रत्नागिरी : रत्नागिरीत यावर्षीच्या
कीर्तनसंध्या महोत्सवात १८५७ पासून १९२० पर्यंतचा ऐतिहासिक कालखंड राष्ट्रीय
कीर्तनकार हभप चारुदत्त आफळेबुवा उलगडणार आहेत. येत्या ३ ते ७ जानेवारी २०१८ या काळात
हा महोत्सव होणार आहे.
रत्नागिरीत सुरू असलेल्या
कीर्तनसंध्या उपक्रमाचे यंदाचे सातवे वर्ष आहे. रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा
संकुलात ३ ते ७ जानेवारी या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ही
कीर्तने होणार आहेत. गेल्या सात वर्षांत संभाजी महाराज, शिवाजी महाराज, सुभाषचंद्र
बोस, पेशवाईतील मराठशाहीची देशव्यापी झुंज, स्वराज्याकडून साम्राज्याकडे, १८५७ चे
स्वातंत्र्ययुद्ध या विषयांवर कीर्तने झाली. यावर्षी क्रांतीपर्वाचा दुसरा भाग
म्हणजेच १८५७ ते १९२० या कालखंडातील इतिहास कीर्तनाद्वारे मांडला जाणार आहे.
कीर्तनाच्या पूर्वरंगात लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या गीतारहस्यावरचे विवेचन
आफळेबुवा करणार आहेत. उत्तररंगात १८५७ ते १९२० या कालावधीतील लोकमान्य टिळक,
चापेकर बंधू, महात्मा फुले, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, मदनलाल धिंग्रा,
बिपिनचंद्र पाल, खुदीराम बोस, फडके, बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी
कार्याचा आलेख मांडला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी इतिहासाच्या
शिक्षणाची ही पर्वणी आहे, असे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे. महोत्सवात हेरंब
जोगळेकर (तबला), मधुसूदन लेले (हार्मोनियम), राजा केळकर (पखवाज), उदय गोखले
(व्हायोलिन), उदयराज सावंत (ध्वनिव्यवस्था) यांची साथसंगत लाभणार आहे.
चारुदत्तबुवा आफळे यांचे वडील
गोविंदबुवा आफळे यांच्या शताब्दीच्या निमित्ताने एक संकेतस्थळ सुरू करण्यात येणार
असून त्याचा प्रारंभ कीर्तनसंध्या महोत्सवात होईल. महोत्सवात जमिनीवरील बैठकव्यवस्था
नेहमीप्रमाणेच मोफत असेल. खुर्च्यांची व्यवस्थाही करण्यात आली असून त्याकरिता
संपूर्ण महोत्सवाची देणगी सन्मानिका ३०० रुपयांना उपलब्ध होईल. या सन्मानिकांसाठी
अवधूत जोशी (मानस जनरल स्टोअर्स, माळ नाका, रत्नागिरी. ९०११६६२२२०, ८६६८२६३४९६),
नितीन नाफड (सोहम मेडिकल, पोतदार हॉस्पिटल, शिवाजीनगर. ९५०३९४६६१७), उमेश
आंबर्डेकर (धन्वंतरी आयुर्वेद, मारुती मंदिर. ९४२३२९२४३७, ९८५०८२४३७), गौरांग
आगाशे (आगाशे यांचे दुकान, साळवी स्टॉप. ९७३०३१०७९९), रत्नाकर जोशी (डिक्सन
सप्लायर्स, जिल्हा परिषद कार्यालयाजवळ. ९०७५०५२६१३, ९४२२०५२६१३), योगेश हळबे
(गुरुकृपा रेडिओ हाऊस, टिळक आळी. ९८९०८२७००६) आणि मकरंद करंदीकर (करंदीकर
उपाहारगृह, शिवाजीनगर. ९४२३०४७०४७) यांच्याकडे उपलब्ध होतील. आहेत. महोत्सवाच्या
ठिकाणीही दैनंदिन देणगी सन्मानिका उपलब्ध होणार आहेत.
महोत्सवाच्या आवारात वाहनांच्या
पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून दररोज रात्री कीर्तन संपल्यानंतर मजगाव,
कुवारबाव आणि नाचणे मार्गावर शहर वाहतुकीच्या बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment