Monday, 8 January 2018

जगाचे नेतृत्व करण्याकडे हिंदुस्थानची वाटचाल – चारुदत्तबुवा आफळे

कीर्तनसंध्या – पाचवे आणि अखेरचे पुष्प


      रत्नागिरी : स्वा. विनायक दामोदर सावरकरांनी हिंदुस्थान जगाचे नेतृत्व करणारे राष्ट्र बनेल, अशी भविष्यवाणी केली होती. त्या दिशेने भारताचे प्रवास सुरू झाला आहे. लोकमान्य टिळकांनंतर कित्येक वर्षांनी हिंदुस्थानला प्रभावी नेतृत्व लाभले आहे. त्या नेत्याला सर्व हिंदूंनी जातपात न बघता पक्ष न बघता हिंदुस्थानी म्हणून पाठबळ द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.


      येथील कीर्तनसंध्या परिवाराने आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवाच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशीच्या कीर्तनात (ता. ७ जानेवारी) ते बोलत होते. यावेळी श्री. आफळे यांनी लोकमान्य टिळकांच्या उत्तरायुष्यातील कार्यावर प्रकाश टाकला. पूर्वरंगात लोकमान्यांच्या गीतारहस्य या ग्रंथाचे सार सांगतानाच श्रीकृष्णाला निष्काम कर्म कसे अपेक्षित होते, याचे विवेचन त्यांनी केले. लोकमान्यांनी गीतारहस्यामध्ये निष्काम कर्मयोग पटवून दिलाच, पण प्रत्यक्ष जीवनातही देशासाठी आयुष्य वेचून तो योग त्यांनी साधला, असे बुवांनी स्पष्ट केले.
      उत्तररंगात लोकमान्यांविषयी ते म्हणाले, राजद्रोहाच्या आरोपाखाली इंग्रजांनी टिळकांना मंडालेच्या तुरुंगात जावे लागले. त्यांची १९१४ साली सुटका झाली. याच काळात आफ्रिकेतून परतलेले मोहनदास करमचंद गांधी यांचा काँग्रेसमध्ये उदय झाला होता. जहाल राजकारण मागे पडून काँग्रेसमध्ये मवाळ विचारसरणीचा प्रभाव दिसू लागला. दरम्यान १९१४ मध्ये सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धात इंग्रज सरकारने भारताकडे फौजेची मागणी केली. तेव्हा ब्रिटिश सैन्यात दाखल व्हायला भारतीय तरुणांना प्रवृत्त केले. संधी मिळाली आहेच, तर इंग्रजांच्या सैन्यात शिरावे, लष्कर ताब्यात घ्यावे, म्हणजे खरे स्वराज्य मिळेल असे टिळकांचे मत होते. नंतर महात्मा झालेल्या गांधींनी मात्र महायुद्धात हिंदुस्थानी सैनिकांनी इंग्रजांना विनाअट मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे इंग्रज भारावून आपल्याला साम्राज्यातील सुराज्य देतील, असा त्यांचा अंदाज होता. इंग्रजांकडून काहीही मिळणार नाही, हे लोकमान्यांना चांगलेच माहीत होते. त्यामुळे लोकमान्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला. मात्र विनाअट मदतीचा ठराव मंजूर झाला. त्याचे दुष्परिणाम झालेच. अनेक तुघलकी कायदे इंग्रजांनी लादले. मालकाला न विचारता त्याची जमीन, पैसे सरकारजमा होऊ लागले. परिणामी काळात इंग्रजांविरोधात प्रचंड असंतोष वाढला. लोकमान्य टिळकांचे नेतृत्वच लोकांना हवेसे वाटू लागले. लखनौमध्ये १९१६ साली झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे नेतृत्व टिळकांनी करावे, अशी जोरदार मागणी होऊ लागली. टिळकांनी ती मान्य केली आणि अधिवेशनाला जाण्यासाठी निघाले. ते पुण्याहून लखनौकडे रवाना झाले, तेव्हा प्रत्येक स्थानकावर आगगाडी थांबवून लाखो हिंदुस्थानी लोकांनी टिळकांना अभिवादन केले. लखनौमध्ये टिळक मोटारीत बसले तर लोकांनी सर्व टायरची हवा काढली आणि जनतेने त्यांना बग्गीमध्ये बसण्यास सांगितले. मग बग्गीचे घोडे काढून कार्यकर्त्यांनी स्वतः बग्गी ओढली. जनतेकडून असा मान अखंड भारतात फक्त लोकमान्यांना मिळाला. याच अधिवेशनात त्यांनी स्वराज्य, माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवणारचअशी सिंहगर्जना केली, असे श्री. आफळेबुवा यांनी सांगितले.  संभाव्य तिसर्याम महायुद्धात हिंदुस्थान वाचला पाहिजे म्हणून सार्यांजनी व्यायाम, योगसाधना आणि बलवान व्हावे, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. कीर्तनाला रत्नागिरीकरांची तुफान गर्दी कीर्तनाला झाली.
      जोडोनिया धन, आधी लगीन कोंडाण्याचे, विजयाचा क्षण आला, कृष्ण माझी माता आदी पदे बुवांनी कीर्तनात सादर केली. बुवांना संगीतसाथ करण्यासाठी प्रख्यात पखवाजवादक राजा केळकर यांनी ढोलकी, दिमडी, संबळ, शंख, ढोल अशी सहा वाद्ये आणली होती. या वाद्यांना वापर करण्याकरिता बुवांनी अष्टविनायक चित्रपटातील गीत पंधरा मिनिटे ऐकवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. हेरंब जोगळेकर, प्रथमेश तारळकर, उदय गोखले, मधुसूदन लेले, सौ. आदिती चक्रदेव, महेश सरदेसाई व आदित्य पोंक्षे यांची सुरेख संगीतसाथही मिळाली. निबंध कानिटकर यांनी निवेदन केले.
      पूर्वरंगानंतर आफळेबुवांच्या संकेतस्थळाची झलक दाखवण्यात आली. संकेत सरदेसाई यांनी हे संकेतस्थळ साकारले आहे. त्यांचा बुवांनी सत्कार केला. हे संकेतस्थळ कीर्तनसंध्या परिवाराच्या सहकार्याने साकारण्यात आले असून याच परिवाराने संकेतस्थळाचा मान पटकावला असे बुवांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. या संकेतस्थळावर बुवांची ४० कीर्तने पाहायला मिळणार आहेत. जुने फोटो, माहिती उपलब्ध होईल. पुढील महिन्यात संकेतस्थळाचे अनावरण होणार आहे. आफळेबुवांचे वडील कै. गोविंदस्वामी यांना श्रीपाद ढोलेबुवा यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी सुमारे वर्षभर झांजसाथ केली होती. काल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

