रत्नागिरीत कीर्तनसंध्या महोत्सवाला थाटात प्रारंभ
रत्नागिरी : जागतिक धर्मसभेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी फक्त तीन मिनिटे भाषण केले. माझ्या बंधू-भगिनींनो हे शब्द आधीच्या वक्त्यांनीही म्हटले होते. परंतु स्वामींनी हे शब्द उच्चारताच भाव पोहोचवणारा अनुभव सार्यांनी घेतला व विजेची लाट गेल्यासारखे वाटून सारे थरथरत होते. अनेकांचे डोळे डबडबले, हा सार्वत्रिक अनुभव असल्याने टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. यामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळात आध्यात्मिक राष्ट्रभक्त आणि योद्धा संन्यासी असा नावलौकिक विवेकानंदांनी मिळवला. त्यांची राष्ट्रभक्ती अलौकिक होती, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.
कीर्तनसंध्या संस्थेतर्फे येथील महाजन क्रीडासंकुलात कालपासून सुरू झालेल्या कीर्तन महोत्सवात ते बोलत होते.
राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनसंध्या महोत्सवाला कालपासून (दि. ३ जानेवारी) स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे दिमाखात प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महारराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष राहुल पंडित, पितांबरी उद्योग समूहाचे प्रदीप प्रभुदेसाई, मथुरा एक्झिक्युटिव्हचे शांताराम देव, किर्तनसंध्याचे अध्यक्ष अवधूत जोशी, सामाजिक कार्यकर्ते माधव कुलकर्णी उपस्थित होते. अवधूत जोशी यांनी बुवांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. महोत्सवात आफळेबुवा दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ही कीर्तने होणार आहेत. कीर्तनाच्या पूर्वरंगात लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या गीतारहस्यावरचे विवेचन आफळेबुवा पाचही दिवस करणार आहेत. त्यानंतर उत्तररंगात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, चापेकर बंधू, महात्मा फुले, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, मदनलाल धिंग्रा, बिपिनचंद्र पाल, खुदीराम बोस, फडके, बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी कार्याचा आलेख मांडणार आहेत.
बुवांनी पूर्वरंगात गीतारहस्य या अवघड ग्रंथावर भाष्य केले. हा ग्रंथ ६५० पानांचा असून तो समजण्यास खूप कठीण आहे. मात्र लोकमान्य टिळकांनी तो स्वातंत्र्यपूर्व काळात लिहून देशभक्ती वाढवण्यासाठी व स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योगदान केले. समाजात मूर्ख, अविचारी व इंग्रजाळलेल्या शिक्षणामुळे हिंदू धर्माला आणि गीताग्रंथाला नावे ठेवणार्या लोकांवर त्यांनी टीका केली. मुस्लिम, ख्रिस्ती लोकांचा रोजा, फास्ट म्हणजे उपवास कसा कडक असतो, हे हिंदू सांगतात. पण एकादशीचा उपाससुद्धा करता येत नाही, अशा शब्दांत त्यांनी आसूड ओढला. हे सारे इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे घडत आहे. रविवार किंवा मे महिन्याची सुट्टी इंग्रजांनी सुरू केली. कारण त्यांना चर्चमध्ये जायचे असते आणि उन्हाळा ते सहनच करू शकत नाहीत. हिंदूंनी स्वतःच्या संस्कृतीचा आणि हिंदुस्थानचा आदर केलाच पाहिजे, असे बुवांनी ठामपणे सांगितले.
योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंदांचा जीवनपट छोट्या छोट्या गोष्टी, गीते, पोवाड्यातून बुवांनी उलगडला. स्वामी लहानपणी जत्रेत गेले असता घोडागाडीखाली येणार्या लहान बालकाला वाचवताना हातातील शंकराची पिंडी त्यांनी फेकली होती. त्यामुळे ते घाबरले, परंतु आईने, तू माणसात श्री शंकर पाहिलास, असे सांगितले. मोठेपणे ते रामकृष्ण परमहंस यांच्याकडे साधना शिकत होते. पाच वर्षांची साधना झाली. आता मला निर्विकल्प समाधी द्या, असे स्वामींनी गुरूंना सांगितले. त्या वेळी गुरूंनी त्यांना हिंदुस्थानातील गरिबी, बेकारी आणि भरकटलेली जनता यांना मार्ग दाखव, अशी सूचना केली. मी या देहात नसलो तरी तुझ्यासोबत आहे, असे मार्गदर्शन केले. ही जोडी सद्गुरु-सत्शिष्याची व लोकप्रबोधन करणारी एकमेव होती.
रामकृष्ण परमहंसांच्या आदेशाप्रमाणे स्वामी विवेकानंद भारतभ्रमणास निघाले. महाराष्ट्रात आल्यावर लोकमान्य टिळकांची भेट त्यांनी घेतली. समाजहिताची काळजी करणार्या या दोन सुधारकांची बहुधा हिंदूंना एकत्रित आणणारा विराट उत्सव सुरू करण्यासंबंधी चर्चा झाली असावी. या भेटीनंतरच टिळकांनी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात सुरू केला, असे आफळेबुवांनी सांगितले.
आफळेबुवांच्या कीर्तनाची सांगता सत्राणे उड्डाणे ही मारुतीची आरती व राष्ट्रगीताने झाली. या कीर्तनात बुवांनी कृष्ण माझी माता, विश्वनाथ हे नाव पित्याचे, पद्मनाभा नारायणा, अनादि निर्गुण, देव नाही देव्हार्यात, परिषदेचा तो दिन आला आदी पदे सुरेखपणे ऐकवली. त्यांना अजिंक्य पोंक्षे याने संगीतसाथ केली. तालवाद्यसाथ महेश सरदेसाई यांनी केली. मधुसूदन लेले, हेरंब जोगळेकर, उदय गोखले व प्रथमेश तारळकर यांची वाद्यसाथ मिळाली.
...........
No comments:
Post a Comment