Tuesday 22 October 2019

रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसचा विक्रम मोडायला शिवसेनेला हवीत आणखी पाच वर्षे      रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात १९६२ सालापासून झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आतापर्यंत काँग्रेसचेच सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत. गेल्या १० वर्षांत झालेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व पुसले गेले आहे. काँग्रेसखालोखाल शिवसेनेचे २४ आमदार जिल्ह्यातून निवडून आले असले, तरी काँग्रेसचा विक्रम मोडून पुढे जायला शिवसेनेला  आणखी पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
      रत्नागिरी जिल्ह्यात ९ तालुके आणि सध्या विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत. राज्याच्या स्थापनेनंतर १९६२ साली झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात नऊ मतदारसंघ होते. मात्र ते तालुक्यानुसार नव्हते. संगमेश्वर तालुक्यातील माखजन विभागासाठी विधानसभेचा स्वतंत्र मतदारसंघ होता. तो अनुसूचित जमातींसाठी राखीव होता. पाच वर्षांनी १९६७ साली झालेल्या निवडणुकीमध्ये तो मतदारसंघ कमी झाला. त्यानंतर जिल्ह्यातील एकही मतदारसंघ राखीव नाही. आणीबाणीनंतर १९७८ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील आणखी एक मतदारसंघ कमी झाला. लांजा मतदारसंघ संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट झाला. त्यामुळे जिल्ह्यातल्या मतदारसंघांची संख्या सातवर आली. मंडणगड आणि दापोली या दोन तालुक्यांसाठी एक, लांजा-संगमेश्वरसाठी एक, तर राजापूर, रत्नागिरी, गुहागर, चिपळू आणि खेड या प्रत्येक तालुक्यासाठी एकेक मतदारसंघ तेव्हा होता. त्यानंतर २००९ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि जिल्ह्यातील विधानसभेचे मतदारसंघ ७ वरून पाचपर्यंत कमी झाले. त्यामुळे वेगळी विचारसरणी असलेले, वेगवेगळी राजकीय पार्श्वभूमी असलेले मतदारसंघ वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये विभागले गेले. दापोलीचा मतदारसंघ दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्याचा काही भाग घेऊन तयार झाला. गुहागर मतदारसंघ गुहागर, चिपळूआणि खेड तालुक्यातल्या काही गावांचा मिळून तयार झाला. चिपळूण मतदारसंघ संगमेश्वर तालुक्याच्या काही भागापर्यंत विस्तारला गेला. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाला संगमेश्वर तालुक्याती काही गावे जोडली गेली. राजापूर तालुका संगमेश्वर तालुक्याचा काही भाग, संपूर्ण लांजा तालुका आणि संपूर्ण राजापूर तालुका एवढा विस्तारला.
            जिल्ह्यातून १९६२ पासून २०१४ पर्यंत ८८ आमदार निवडले गेले. त्यामध्ये काँग्रेसचे सर्वाधिक ३० आमदार होते. त्याखालोखाल शिवसेनेचे २४ आमदार निवडून आले आहेत. प्रजासमाजवादी पक्ष १९६२ आणि १९६७ या दोन निवडणुकांमध्ये पाच जागांवर विजय ठरला होता. जनसंघाने १९७२ साली एकच निवडणूक जिंकली. आणीबाणीनंतर १९७८ साली स्थापन झालेल्या जनता पक्षाने जिल्ह्यातील सर्व सात जागा जिंकल्या. त्यानंतर १९८० स्थापन झालेल्या भारतीय जनता दल जेपी पक्षाने चार जागी विजय मिळविला. १९७८ च्या निवडणुकीत नामशेष झालेल्या काँग्रेसने १९८० साली दोन जागा मिळविल्या. १९८० पासून २००४ सालापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला ११ जागा मिळाल्या. १९९० ते २०१४ पर्यंतच्या सहा निवडणुकांमध्ये शिवसेनेला २४ जागी यश मिळाले, तर १९९९ साली स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २००४ ते २०१४ या काळातील तीन निवडणुकांमध्ये एकूण सहा जागा मिळाल्या.
            रत्नागिरी जिल्ह्यात ४ वेळा पोटनिवडणुका झाल्या. पहिली पोटनिवडणूक १९८४ साली झाली. जनता पक्षाच्या स्थापनेनंतर १९७८ पासून सौ. कुसुमताई अभ्यंकर रत्नागिरीच्या आमदार होत्या. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेनंतर १९८० साली त्या भाजपच्या आमदार झाल्या. त्यांचे निधन झाल्याने १९८४ साली पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये भाजपचे शिवाजीराव गोताड निवडून आले. गुहागरचे भाजपचे आमदार डॉ. श्रीधर नातू यांचे निधन झाल्याने १९९३ साली झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र डॉ. विनय नातू भाजपचेच उमेदवार म्हणून निवडून आले. नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ संगमेश्वरचे सुभाष बने आणि राजापूरचे गणपत कदम हे दोघे आमदार शिवसेनेचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये गेले त्यांच्या राजीनाम्यामुळे २००६ साली संगमेश्वर आणि राजापूर या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये तेच दोघेजण त्याच मतदारसंघांमधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले.
