Tuesday 9 January 2018

कॅशलेस व्यवहारांसाठी सुलभ भीम अॅपचा वापर वाढला      कॅशलेस व्यवहारांसाठी अत्यंत सुलभ असलेल्या भीम अॅपचा वापर वाढला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केलेले क्रांतिकारक अॅप भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजे भीम अॅप वर्षभरात देशातील ६५ बँकांच्या ग्राहकांसाठी व्यवहार करण्यासाठी उपलब्ध झाले आहे.
      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबर २०१६ रोजी हे अॅप सुरू केले होते. वैशिष्ट्यपूर्णतेमुळे हे अॅप भारतीयांच्या पसंतीस उतरले आहे. भीम अॅपचा वापर केल्यास पैसे वापरकर्त्याच्या बँक खात्यात थेट जमा होतात. क्यू आर कोड स्कॅन करूनही रक्कम भरता येते. या अॅपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही भीम अॅप किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरकर्त्याला पैसे मागविण्यासाठी कलेक्ट रिक्वेस्ट पाठवता येते. मुंबईतील २३ वर्षाचे सत्यम मंगलमूर्ती ह्युमन रिसोर्सेस व्यावसायिक असून हे अॅप ते नियमितपणे वापरतात. ते म्हणतात की, माझ्या घराच्या जवळच एक डिपार्टमेंटल स्टोअर असून घरातील सर्व किराणा माल मी तेथूनच घेतो. बिलाची रक्कम भीम अॅपद्वारे तेथे स्वीकारली जाते. लहानसहान वस्तूंच्या खरेदीसाठी मला पैशाचे पाकीट किंवा तत्सम कोणतेही साधन बरोबर घेऊन जाण्याची गरजच नाही. शिवाय मला गुंतागुंतीची अॅप्स मुळीच आवडत नाहीत. भीम अॅपद्वारे व्यवहार करण्यासाठी तांत्रिक मुद्दे समजून घेण्याची काहीच गरज नाही, हे मला सर्वांत जास्त आवडते. माझ्या प्रशिक्षण कालावधीत माझे मित्र मेसमधील जेवण टाळण्यासाठी रात्री बाहेर जेवायला जात तेव्हा आम्ही भीम अॅपचा उपयोग करून बिले एकमेकांमध्ये विभागून घेत असू. अशा अॅपमुळे सामूहिक खर्च करण्याची व्यवस्था इतकी सोपी आहे की, काही सेकंदांत तुम्हाला कलेक्ट रिक्वेस्ट पाठवता येते. अनेक प्रकारचे पासवर्ड मी लक्षात ठेवू शकत नाही. त्याचमुळे भीम अॅपद्वारे देवघेवीचे व्यवहार करणे मला खूपच सोपे जाते.
      सत्यमने शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी आणि पैसे हस्तांतरित करण्यासाठी आपले बँक खाते भीम अॅपशी जोडले आहे. त्याने आर्थिक व्यवहार करण्याच्या पत्त्यासाठी UPI आयडी तयार केला असून पैसे हस्तांतरित करताना बँकेचा खाते क्रमांक तसेच आयएफएस कोडऐवजी हा आयडी देता येतो. भीम अॅपचा उपयोग करून संपर्कातील व्यक्तींना पैसे पाठविता येतात. देय रक्कम चुकती करणे विसरले जाऊ नये म्हणून रिमाइंडर तयार करता येतो आणि आपल्या संदर्भासाठी व्यवहाराची स्टेटमेंट डाऊनलोड करता येतात. अनोळखी कलेक्ट रिक्वेस्टला स्पॅम म्हणून नोंदवण्याच्या वैशिष्ट्यामुळे वाढीव सुरक्षितता मिळते.
                      केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी भीम अॅपचा वापर वाढण्याकरिता आता प्रोत्साहनपर रक्कम ग्राहकांना दिली जाणार आहे. भीम अॅप वापरण्याची शिफारस एकमेकांना केल्यास शिफारस करणारा आणि ज्याला अशी शिफारस केली आहे त्या दोघांनाही काही ठरावीक व्यवहार पूर्ण केल्यानंतर प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे.
      भीम अॅपचे आणख एक वैशिष्ट्य म्हणजे या अॅपची शिफारस करणाऱ्याला आणि ते डाऊनलोड करून त्याचा वापर करणाऱ्याला अशा दोघांनाही प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते. ज्याला शिफारस करायची आहे, त्याला भीम अॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि रेफरल कोडमध्ये आपला मोबाइल क्रमांक टाकावा. या अॅपचा वापर सुरू केल्यानंतर शिफारस करणारा आणि अॅप डाऊनलोड करणाऱा या दोघांनीही किमान ५० रुपयांचे किमान तीन व्यवहार केले, तर त्या दोघांनाही प्रत्येकी २५ रुपये बक्षीस मिळणार आहेत. BHIM अॅपसंदर्भात अधिक माहितीसाठी कृपया www.bhimupi.org.in/ वर मिळू शकेल.

      अँड्रॉइड फोन वापरणारे भीम अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतात तर आय फोन वापरकर्त्यांना ते  अॅपल अॅप स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.  एकदा हे अॅप डाऊनलोड केले की UPI पिन, UPI आय डी तयार करावा लागेल. त्यानंतर या अॅपद्वारे व्यवहार सुरू करता येतात. BHIM अॅप मराठीसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. पैसे झटपट  पाठवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी फोनची  संपर्क यादी शोधून त्यातून ज्यांच्याशी व्यवहार करायचे आहेत त्यांची निवड करता येते.
      नॅशनल पेमेंट्स ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (NCPI) भारतातील विविध ठिकाणी किरकोळ रक्कम भरण्याच्या व्यवस्थेसाठी मध्यवर्ती पायाभूत सुविधा म्हणून २००९ मध्ये स्थापना करण्यात आली आणि देशातील सर्व बँकांकरिता उपयुक्त सेवा म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने त्याचा विचार केला आहे. राष्ट्रीय वित्तीय सेवेच्या माध्यमातून आन्तरबँक एटीएम व्यवहार या एकमेव सेवेपासून धनादेश देवाणघेवाण व्यवस्था, नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (NACH),   आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम (AePS), यूएसएसडी आधारित ``99#’’, रुपे कार्ड, इमिजिएट पेमेंट सर्व्हिस (IMPS),  युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI), भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM), BHIM आधार, नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन  आणि भारत बिल पेपर्यंत आता या सेवांचा विस्तार झाला आहे. अधिक माहिती www.npci.org.in या संकेतस्थळावर मिळू शकेल. अधिकाधिक ग्राहकांनी भीम अॅपचा वापर करावा, असे आवाहन नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने केले आहे.

...........


No comments:

Post a Comment