Saturday 6 January 2018

इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी टिळकांनी समाजाचे प्रबोधन केले – चारुदत्त आफळे


कीर्तनसंध्या तृतीय पुष्प

      रत्नागिरी : आद्य क्रांतिकारक फडके यांच्या लाठीकाठीच्या वर्गात टिळकांनी प्रशिक्षण घेतले होते. पण मर्यादित सैन्याने इंग्रजांना हरवणे शक्य नसल्याने टिळकांनी फडके यांच्या लढ्यात भाग घेतला नाही. पण टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करून हिंदूंमध्ये इंग्रजांविरोधात रणशिंग फुंकले. क्रांतिकारक तयार करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि वृत्तपत्रे सुरू करून लढा उभारला, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.


      येथील स्व. महाजन क्रीडा संकुल येथे कीर्तनसंध्या आयोजित राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाच्या तिसर्यात दिवशी शुक्रवारी (दि. ५ जानेवारी) त्यांनी टिळक चरित्र मांडले. टिळकांच्या कॉलेजजीवनातील काही किस्से बुवांनी रंजकपणे सांगितले. महाविद्यालयात सोवळ्याने भोजन, फी भरता येत नसल्याने आगरकरांना भाषांतराचे करावे लागलेले काम आणि त्यामुळे अभ्यासासाठी त्यांच्याकडे नसलेला वेळ, अशा वेळी छत्रे गुरुजींनी आगरकरांच्या परीक्षेच्या फीचे भरलेले पैसे, इंग्रजांशी लढा कसा द्यावा, याची गणिती बैठक निश्चित असलेला गणिताचा अभ्यास, वर्षभर व्यायाम करून त्यांनी कमावलेली शरीरयष्टी, मात्र वर्षभर वर्ग चुकवला नाही. परीक्षाही दिली पण सर्व उत्तरे येऊनही पास होण्याएवढी उत्तरेच लिहिली नाहीत, अशा अनेक किश्श्यांचा त्यात समावेश होता. गुजरातेतील द्वारकेजवळच्या प्रभासपट्टण येथील जातीय दंग्यांमध्ये इंग्रजांनी तेल ओतले आणि तेव्हाच भारताची दोन देशांत विभागणी होणार हे टिळकांच्या लक्षात आले. टिळकांनी वृत्तपत्रांतून इंग्रजांवर टीका केली. शिवाय इंग्रजांच्या दुहीच्या या कटाला शह देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून समस्त हिंदूंना एकत्र आणले. रायगडावर जाऊन शिवजयंतीनिमित्त लाठीकाठीचे खेळ, कवायती सुरू केल्या. महात्मा फुले यांनी महाराजांचे समाधिस्थळ शोधून स्वच्छता केली. उत्सव समिती नेमली. तेथेच उत्सव सुरू केला, असेही श्री. आफळे यांनी सांगितले.
      बुवांनी सांगितले की, स्वातंत्र्य मिळण्यासाठी टिळकांनी समाजाची मोट बांधली. टिळक कीर्तन संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी कीर्तनकारांना राम, श्रीकृष्ण आणि पौराणिक कीर्तनासह शिवचरित्र उलगडून राष्ट्रभक्तीची ज्योत पेटविण्याची विनंती केली. तेव्हापासून राष्ट्रीय कीर्तन सुरू झाले, क्रांतिकारक तयार झाले आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने बाजी मारली.
      तिसरे युद्ध अटळ असल्याचे बुवांनी सांगितले. भारतावर आक्रमणासाठी चीन, पाकिस्तान व पाश्चिरमात्य देश सज्ज आहेत. त्यासाठी हिंदूंनीही बलदंड झाले पाहिजे, रोज व्यायाम, सूर्यनमस्कार, ध्यानधारणा केली पाहिजे. सीमेवर युद्धासाठी सैन्यासोबत पोलिसांनाही जावे लागेल. त्यावेळी आपणच आपले संरक्षण करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. आपल्या शाळांमधील कवायत म्हणजे ज्येष्ठांसाठीचा व्यायाम झाला आहे. याबाबत शासनाला तीन वेळा कळवले आहे. शालेय मुलांना लाठीकाठी, जोर-बैठका, गिर्यारोहणाचे प्रशिक्षण दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
      आफळेबुवांनी सांगितले की, आहारातला विवेक महत्त्वाचा आहे. चमचमीत, उग्र खाण्यातून काहीही फायदा नाही. पूर्वी राजांना युद्धावर जाताना मांसाहाराची परवानगी धर्मानेच दिली होती. पण आवश्यकता नसताना तो करू नये. आयुष्यभर आध्यात्मिक साधना व शाकाहारी दधिची ऋषींच्या हाडांच्या शस्त्राने वृत्रासुराला मारले, हे लक्षात घेतले पाहिजे. आत्मिक सुखाकडे वळण्यासाठी दररोज ध्यानसाधना हवी. त्यासाठी दृढ बुद्धी (धृती) ठेवली पाहिजे. शरीर हे भाड्याचे घर आहे आणि आतील आत्मा हे स्वतःचे घर. त्या दिशेने वाटचाल करायला हवी, असेही श्री. आफळे यांनी सांगितले. पूर्वरंगात त्यांनी टिळकांच्या गीतारहस्य ग्रंथातील काही अध्यायांचे निरूपण आपल्या ओघवत्या शैलीत केले.
      राजस सुकुमार, जनसेवेपायी काया झिजवावी, आदी पदे म्हणून बुवांनी कीर्तनात रंगत आणली.
...........



कीर्तनप्रेमींच्या वाहनांची पार्किंगमध्ये झालेली दाटी

No comments:

Post a Comment