            पक्षबदल केलेल्या उमेदवारांनाही वेगवेगळ्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात यश मिळाले अॅड. लक्ष्मण रंगनाथ हातणकर यांनी १९६२ साली प्रजासमाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. पण त्यावेळी ते पराभूत झाले होते. पण त्यानंतरच्या १९६७ आणि १९७२ च्या निवडणुकीत ते प्रजासमाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झाले. त्यानंतर १९७८ आणि १९८० च्या निवडणुकीत ते जनता पक्ष आणि जनता पक्ष जेपीचे उमेदवार म्हणून निवडून आले. १९८५ आणि १९९० च्या निवडणुकीत ते काँग्रेसचे विजयी उमेदवार होते. शिवसेनेचे सुभाष बने आणि गणपत कदम हे दोघे उमेदवार काँग्रेसमध्ये गेल्यानंतर पोटनिवडणुकीत विजयी झाले. पण नंतरच्या निवडणुकांमध्ये ते पराभूत झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वेळा रत्नागिरीचे आमदार असलेले उदय सामंत शिवसेनेत गेल्यानंतर २०१४ मध्ये शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. १९९५ आणि १९९९ साली चिपळूणचे शिवसेनेचे आमदार असलेले भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार म्हणून गुहागर मतदारसंघातून निवडून आले. यावेळी ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत दाखल झाले असून त्यांनी गुहागरच निवडणूक लढविली आहे. राजापूरचे ल. रं. हातणकर १९६७ ते १९९५ एवढा प्रदीर्घ काळ विविध पक्षामधून आमदार म्हणून निवडले गेले होते. ते २८ वर्षे आमदार होते. गुहागरचे डॉ. श्रीधर नातू १९७२ सारी जनसंघाचे, तर १९७८ मध्ये जनता पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले होते. पण भाजपचे उमेदवार म्हणून १९८० साली ते अवघ्या २२५ मतांनी पराभूत झाले. त्यानंतर १९८५ आणि १९९० च्या निवडणुकीत ते ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झाले. रत्नागिरीच्या आमदार कुसुमताई अभ्यंकर १९७८ साली जनता पक्षाच्या, तर १९८० साली भाजपच्या आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांच्या निधनामुळे १९८४ साली झालेल्या पोटनिवडणुकीत शिवाजीराव गोताड विजयी झाले, पण १९८५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यानंतर पुन्हा १९९० सालच्या निवडणुकीत ते विजयी झाले. गुहागर मतदारसंघात १९७२ पासून १९८० च्या निवडणुकीचा अपवाद वगळता जनसंघ आणि भाजपचे डॉ. श्रीधर नातू आणि १९९३ च्या पोटनिवडणुकीपासून त्यांचे पुत्र डॉ. विनय नातू प्रतिनिधित्व करत होते. पण २००९ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर ते पराभूत झाले. २००४ च्या निवडणुकीपासून रत्नागिरीतून, तर २००९ पासून गुहागर मतदारसंघातून भाजपचे अस्तित्व पुसले गेले आहे. गेल्यावेळच्या निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढविल्या होत्या. त्यामध्ये शिवसेनेला तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. काँग्रेस आणि भाजपला एकही जागा मिळाली नाही. यावेळच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये भाजपच्या वाट्याला जिल्ह्यातील एकही जागा आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात आमदार म्हणून भाजपचे अस्तित्व यावेळीही निर्माण होणार नाही.
            रत्नागिरी जिल्ह्याने आतापर्यंत निवडून दिलेल्या ८८ आमदारांपैकी काँग्रेसचे ३० आमदार होते. शिवसेनेला गेल्या वेळच्या निवडणुकीपर्यंत २४ आमदार मिळाले आहेत. यावेळी जिल्ह्यातील पाचही जागा शिवसेनेने जिंकल्या, तरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांची संख्या २९ होते. काँग्रेसला मागे टाकण्यासाठी शिवसेनेला पुढच्या वेळच्या म्हणजे २०२४ सालच्या निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

-    प्रमोद कोनकर

No comments:

Post a Comment