      दिल्लीच्या नाटक अकादमीवर आफळेबुवा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे अखिल भारतीय स्तरावरील कीर्तन संमेलन घेण्याचा प्रस्ताव आल्यावर बुवांनी पुण्या-मुंबईऐवजी रत्नागिरीच्या कीर्तनसंध्या परिवाराच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकण्याचे ठरवले. कीर्तनसंध्या परिवार गेली सात वर्षे भव्य दिव्य स्वरूपात कीर्तन महोत्सवाचे यशस्वी नियोजन करत आहे. त्यामुळे बुवांनी कीर्तनसंध्याच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून अ. भा. संमेलन रत्नागिरीत घेऊ, असे दिल्लीमध्ये सांगितले. या संमेलनात बंगाली, आसामी, तमिळ अशा विविध भारतीय भाषांतील कीर्तनकारांची कीर्तने ऐकण्याची पर्वणी रत्नागिरीकरांना मिळेल, असे त्यांनी जाहीर केले.
...........


रत्नागिरी-  कीर्तनसंध्या महोत्सवाला जमलेले हजारो श्रोते.


यावेळच्या कीर्तनसंध्या महोत्सवातील कीर्तनांकरिता चारुदत्त आफळेबुवांनी संदर्भासाठी घेतलेले ग्रंथ असे –
१)      लोकमान्य टिळक (लेखक - धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन)
२)      आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (लेखक - विष्णु महादेव जोशी, वीर सावरकर प्रकाशन)
३)      कंठस्नान आणि बलिदान (चापेकर) (लेखक - विष्णु महादेव जोशी, वीर सावरकर प्रकाशन)
४) गीतारहस्यसार (लेखक – कै. वा. रा. कोठारी (संपादक, दै. प्रभात), गीताधर्म मंडळ प्रकाशनमाला)

No comments:

Post a Comment