रत्नागिरीतील संस्कृतचे गाढे अभ्यासक पुरुषोत्तम नारायण तथा अप्पाशास्त्री
फडके शनिवारी (ता. 25 एप्रिल) अनंतात विलीन झाले. मिरकरवाडा येथील स्मशानभूमीत
त्यांच्यावर झालेल्या अंत्यसंस्कारांच्या वेळी त्यांचे नातलग, शेकडो चाहते आणि विद्यार्थी
उपस्थित होते.
शतायुषी फडकेशास्त्रींचे शुक्रवारी (ता. 24) रात्री साडेआठ वाजता रत्नागिरीत
जोशी पाळंद येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. निधनाची माहिती अल्पावधीत सर्वत्र
पसरली आणि त्यांचे चाहते त्यांच्या घरी जमा झाले. पुणे आणि दापोलीतून पुत्र, तसेच
पुण्यातून कन्या रत्नागिरीकडे रवाना झाल्या. शनिवारी सकाळी अंत्यविधी सुरू झाले.
अकरा वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रा निघाली. विविध व्यवसायांमध्ये स्थिरावलेले
तसेच विद्यार्थिदशेत असलेले त्यांचे विद्यार्थी, नातलग आणि सुहृदांचा अंत्ययात्रेत
सहभाग होता. सुमारे तीस वर्षे फडकेशास्त्रींनी ज्या फाटक प्रशालेत अध्यापन केले,
तेथे त्यांच्या मृतदेहाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्कृत
पाठशाळा आणि रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरीमंदिराजवळही त्यांना फुले वाहून मानवंदना
देण्यात आली.
अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर प्रसिद्ध लेखिका आणि शास्त्रींच्या कन्या
सौ. आशा गुर्जर यांनी वडिलांविषयीच्या भावना व्यक्त केल्या. वडिलांचे व्रतस्थ
जीवन, विद्यार्थ्यांना दिलेली शिकवण, दान आणि त्यांच्या कार्याला कन्येने उजाळा
दिला. आपला सुहृद निवर्तल्यानंतर काही तरी सोडून देण्याची पद्धत असते. फडकेशास्त्री
गेल्यानंतर काही सोडण्याऐवजी त्यांच्या अनेक सद्गुणांपैकी एक तरी गुण अंगीकारावा,
अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्याविषयीच्या आठवणी संकलित
करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यानंतर ज्येष्ठ
पुत्र नीलकंठ यांनी अंत्यसंस्कार केले.
यावेळी पुत्र डॉ. अनिरुद्ध फडके, जामात लेखक रवींद्र गुर्जर, अन्य दोन कन्याही
उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment