शिवसेनेने गमावली. सलग दहा वर्षे आमदार असलेल्या उमेदवाराला तेथील मतदारांनी पराभूत केले आहे. रत्नागिरीमध्ये उदय सामंत ही व्यक्ती चौथ्यांदा निवडून आली आहे. दापोलीचे सूर्यकांत दळवी शिवसेनेचे सहा वेळा आमदार होते. त्या विक्रमाकडे उदय सामंत या व्यक्तीने वाटचाल सुरू केली आहे. पण सामंत यांची पहिली दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशी ओळख होती. गेल्या निवडणुकीपासून ते शिवसेनेचे आमदार म्हणून ओळखले जात आहेत. यावेळी ते चौथ्यांदा निवडून आले आहेत. सदानंद चव्हाण दोन वेळा निवडून आले. यावेळी ते पराभूत झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ दोनवरून एकवर आले. पण त्याच वेळी गुहागरची जागा राष्ट्रवादीने गमावली आणि चिपळूणची जागा दहा वर्षांनंतर पुन्हा मिळवली आहे. यापूर्वी २००४ साली रमेश कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून चिपळूणमधून निवडून आले होते.
            गुहागरमध्ये शिवसेनेने प्रथमच खाते उघडले आहे. आतापर्यंत शिवसेनेचा एकही आमदार नव्हता. युतीच्या जागावाटपात गुहागरची जागा भाजपला दिली गेली होती. तेथे २००४ च्या निवडणुकीपर्यंत भाजपचे वर्चस्व होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले भास्कर जाधव यांनी ते २००९ मध्ये मोडून काढले. गेल्या वेळी युती नव्हती. तरीही भाजपला आपली जागा पुन्हा मिळवता आली नाही. यावेळी युती झाली, तरी भाजपच्या वाट्याला गुहागरसह जिल्ह्यातील एकही जागा आली नाही. त्यामुळे गुहागरचा मतदारसंघ शिवसेनेकडे प्रथमच सुपूर्द झाला.
            राजापूरमध्ये १९६२ मध्ये काँग्रेसचे सहदेव मुकुंद ठाकरे निवडून आले होते. तेव्हा पराभूत झालेले प्रजासमावादी पक्षाचे लक्ष्मण रंगनाथ हातणकर १९६७ आणि १९७२ मध्ये प्रजासमाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. १९७८ आणि १९८० मध्ये त्यांनी जनता पक्ष आणि जनता पक्ष जेपी या पक्षांमधून निवडणूक लढवून जिंकली होती. नंतरच्या १९८५ आणि १९९० च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली. त्यामुळे तेवढी दहा वर्षे राजापूर मतदारसंघ काँग्रेसकडे होता. नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर २००६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राजापूर आणि संगमेश्वरमध्ये काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. पण ती पोटनिवडणूक होती आणि नारायण राणे यांच्या करिष्म्यामुळे त्यांच्या सुभाष बने आणि गणपत कदम या त्यांच्या दोघा अनुयायांना त्या जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर राजापूरच्या रूपाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पुन्हा एकदा सुरुवात करील, असे यावेळच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या सात फेऱ्यांपर्यंत वाटले होते. मात्र आठव्या फेरीनंतर चित्र पूर्ण पालटले. शिवसेनेचे राजन साळवी यांनी आघाडी काँग्रेसचे अविनाश लाड यांच्यावर आघाडी घ्यायला सुरवात केली. त्यामुळे ही जागा पुन्हा मिळविण्याचे काँग्रेसचे स्वप्न अपुरेच राहिले आणि जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती होती तशीच राहिली.
            रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. या समाजाला कित्येक वर्षांत प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. केवळ मतांच्या राजकारणापुरता कुणबी समाजाचा वापर करून घेतला जात असल्याची सार्वत्रिक भावना होती. या पार्श्वभूमीवर गुहागरमध्ये सहदेव बेटकर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तर राजापूरमध्ये अविनाश लाड काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत होते. मात्र ते दोघेही पराभूत झाल्यामुळे कुणबी कार्ड या दोन्ही मतदारसंघांमध्ये चालले नाही, हेच स्पष्ट झाले.
            निवडणुकीतील यशापयशाचा शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षांनी विचार करायला हवा. चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्यामुळे निर्माण झालेली नाराजी सदानंद चव्हाण यांच्या पराभवाला जितकी कारणीभूत ठरली, त्यापेक्षाही अधिक प्रमाणात शेखर निकम यांनी गेल्या वेळच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही संपूर्ण मतदारसंघाकडे दिलेले लक्ष, ठिकठिकाणी केलेली कामे आणि सतत ठेवलेला चांगला संपर्क त्यांना विजयापर्यंत घेऊन गेला. त्याउलट स्थिती दापोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार संजय कदम यांची होती. विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांनी सरकारची धोरणे आणि राज्यस्तरावरच्या प्रश्नांबाबत अधिक मतप्रदर्शन केले. निषेध नोंदविला. आंदोलन केले. आमदार या नात्याने त्यांनी जेवढा संपर्क ठेवायला हवा होता, मतदारसंघातील विविध कामे करायला हवी होती, ती पाच वर्षांत केलेली नाहीत. त्याचा फटका त्यांना बसला. दापोलीमध्ये शिवसेनेचे योगेश रामदास कदम यांनी गेल्या पाच वर्षांपासूनच निवडणुकीची तयारी चालविली होती, हेही लक्षात घ्यायला हवे. राजापूर मतदारसंघात शिवसेनेचे राजन साळवी विजयी झाले असले तरी त्यांच्या मताधिक्यामध्ये घट झाली आहे. नाणार प्रकल्पासारख्या ज्वलंत विषयाच्या बाबतीत त्यांची आणि त्यांच्या पक्षाची भूमिका, भारतीय जनता पक्षाचे त्या प्रश्नाच्या बाबतीत न मिळालेले सहकार्य, तसेच प्रकल्पाच्या बाजूने असणारे मतदार या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून साळवी यांच्या मतांमध्ये घट झाली आहे.
            मतमोजणीच्या सातव्या फेरीपर्यंत आघाडीवर असलेले अविनाश लाड यांनी आणि त्यांच्या पक्षानेही त्यांना ज्या भागातून मताधिक्य मिळाले, त्या भागातून ते का मिळाले आणि मतदारसंघातील इतर भागांमध्ये ते का मिळू शकले नाही, याचा विचार करायला हवा. शिवसेनेने रत्नागिरीची जागा टिकविली आहे. उमेदवार उदय सामंत यांनी मताधिक्याचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. मात्र त्यांना मिळालेले यश शिवसेनेचे नसून व्यक्तिगतरीत्या उदय सामंत यांचे आहे, हेही शिवसेनेने लक्षात घ्यायला हवे. गेल्या काही काळापासून उदय सामंत शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असल्याची चर्चा होती. ती वस्तुस्थिती होती की अफवा होती, याबाबत काही सांगता येणार नाही. मात्र खरोखरीच श्री. सामंत भाजपमध्ये गेले असते तर यावेळी कदाचित रत्नागिरीची जागा भाजपने म्हणजेच उदय सामंत यांनीच जिंकली. असती यात शंका नाही.
            एकंदरीत या निवडणुकीने सर्वच पक्षांना विचार करायला लावायचा धडा शिकविला आहे.

-           प्रमोद कोनकर

No comments:

Post a Comment